कृषी हवामान सल्ला : १५ ते २१ जून २०२१

शेतकऱ्यांनी मौसमी पाऊस 75 ते 100 मिमी झाल्याशिवाय पेरणी करू नये.

मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी योग्य मौसमी पाऊस (75-100 मिमी) झाला असल्यास (औरंगाबाद जिल्हा : औरंगाबाद,‍ सिल्लोड ; बीड जिल्हा : माजलगाव, परळी, केज, वडवणी ;  हिंगोली जिल्हा : औंढा नागनाथ, वसमत, कळमनूरी, सेणगाव, हिंगोली ; जालना जिल्हा : आंबड, परतूर, मंठा ; उस्मानाबाद जिल्हा : लोहारा, भूम, परांडा ; परभणी जिल्हा : गंगाखेड, जिंतूर, मानवत, पालम, परभणी, पाथरी, पूर्णा, सेलू, सोनपेठ ; नांदेड जिल्हा : माहूर, लोहा, हिमायतनगर, अर्धापूर, भोकर, बिलोली, धर्माबाद, हादगाव, किनवट, मुतखेड, उमरी ; लातूर जिल्हा : चाकूर, देवणी, जळकोट, अहमदपूर) जमिनीतील ओलावा बधून वापसा आल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच  पेरणी करावी.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 20 जून ते 26 जून, 2021 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची,  किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस बियाण्यास थायरम 3 ग्रॅम प्रति किलोकिंवा कार्बोक्झिम 75% डब्ल्युपी 1.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात मिसळून बिजप्रक्रिया करावी. ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू प्रत्येकी  250 ग्रॅम प्रती 10 किलो बियाण्यावर बिजप्रक्रिया करावी. सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वी कार्बोक्झिम (37.5 %) + थायरम (37.5 %) डीएस (मिश्र घटक) या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो  बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. तसेच ट्रायकोडर्मा (8-10 ग्रॅम/कि.ग्रॅ. बियाणे) चा सुध्दा यासाठी वापर करावा. या बुरशीनाशकांच्या बिजप्रक्रियेनंतर बियाण्यास रायझोबियम जिवाणू खत ( ब्रेडी रायझोबियम) + स्फुरद विरघळविणारे जिवाणू खताची (पी.एस.बी.) 250 ग्रॅम प्रति 10 किलो किंवा 100 मिली/10 किलो ग्रॅम (द्रवरूप असेल तर) याची बिजप्रक्रिया करावी. तुर ‍बियाण्यास पेरणीपूर्वी कार्बोक्झिम (37.5 %) + थायरम (37.5 %) डीएस (मिश्र घटक) या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. तसेच ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबियम ‍जिवाणूसंवर्धक + स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक (पीएसबी) 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.मुग/उडीद पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो कार्बोक्झिम 1 ग्रॅम किंवा थायरम 2 ग्रॅम चोळावे तसेच ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया केल्यास बुरशीजन्य रोगापासून पिकाचे संरक्षण होते. त्याचबरोबर 10 किलो बियाण्यास जिवाणूसंवर्धक रायझोबियम व पीएसबी प्रति 250 ग्रॅम लावून बिजप्रक्रिया करावी.खरीप ज्वारी पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास गंधक 300 मेश 4 ग्रॅम किंवा थायरम 75 % 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पीएसबी) प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणात बियाण्यास चोळावे. तसेच इमिडाक्लोप्रीड 48 % 14 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.बाजरी पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास मेटालॅक्झील 35 % डब्ल्युएस 6 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. शेवटी ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पीएसबी) प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10  किलो बियाणे याप्रमाणात बियाण्यास चोळावे. मका पिकावरील लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी बियाण्यास सायएन्ट्रीनिलीप्रोल 19.80 टक्के + थायोमिथॉक्झम 19.80 टक्के 4 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. ॲझोटोबॅक्टर व स्फूरद विरघळविणारे जिवाणू (पीएसबी) प्रत्येकी 250 ग्रॅम व ट्रायर्कोडर्मा 50  ग्रॅम प्रति  10 किलो बियाणे याप्रमाणात बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. भुईमूग पिकास थायरम 5 ग्रॅम अथवा कॅप्टन/ कार्बेन्डॅझिम 2.5 ते 3 ग्रॅम  प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी व ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी व रायाझोबियम आणि स्फूरद विरघळविणारे जिवाणू (पीएसबी) प्रत्येकी 250 ग्रॅमची बिजप्रक्रिया करावी.

पशुधन व्यवस्थापन

पशुधनात (गाय, म्हैस) यांना लसीकरणाचे वेळापत्रक पुढीप्रमाणे आहे. 1. लाळ्या खुरकूत रोगाचे लसीकरण वर्षातून दोन वेळा लसीकरण करावे. 2. घटसर्प आणि फऱ्या रोगाचे (एकत्रित किंवा स्वतंत्र) पावसाळा सुरू होण्यापूर्वी लसीकरण करावे. 3. ब्रूसेललोसीस कॉटन प्रजाती 19 (3 ते 4 महिने) वयोगटातील वासरांसाठी. 4. फाशी रोग होत असलेल्या विभागात फाशी रोगाची लस 2 ते 3  किलोमिटर परिसरातील पशुधनास चक्राकार पध्दतीने करावे.

सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी