कृषी हवामान सल्ला; दिनांक १२ ते १८ एप्रिल २०२१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 12 ते 14 एप्रिल 2021 दरम्यान तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व हलक्या पावसाची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या माहितीनुसार मराठवाडयात सध्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला दिसून येत आहे म्हणून सर्व फळबाग, भाजीपाला, फुलझाडे व चारापिके यांना पाणी देण्याची गरज आहे जेणेकरून पिकांना पाण्याचा ताण बसणार नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 18 ते 24 एप्रिल, 2021 दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

ऊस पिकात खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. ऊस पिकात सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे.सध्‍याच्‍या काळात उशीरा लागवड केलेल्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघडयावर साठवण करू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता असल्यामूळे नवीन लागवड केलेल्या बागेत कलमांना काठीचा आधार द्यावा.डाळिंब बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील फुटवे काढावे. वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता असल्यामूळे नवीन लागवड केलेल्या बागेत कलमांना काठीचा आधार द्यावा.चिकू बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता असल्यामूळे नवीन लागवड केलेल्या बागेत कलमांना काठीचा आधार द्यावा.

भाजीपाला पिके

भाजीपाला पिकात (मिरची, वांगी, भेंडी) रसशोषन करणा-या किडींच्या व्यवस्थापनासाठी पायरीप्रॉक्झीफेन 5 % + फेनप्रोपॅथ्रीन 15 % 10 मिली किंवा डायमिथोएट 30 % 13 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भाजीपाला पिकात पाण्‍याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्‍यावी. वेलवर्गीय भाजीपाला पिके सध्‍या फळधारणा ते फळ वाढीच्‍या अवस्‍थेत आहेत. पिकास पाण्‍याचा ताण बसल्‍यास फुलगळ होते फुलगळ होऊ नये म्‍हणून पिकास नियमीत पाणी दयावे. काढणीस तयार असलेल्‍या खरबुज व टरबूज या पिकांची काढणी करावी.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

हंगामी फुलझाडांची लागवड केली असल्‍यास उन्‍हापासून रोपांचे संरक्षण करावे. तसेच रोपांना नियमित व वेळेवर पाणी दयावे. रोपांना ताण पडणार नाही याची काळजी घ्‍यावी.

 पशुधन व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.

चारा पिके

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

सामुदायिक विज्ञान

पांढऱ्या रंगाच्या भाज्या  व फळे जसे फुलकोबी, पेरू, लसुण, काकडी कर्करोगापासून बचाव करु शकतात. जांभळया भाज्या व फळे जसे अंजिर, लालकांदा, वांगे व जांभुळ यांचा आहारात समावेश केल्यामुळे पचनास मदत होते व रक्तदाबकमी होतो. तसेच या भाज्या व फळांमध्ये उच्च प्रतिचे ॲन्टिऑक्सीडेंट आहेत.

 सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी