प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. त्यानंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 26 डिसेंबर ते 01 जानेवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. रब्बी सूर्यफूल पिकात पानांवरील काळे ठिपके (अल्टरनेरीया) आढळून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी सूर्यफूल पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
सध्या किमान तापमानात झालेल्या घटीमूळे केळी पिकावर याचा परिणाम होऊ नये म्हणून बागेस सकाळी मोकाट पध्दतीने पाणी द्यावे. बागेभोवती कृत्रिम वारा रोधकाची व्यवस्था करावी. आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे सकाळी थंडी वाढल्यास द्राक्ष बागेत मण्यांचे क्रॅकींग होऊ शकते. द्राक्ष बागेतील मणी तडकू नये म्हणून बागेत पाण्याचे समायोजन योग्य करावे. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे संत्रा/मोसंबी बागेत मूळांची अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्रिया मंदावते त्यामूळे बागेत 13:00:45 किंव 00:00:50 15 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी भाजीपाला पिकास पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
तोडणीस तयार असलेल्या फुलपिकांची तोडणी करून घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
पशुधन व्यवस्थापन
थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत. मेंढयांमध्ये यकृतकृमी व ॲम्फीसटोमस या पर्णकृमी जन्य आजारांचा प्रादूर्भाव आढळून आलेला आहे. यामूळे प्रसंगी मेंढयांचा मृत्यू ओढवतो. सतत हगवण, गळयाखाली सूज, मलूल बनणे इत्यादी लक्षणे आढळल्यास मेंढयांची विष्ठा तपासून घ्यावी. विशेषत: ज्या मेंढया तळे, ओढा, नाला व इतर साचलेल्या पाण्याच्या काठच्या गवतावर चारल्या जातात अथवा अशा ठिकाणचे पाणी पितात त्यांच्यामध्ये हमखास लागण होते., म्हणून अशा आजाराची लागण झाल्यास मेंढयांना चरण्यासाठी इतरत्र हलवावे. अशा ठिकाणचे पाणी पिण्यास वर्ज करावे तसेच त्यांना पशूवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली नेहमी देतो त्यापेक्ष वेगळया जंतनाशक औषधाची मात्रा द्यावी. मेंढयांना इतर सूश्रूषा जसे की यकृत टॉनिक्स ईत्यादी द्यावे.
सामुदायिक विज्ञान
वनामकृवि विकसित टिकाई बॅगचा वापर करून गलांडा फुले तोडले असता कामगारांचा कामाच वेग व कार्यक्षमता वाढते, तर वेळेचाभार तसेच फुले तोडणी करतांना जाणवणारे श्रम हे लक्षणीय रित्या कमी होतात.
सौजन्य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी