प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 27 मे रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिगोली जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व पावसाची शक्यता आहे. तसेच दिनांक 28 व 29 मे रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता आहे.
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, पूर्व हंगामी (मे) कपाशीची लागवड करू नये. लागवड पेरणी योग्य पाऊस झल्यानंतरच करावी.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 30 मे ते 05 जून, 2021 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कोरडवाहू कापूस लागवडीसाठी भारी व काळया जमिनीमध्ये दोन-तिन वर्षानी एक वेळा खोल नांगरणी करावी. नांगरणी नंतर मोगडणी करावी. मोगडणीनंतर दोन-तिन वखराच्या पाळया द्याव्यात. शेवटची वखरणी करण्यापूर्वी कोरडवाहू कापूस लागवडीसाठी 5 टन (10-12 गाडया) चांगले कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत शेतात समप्रमाणात पसरावे.तुर पिकाच्या पूर्व मशागतीसाठी एक नांगरणी व वखराच्या 2 ते 3 पाळया द्याव्यात. शेवटच्या पाळी अगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 5 टन (10-12 गाडया) जमिनीत मिसळून पाळी द्यावी.मुग/उडीद लागवडीसाठी एक नांगरणी व कुळवाच्या 2 ते 3 पाळया द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 5 टन (10-12 गाडया) जमिनीत मिसळून पाळी द्यावी.भुईमूगाच्या पेरणीसाठी बळीराम देशी नांगराची एक ते दोन नांगरणीनंतर वखराच्या दोन ते तिन पाळया द्याव्यात. शेवटच्या वखरपाळी पूर्वी प्रति हेक्टरी 7.5 टन (14-16 गाडया) शेणखत/कंपोस्ट खत पसरून जमिन भुसभूशीत करावी. सध्याच्या काळात उन्हाळी भुईमूग काढणी सुरू आहे, वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भुईमूगाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. काढणी केलेल्या उन्हाळी भुईमूग सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.जमिनीची खोल नांगरट करावी. वखराच्या एक ते दोन पाळया देऊन जमिन तयार करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळीच्या नवीन लागवडीसाठी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत लागवडीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावे.केळी बागेत घडांची वाढ होत नसल्यास 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी दोन दिवसात करावी.आंब्याच्या नवीन लागवडीसाठी 1X1X1 मीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सूपर फॉस्फेट व 50 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे व पोयटा मातीने सर्व मिश्रणासहीत खड्डा भरून घ्यावा. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी करून घ्यावी. एप्रिल छाटणी केलेल्या द्राक्ष बागेत फुटींची विरळणी करावी.सिताफळाच्या नवीन लागवडीसाठी 50X50X50 सें.मी. या आकाराचे खड्डे घेऊन त्यात एक ते दिड घमेले चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत, अर्धा किलो सुपर फॉस्फेट, फॉलीडॉल पावडर घालून व चांगल्या मातीच्या मिश्रणाने ते भरावे.
भाजीपाला
खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी जमिनीचा पूर्व मशागत करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी
फुलशेती
खरीप हंगामात फुलपिकाच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये. पोटफुगी टाळण्यासाठी पावसाळयात जनावरांना हिरवा एकदल चारा जसे मका, ज्वारी यांच्या सोबत द्विदल चारा जसे लूसर्ण, बरसीम द्यावे. सोबतच वाळलेला चारा जसे कडबा न विसरता दररोज द्यावा. अशा प्रकारे हिरवा आणि वाळलेला चारा एकत्र दिल्यास जनावरांतील पोटफुगी टाळल्या जाऊ शकते.
सामुदायिक विज्ञान
गर्भधारणेपूर्वी दांपत्यांनी पालकत्वासाठी त्यांची पात्रता पूढील घटकान्वये तपासून घ्यावी : दांपत्या शारीरिक व मानसिक दृष्टया परिपक्व असावे, दांपत्याचे वय 21 ते 30 वर्षा दरम्यान असावे, महिलेचे सर्वसाधारण आरेग्य उत्कृष्ट दर्जाचे असावे, दांपत्याची पालकत्व स्वीकारण्याची मानसिक तयारी असावी, नवजात अर्भकाच्या तथा कुटुंबाच्या गरजा भ्गवण्याची कुटुंबाची योग्य आर्थिक परिस्थीती असावी.
(सौजन्य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)