मराठवाडयात शीतलहर : हा कृषी सल्ला उपयोगात आणा

कृषी हवामान सल्ला : दिनांक २६  ते  ३० जानेवारी २२

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात किमान तापमानात घट होऊन दिनांक 25 जानेवारी रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 26 जानेवारी रोजी औरंगाबाद, जालना, परभणी व बीड  जिल्हयात तूरळक ठिकाणी शीत लहरीची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला असल्यामूळे पिकास पाणी देण्याची आवश्यकता नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 30 जानेवारी ते 05 फेब्रूवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकास 180 दिवस झाले असल्यास कापसाची शेवटची वेचणी पूर्ण करून पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  किमान तापमानात घट होऊन तूरळक ठिकाणी शीत लहरीची शक्यता असल्यामूळे उन्हाळी भूईमूग पिकाची पेरणी लांबवावी. उन्हाळी भुईमूग पिकास पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 3 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे नंतर द्रव्यरूपी रायझोबियम व स्फुरद विरघळणारे जिवाणू (पीएसबी) संवर्धके प्रत्येकी 10 मिली प्रति एक किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवून नंतर पेरणी करावी. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब + कार्बेन्डाझीम संयूक्त बूरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात घट होऊन तूरळक ठिकाणी शीत लहरीची शक्यता असल्यामूळे केळी पिकावर याचा परिणाम होऊ नये म्हणून  बागेस सायंकाळी मोकाट पध्दतीने पाणी द्यावे. बागेभोवती कृत्रिम वारा रोधकाची व्यवस्था करावी. आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी.   किमान तापमानात घट होऊन तूरळक ठिकाणी शीत लहरीची शक्यता असल्यामूळे सकाळी थंडी वाढल्यास द्राक्ष बागेत मण्यांचे क्रॅकींग होऊ शकते. द्राक्ष बागेतील मणी तडकू नये म्हणून बागेत पाण्याचे समायोजन योग्य करावे. बागेभोवती कृत्रिम वारा रोधकाची व्यवस्था करावी. द्राक्षाचे घड जिब्रॅलिक ॲसिड 20 पीपीएमच्या द्रावणात बूडवावे.

भाजीपाला

किमान तापमानात घट होऊन तूरळक ठिकाणी शीत लहरीची शक्यता असल्यामूळे भाजीपाला पिकांचे थंडीपासून संरक्षण ‍ करण्यासाठी भाजीपाला पिकास सायंकाळी पाणी द्यावे. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

किमान तापमानात घट होऊन तूरळक ठिकाणी शीत लहरीची शक्यता असल्यामूळे फुल पिकाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी फुलपिकास सायंकाळच्या वेळी पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

किमान तापमानात घट होऊन तूरळक ठिकाणी शीत लहरीची शक्यता असल्यामूळे थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत.

सामुदायिक विज्ञान

घरासाठी फर्निचर निवडतांना फोल्डींग व बहूपयोगी फर्निचर निवडावे, त्यामूळे घरात अडचण न होता मोकळी जागा राहते.

सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी