कृषी हवामान सल्ला : दि. १३ ते १७ नोव्हेंबर २१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड व बीड जिल्हयात दिनांक 13 व 14 नोव्हेंबर रोजी तर  बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 15 व 16 नोव्हेंबर रोजी तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमिटर) राहून पावसाची शक्यता आहे. तसेच परभणी व हिंगोली जिल्हयात दिनांक 14 व 15 नोव्हेंबर रोजी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील 3 ते 4  दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा पिकाच्या जोमदार वाढीसाठी पिक सुरूवातीपासून तण विरहीत ठेवावे. वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकात पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली कोळपणी करावी.गहू पिकाच्या वेळेवर पेरणीसाठी 100 ते 120 किलो तर उशीरा पेरणीसाठी 125 ते 150 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. दोन ओळीतील अंतर 22.5 सेंमी ठेवून पेरणी करावी.वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी भुईमूग पिकाची पेरणी करुन तीन आठवडे झाले असल्यास पहिली कोळपणी करावी.पूर्व हंगामी ऊसाची लागवड केली नसल्यास ती लवकरात लवकर म्हणजे 15 नोव्हेंबर पर्यंत करून घ्यावी.हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

 फळबागेचे व्‍यवस्‍थापन

लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. रसशोषणाऱ्या पतंगामूळे होणारे नूकसान टाळण्यासाठी फळांना पॉलिप्रोपीलीन नॉन ओव्हन किंवा बटर पेपर बॅगने झाकावे. झाकण्यापूर्वी तेलकट डागासाठी, पिठया ढेकून किंवा बागेतील किडींचा प्रादूर्भाव विचारात घेऊन योग्य जिवाणू नाशकाची, किटकनाशकची आणि बूरशीनाशकाची फवारणी करावी.काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी.

भाजीपाला

मिरची पिकावर रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या झेंडू फुलांची काढणी करून घ्यावी. पूर्नलागवडीस तयार असलेल्या शेवंतीच्या रोपांची पूर्नलागवड करावी.

चारा पिके

रब्बी हंगामासाठी लागवड केलेल्या ज्वारी, ओट, बरसीम, लसूण घास इत्यादी चारा पिकांना आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

तुती रेशीम उद्योग

बाजारात रेशीम कोषास चांगला भाव मिळण्यासाठी उत्तम प्रतीची कोष निर्मिती होणे आवश्यक आहे. एका कोषाचे वजन 1.5 ते 2.0 ग्रॅम हवे त्यासाठी 10 परिपक्व अळयांचे वजन 45 ग्रॅम पर्यंत हवे. उत्तम प्रतीच्या तुती पानाची त्यासाठी गरज असते. गोणपाट पोत्यात किंवा कॅरेट मध्ये भरून कोष नेत असताना कोष काढणी नंतर प्रतवारी करून घ्यावी. डबल कोष, डागाळलेले कोष, पोचट कोष आणि ओबडधोबड (वेगवेगळया आकाराचे) असणारे कोष वेगळे करून सर्व चांगले कोष वेगळे करावेत. सर्व कोष एकत्र असतील तर कमी भाव मिळतो व शेतकऱ्यांचे नूकसान होते.  कोष शासकीय खरेदी केंद्रातच विक्री करावे म्हणजे प्रति  किलो 50 रूपये अनुदानाचा  फायदा मिळतो. कडता घेतल्या जात नाही.

सामुदायिक विज्ञान

गर्भावस्थेत सुरूवातीच्या दोन महिन्यात गर्भाचे प्रमुख अवयव जसे की ऱ्हदय, मज्जातंतू नलिका, डोळे, नाक, कान, हात, पाय यांच्या प्राथमिक विकसनास सुरूवात होते. त्यामूळे अगदी सुरूवातीपासून गर्भवतीची सर्वतोपरी काळजी घेणे नितांत गरजेचे आहे.

सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी