मराठवाड्यात पावसाची शक्यता; कृषि हवामान सल्ला

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 01 जून रोजी मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात  तर दिनांक 02 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद तसेच दिनांक 03 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता आहे. दिनांक 03 जून रोजी लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, पूर्व हंगामी (मे) कपाशीची लागवड करू नये. लागवड पेरणी योग्य पाऊस झल्यानंतरच करावी.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 06 जून ते 12 जून, 2021 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची,  किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस  पिकाच्या लागवडीसाठी वाण  निवडताना जमिन व हवामान, कोरडवाहू  किंवा बागायती, लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यांचा  विचार करावा.तुर पिकाच्या पेरणीसाठी बीडीएन-2, बीडीएन-708 (अमोल), बीडीएन-711, बीएसएमआर-853, बीएसएमआर-736, बीडीएन-716 किंवा गोदावरी या वाणांपैकी एका वाणाची निवड करावी.मुग पेरणीसाठी बीएम-4, कोपरगाव, बीपीएमआर-145, बीएम-2002-1, बीएम-2003-2, या वाणांची तर उडीद  लागवडीसाठी बीडीयु-1, टीएयू-1, या वाणांची  निवड करावी.भुईमूग  पिकाच्या लागवडीसाठी एसबी-11, एलजीएन-2 (मांजरा), टीएजी-24, टीजी-26, टीएलजी-45, एलजीएन-1, एलजीएन-123  या वाणांपैकी एका वाणाची  ‍ निवड करावी.मका  पिकाच्या पेरणीसाठी नवज्योत, मांजरा, डीएमएच-107, केएच-9451, एमएचएच, प्रभात, करवीर, जेके-2492, महाराजा, यूवराज इत्यादी वाणांपैकी एका वाणाची  निवड करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पूरेसा पाऊस झाल्याशिवाय नवीन केळी फळबागेची लागवड करू नये. पूर्वी लागवड केलेल्या बागेत आंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. केळीच्या घडांना काठीचा आधार द्यावा. बागेतील वाळलेली पाने काढून टाकावीत.पूरेसा पाऊस झाल्याशिवाय नवीन आंबा फळबागेची लागवड करू नये. पूर्वी लागवड केलेल्या बागेत आंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी जेणेकरून बागेत वाळवीचा प्रादुर्भाव होणार नाही.द्राक्ष बागेत पानांची विरळणी करावी.पूरेसा पाऊस झाल्याशिवाय नवीन सिताफळ फळबागेची लागवड करू नये. पूर्वी लागवड केलेल्या बागेत आंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी.

भाजीपाला

खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी रोपवाटीकेत जागा तयार करून घ्यावी. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी.

फुलशेती

खरीप हंगामात फुलपिकाच्या लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी रोपवाटीकेत जागा तयार करून घ्यावी. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्‍यवस्‍थापन

तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.  आज जागतिक दुग्ध दिवस आहे. दुधास पूर्ण अन्न संबोधल्या जाते म्हणून दुध प्या व तंदुरुस्त रहा. दुधातील लॅक्टोफेरीन हा घटक शरीरातील अनेक जैविक क्रियांमध्ये मदत करतो मानवास तंदुरूस्त राहण्यास योगदान देतो. उत्तम दुध तंदुरूस्त पशुधनापासूनच प्राप्त होते व पशुधनाचे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांना सकस आहार वेळेत लसीकरण व जंतनाशक द्या. पशुधनास निरोगी ठेवा.

सामुदायिक विज्ञान

घरातील खोल्या लहान असतील तर भिंतीना फिका रंग द्यावा त्यामूळे खोली मोठी असल्याचा आभास  निर्माण होईल. गडद रंगामुळे खोली अधिक लहान वाटते.

(सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)