कृषी हवामान सल्ला : २९ जाने. ते २ फेब्रुवारी’ २२

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील तिन ते चार दिवसात किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अंश सेल्सियस ने वाढ होण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला असल्यामूळे पिकास पाणी देण्याची आवश्यकता नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 02 ते 08 फेब्रुवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे फुलोरा अवस्थेतील हरभरा पिकामध्ये फुल गळ होऊ शकते यासाठी फुलोरा अवस्थेतील हरभरा पिकात 2% यूरीया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) याप्रमाणे फवारणी करावी. हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  गहू पिकात उत्पादन वाढीसाठी पेरणी नंतर 50 ते 55 आणि 75 दिवसांनी 19:19:19 या विद्राव्य खताची दोन किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून दोन फवारण्या घ्याव्यात. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. उन्हाळी सोयाबीन पिकात रसशोषण करणाऱ्या किडी (पांढरी माशी व तूडतूडे) याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम 12.6% + लॅबडा सायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी 2.5 मिली किंवा बिटासायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हंगामी ऊस पिकाची लागवड 15 फेब्रूवारी पर्यंत करता येते. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रूवारी महिन्या सूरूवात होते काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे संत्रा/मोसंबी बागेत खोडाभोवती अच्छादन करावे, बागेस संध्याकाळी पाणी द्यावे. बागेत 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किमान व कमाल तापमानातील तफावतीमूळे डाळींब बागेत फळे तडकण्याचे (क्रॅकींग) प्रमाण वाढू शकते,क्रॅकींग टाळण्यासाठी बागेत पाण्याचे योग्य नियोजन करावे. बागेत थोडेथोडे आणि संध्याकाळी चार नंतर पाणी द्यावे यामूळे बागेतील थंडी कमी राहण्यास मदत होईल.

 भाजीपाला

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे भाजीपाला पिकांचे थंडीपासून संरक्षण ‍ करण्यासाठी भाजीपाला पिकास सायंकाळी पाणी द्यावे. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.

फुलशेती

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे फुल पिकाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी फुलपिकास सायंकाळच्या वेळी पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

चारा पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम उद्योग

तुती पाने उत्पादन वाढीसाठी व प्रकाशाचा पुरेपुर वापर होण्यासाठी विपूल (गोदरेज) 20 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून छाटए नंतर 12 ते 15 दिवसांनी तुती बागेवर फवारणी करावी त्यामूळे पानांचे 20 टक्के उत्पादन वाढ मिळते. पानावर ठिपके किंवा करपा रोग  किंवा भुरी रोग प्रादूर्भाव असेल तर सोबत बाव्हेस्टीन बुरशीनाशक (कार्बेन्डाझीम) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसऱ्या वर्षापासून व्हि-1 जातीचे एकरी 25 टन पानाचे उत्पादन मिळते.

पशुधन व्यवस्थापन

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत.

सामुदायिक विज्ञान

घरातील फर्निचरच्या पायांना चाके असावीत, फर्निचर एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जाणे सोपे जाते.

सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी