आडसाली ऊसासाठी फर्टीगेशन वेळापत्रक

ठिबक सिंचन पद्धतीचे एक वैशिष्ट्य असे कि, पिकाच्या वेगवेगळया अवस्थेमध्ये विद्राव्य खतांद्वारे सिंचनाबरोबरच दररोज किंवा नियोजनाप्रमाणे पोषणद्रव्यांचा पुरवठा मुळांच्या सानिध्यात करता येतो. यालाच ‘फर्टीगेशन’ म्हणतात. पारंपारिक पद्धतीमध्ये रासायनिक खते तीन ते चार मात्रांमध्ये विभागून दिली जातात. पाट पाण्यामुळे खतांची उपयुक्तता ४० ते ५० % एवढीच राहते. फर्टीगेशनद्वारे द्यावयाची खते ही १०० % विद्राव्य असावी लागतात. ती मुळांच्या कक्षेत ठीबकद्वारे देता येतात. ही खते गरजेनुसार दररोज किंवा आठवड्यातून तीन ते चार दिवस (वीज पुरवठ्याचे वेळापत्रक पाहून) दिली जातात. त्यामुळे अन्नद्रव्यांचा ऱ्हास निचरा होऊन जाणे, बाष्फीभवन होणे, वाहून जाणे, स्थिरीकरण होणे अशा समस्या उद्भवत नाहीत. खतांची उपयुक्तता ९० % पर्यंत मिळते. उत्पादनादेखील भरघोस वाढ होते.

ठिबकमधून देण्यासाठी खालील जलविद्राव्य खते वापरणे योग्य ठरते :

१. नत्राचा पुरवठा करण्यासाठी – युरिया (४६ % नत्र)
२. स्फुरदासाठी – १२.६१.०० (१२ % नत्र, ६१ % स्फुरद), १७.४४.०० (१७ % नत्र, ४४ % पालाश) किंवा फॉस्फोरिक अॅसिड (७० ते ८० % स्फुरद)
३. पालाशसाठी – म्युरेट ऑफ पोटॅश (६० % पालाश)
४. कॅल्शियमसाठी – कॅल्शियम नायट्रेट (१७ % कॅल्शियम)
५. मॅग्नेशियमसाठी – मॅग्नेशियम सल्फेट (१० % मॅग्नेशियम)

फर्टीगेशनसाठी विशेष टिप्पणी :

– ऊस लागणीनंतर १५ दिवसांनी फर्टीगेशन चालू करावे.
– रासायनिक खतांचा चांगला परिणाम मिळवण्यासाठी किमान दर चार दिवसांनी फर्टीगेशन करावे.
– खतांचे द्रावण तयार करताना प्रथम पांढरा पोटॅश, त्यानंतर १२.६१.०० किंवा १७.४४.०० किंवा फॉस्फोरिक अॅसिड व सर्वात शेवटी युरिया असा क्रम पुरेशा पाण्यात पूर्णपणे विरघळवून घेण्यासाठी ठेवावा.
– सर्व खते मुळांच्या सानिध्यात समप्रमाणात पसरवण्यासाठी एक तासभर पाणी दिल्यानंतर १२ ते १५ मिनिटे फर्टीगेशन करावे व त्यानंतर पुन्हा १५ ते २० मिनिटे ठिबकने पाणी द्यावे.
– मोनो अमोनियम फॉस्फेट (१२.६१.००) किंवा युरिया फॉस्फेट (१७.४४.००) किंवा फॉस्फोरिक अॅसिडचा वापर आपण करत असल्याने डी.ए.पी.ची (१८.४६.००) मात्रा कमी व फक्त बाळभरणी, मोठी भरणीपुरतीच वापरावी.
– नायट्रोजन व फॉस्फरस १८० दिवसांपर्यंतच द्यावे. पोटॅशियम २४० दिवस (८ महिने) पर्यंत द्यावे. पोटॅशियम ३०० दिवसांपर्यंत दिले तरी चालते.
– नायट्रोजन व फॉस्फरसमुळे किंवा फॉस्फोरिक अॅसिडमुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. म्हणून कॅल्शियम नायट्रेटचे फर्टीगेशन अवश्य करावे.
– रोग व कीड आढळल्यास हेक्झाकोनॅझोल किंवा डायमिथोएट ठीबकद्वारे द्यावे.

आडसाली ऊस फर्टीगेशन वेळापत्रक (एक एकर क्षेत्रासाठी) :

*आठवड्यातून रविवार अथवा कोणताही एक दिवस सोडून इतर दिवशी एक दिवस आड फर्टीगेशन करावे.

१. लागणीनंतर १५ ते ४५ दिवस (तीस दिवस- १३ फर्टीगेशन ) :

 ३० किलो नत्र (एकूण ६५ किलो युरिया – ५ किलो युरिया प्रति फर्टीगेशन), ४.५ किलो स्फुरद (२० किलो २४.२४.०० किंवा १० किलो १७.४४.०० किंवा ७ किलो १२.६१.०० किंवा ६ किलो फॉस्फोरिक अॅसिड १३ समान हप्त्यांमध्ये), ७.५ किलो पालाश (एकूण १२.५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश – १ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति फर्टीगेशन)

२. लागणीनंतर ४६ ते ९५ दिवस (५० दिवस- २२ फर्टीगेशन) :

७० किलो नत्र (एकूण १०० किलो युरिया – ४.५ किलो युरिया प्रति फर्टीगेशन), २५ किलो स्फुरद (१०० किलो २४.२४.०० किंवा ५७ किलो १७.४४.०० किंवा ४० किलो १२.६१.०० किंवा ३० किलो फॉस्फोरिक अॅसिड २२ समान हप्त्यांमध्ये), १५ किलो पालाश (एकूण २५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश – १.१० किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति फर्टीगेशन)

३. लागणीनंतर ९६ ते १२५ दिवस (३० दिवस- १३ फर्टीगेशन) :

 ६० किलो नत्र (एकूण १३० किलो युरिया – १० किलो युरिया प्रति फर्टीगेशन), ३० किलो स्फुरद (१२५ किलो २४.२४.०० किंवा ६८ किलो १७.४४.०० किंवा ५० किलो १२.६१.०० किंवा ४० किलो फॉस्फोरिक अॅसिड १३ समान हप्त्यांमध्ये), २५ किलो पालाश (एकूण ४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश – ३.२५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति फर्टीगेशन)

४. लागणीनंतर १२६ ते १६५ दिवस (४० दिवस- १७ फर्टीगेशन) : 

३० किलो नत्र (एकूण ६५ किलो युरिया – ४ किलो युरिया प्रति फर्टीगेशन), २५ किलो स्फुरद (११० किलो २४.२४.०० किंवा ६८ किलो १७.४४.०० किंवा ५० किलो १२.६१.०० किंवा ४० किलो फॉस्फोरिक अॅसिड १७ समान हप्त्यांमध्ये), ४० किलो पालाश (एकूण ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश – ४ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति फर्टीगेशन)

५. लागणीनंतर १६५ ते २०५ दिवस (४० दिवस- १७ फर्टीगेशन) : 

नत्र ००, स्फुरद २५ किलो (११० किलो २४.२४.०० किंवा ५५ किलो १७.४४.०० किंवा ४०. किलो १२.६१.०० किंवा ३० किलो फॉस्फोरिक अॅसिड १७ समान हप्त्यांमध्ये), ६० किलो पालाश (एकूण १०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश – ६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति फर्टीगेशन)

टीप : लागणीपासून ४५ व्या दिवसापासून प्रत्येक आठवड्यात दोन वेगवेगळ्या दिवशी ३ किलो कॅल्शियम नायट्रेट व ३ किलो मॅग्नेशियम सल्फेट फर्टीगेशनद्वारे २० आठवडे द्यावे. वीजपुरवठ्याचे वेळापत्रक पाहून सुटीचा दिवस ठरवावा. फर्टीगेशन एक दिवसाआड किंवा तीन सलग दिवस करण्यास हरकत नाही. महिन्यात एक पाटपाणी द्यावे.

— डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, ज्येष्ठ ऊस तज्ञ व निवृत्त कृषी शास्त्रज्ञ
(सौजन्य : कृविके, बारामती )