कृषि हवामान सल्ला, दिनांक २६ फेब्रु. ते ३ मार्च २०२१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहील.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

वेळेवर पेरणी केलेल्या भुईमूग पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी करून घ्यावी. उशिरा पेरणी केलेल्या गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या नियंत्रणासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत झाडांना काठीचा आधार द्यावा, झाडाच्या खोडाला माती लावावी.आंबा फळबागेत पाणी व्यवस्थापन करावे. पानांवर अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत असल्यास 13:00:45 15 ग्रॅम पति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी.

भाजीपाला पिके

मिरची पिकावर चुरडा मुरडा रोगाचा प्रादर्भाव दिसून आल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी  फिप्रोनिल 5% 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकात तणनियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला  पिकाची काढणी करावी.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या गुलाब, शेवंती, जिलारडिया फुलांची काढणी करून घ्यावी. फुलपिकात तणनियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे.

सामुदायिक विज्ञान

सकाळचा नाश्ता हे एक महत्वाचे जेवन आहे कारण रात्रभर उपाशी राहील्या नंतर सकाळच्या नाश्त्यामुळे शरीराला लागणारी उर्जा तसेच आवश्यक पौष्टीक मुल्य चांगल्या आरोग्या करिता आवश्यक असतात.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी