कृषी हवामान सल्ला : २९ डिसेंबर २१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन ते तिन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 28  डिसेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किलोमीटर)  राहून  हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 किलोमीटर)राहून  हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेलया तूर पिकाची काढणी व कापूस पिकाची वेचणी करावी व मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 29 डिसेंबर 2021 ते 04 जानेवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकास मुकूट मुळे फुटणे म्हणजेच पेरणी नंतर 18 ते 21 दिवसांनी पाणी द्यावे. रब्बी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. रब्बी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे व तूडतूडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची  किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8% 2.5 मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% (संयूक्त किटकनाशक) 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.   उशीरा लागवड केलेल्या हळद पिकावर पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. लिंबूवर्गीय फळ पिकांत काळी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मृगबहार (मे-जून) तोडणीस तयार असलेल्या फळांची तोडणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकांचे थंडीपासून संरक्षण ‍ करण्यासाठी भाजीपाला पिकास पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी. पूर्नलागवड केलेल्या फुलपिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

पशुधन व्यवस्थापन

थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावे, तसेच त्यांना थंडीपासून संरक्षणासाठी कोरडी/उबदार जागेची व्यवस्था करावी. हिवाळयात जनावरांना उर्जेची गरज भागविण्यासाठी नियमितपणे जनावरांना खारटमिश्रणासह मिठ व गव्हाचे धान्य, गूळ इत्यादी 10 ते 20 टक्के प्रति दिवस द्यावे.

तुती रेशीम उद्योग

रेशीम कीटक संगोपनासाठी तापमान व आर्द्रता मर्यादित ठेवणे गरजेचे असून यशस्वी कोष उत्पादनात संगोपन गृहातील हवामानाचा 36 टक्के वाटा आहे. तुती पानाचा वाटा 40 टक्के असून हिवाळयात रॅकवर निळे पॉलीथीन अच्छादन टाकावे. तापमान वाढीसाठी कोळशाची शेगडीचा (धूर रहित) किंवा रूम हिटरचा वापर करावा. 20 अं.सें. पेक्षा कमी किंवा 35 अं.सें.पेक्षा जास्त तापमानात रेशीम कीटकांची शरीरक्रिया मंदावते व खाद्य बंद होते त्यामूळे कच्या शेडनेट गृहास हळूहळू पक्या आरसीसी संगोपन गृहात बदलणे आवश्यक आहे.

सामुदायिक विज्ञान

वनामकृवि विकसित वांगी मोजा व भेंडी मोजा भाजी तोडणी कार्यातील शेतकरी महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी व कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयूक्त आहे.

  सौजन्‍य :  डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी