असे करा फळपीक व्यवस्थापन

 अंजीर : १) जमिनीपासून तीन फुटापर्यंत एकच खोड ठेऊन त्यावर ४ ते ५ प्राथमिक फांद्या राखाव्यात. २) फळ पक्वतेच्या काळात बागेस पाणी देण्याची व्यवस्था करावी. ३) फळांची गुणवत्ता व आकारमान वाढण्यासाठी फेरस सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) किंवा चिलेटेड लोह (१० ग्रॅम प्रतिलिटर पाणी ) फवारणी करावी. ४) परागीकरणासाठी बागेत एकरी १५ मधमाश्‍यांच्या पेट्या ठेवाव्यात.

कागदी लिंबू :

१) कागदी लिंबू फळबागेसाठी हस्तबहार नियोजन करत असताना सप्टेंबरमध्ये १५० ग्रॅम नत्र द्यावे. त्यानंतर जानेवारीमध्ये १५० ग्रॅम नत्र प्रति झाड द्यावे. याचबरोबरीने व्हॅम ५०० ग्रॅम, स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक १०० ग्रॅम, ॲझोस्पिरिलम १०० ग्रॅम, ट्रायकोडर्मा हरजियानम १०० ग्रॅम जमिनीत मिसळून द्यावे.
२) सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसल्यास झिंक सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी), मॅग्नेशियम सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी), मॅगेनिज सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी), फेरस सल्फेट (३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) आणि कॉपर सल्फेट (२ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची एकत्रित फवारणी करावी.
३) परागीकरणासाठी एकरी १५ मधमाश्‍यांच्या पेट्या ठेवाव्यात.

पेरू :
१) हस्तबहर नियोजन करत असताना, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये नत्र ४५० ग्रॅम प्रतिझाड दिल्यानंतर पाणी व्यवस्थापन करावे.
२) प्रतिझाड २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा, २५ ग्रॅम अझोटोबॅक्‍टर, २५ ग्रॅम पीएसबी झाडाच्या आळ्यात मिसळून द्यावे.
३) परागीकरणासाठी एकरी १५ मधमाश्‍यांच्या पेट्या ठेवाव्यात.

• सीताफळ :
१) पूर्ण वाढलेल्या झाडास चांगला ओलावा असताना १५ ते २० किलो शेणखत, नत्र १२५ ग्रॅम, स्फुरद १२५ ग्रॅम आणि पालाश १२५ ग्रॅम प्रति झाड आळे पद्धतीने द्यावे. तसेच हंगाम धरण्याच्या वेळी प्रति झाड एक किलो उत्तम प्रतीचे गांडूळ खत, अर्धाकिलो कोंबडी खत व २५ ग्रॅम ट्रायकोड्रर्मा आळ्यातील मातीत मिसळून द्यावे.
२) चांगली फळधारणा होण्यासाठी बाग फुलोऱ्यात असताना एक संरक्षित हलके पाणी देण्याची व्यवस्था करावी. ३) परागीकरणासाठी प्रतिएकरी १५ मधमाश्‍यांच्या पेट्या ठेवाव्यात.

• बोर :
१) जास्तीचा फुटवा वेळोवेळी काढून टाकावा तसेच बाजूच्या फांद्या वाढण्यासाठी शेंडा खुडावा.
२) फळांची गुणवत्ता व आकारमान वाढण्यासाठी फेरस सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) किंवा चिलेटेड लोह (१० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी.
३) बागेत प्रतिएकरी १५ मधमाश्‍यांच्या पेट्या ठेवाव्यात.

• आवळा :
१) पूर्ण वाढलेल्या झाडास चांगला ओलावा असताना १५ ते २० किलो शेणखत, नत्र २५० ग्रॅम, स्फुरद २५० ग्रॅम आणि पालाश २५० ग्रॅम प्रतिझाड आळे पद्धतीने द्यावे. तसेच, हंगाम धरण्याच्या वेळी प्रतिझाड एक किलो उत्तम प्रतिचे गांडूळ खत, अर्धाकिलो कोंबडी खत व २५ ग्रॅम ट्रायकोड्रर्मा द्यावे.
२) फळाची चांगली वाढ होण्यासाठी बाग फुलोऱ्यात असताना एक संरक्षित हलके पाणी देण्याची व्यवस्था करावी.
३) जमिनीमध्ये वाफसा स्थिती टिकवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा आच्छादन म्हणून वापर करावा.
४) फळांची गुणवत्ता व आकारमान वाढण्यासाठी फेरस सल्फेट(५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) किंवा चिलेटेड लोह(१० ग्रॅम प्रति लिटर पाणी ) फवारणी करावी.
५) परागीकरणासाठी बागेत एकरी १५ मधमाश्‍यांच्या पेट्या ठेवाव्यात.

• शेवगा :
१) प्रतिवर्षी २० किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र (१६५ ग्रॅम युरिया), ७५ ग्रॅम स्फुरद (४५५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट) व ७५ ग्रॅम पालाश (१२० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे.
२) खते देण्यासाठी प्रत्येक झाडाला त्याच्या विस्ताराप्रमाणे १५ ते २० सें.मी. खोलीचे गोलाकार आळे करावे. अशा अळ्यामध्ये काडीकचरा, झाड/ झुडपांचा पाला पसरवून त्यावर संपूर्ण शेणखत, स्फुरद, पालाश आणि निम्मे नत्र देऊन आळी बुजवून घ्यावीत. एक महिन्यानंतर उर्वरित नत्राची मात्रा द्यावी.
३) नवीन लागवड केलेल्या रोपांची मर होऊ नये म्हणून लागवड केल्यानंतर पावसाळ्यात रोपांच्या सभोवताली पाणी साठू देऊ नये.
४) शेंगाची चांगली वाढ होण्यासाठी बाग फुलोऱ्यात असताना एक संरक्षित हलके पाणी देण्याची व्यवस्था करावी.

  • डॉ. विजय अमृतसागर, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर