प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ ते अंशत ढगाळ राहील.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पिकाच्या आवश्यकतेनुसार पिकात पाणी व्यवस्थापन करावे. उन्हाळी भुईमूग पिकात रस शोषण करणाऱ्या (फुलकिडे, मावा, तुडतुडे) किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के ०२ मिली किंवा थायमिथोकझाम १२.६ टक्के + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५ टक्के ०३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी करून घ्यावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी करून घ्यावी.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन लागवड केलेल्या केळी बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. केळी बागेत पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. आंबा बागेत पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बागेत फळगळ दिसून येत असल्यास ५० पीपीएम जिर्बलिक असिड ची फवारणी करावी. आंबा बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. मुख्य खोड लगत भुसा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील अळ्या काढून नष्ट कराव्यात व छिदामध्ये पेट्रोलमध्ये बुडविलेला बोळा किंवा क्लोरोपायरीफॉस द्रावणाचा (२ मिली प्रती लिटर पाणी) बोळा टाकावा व छिद्र शेणाने अथवा मातीने लिपून घ्यावे. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी. नवीन लागवड केलेल्या सीताफळ बागेत खोडाजवळ आच्छादन करावे.
भाजीपाला पिके
वेलवर्गीय भाजीपाला पिकात नाग अळी/पाने पोखरणारी अळी चा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी सायांट्रॅनिलिप्रोले १०.२६% १८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकात तणनियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे.काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करावी.
फुलशेती व्यवस्थापन
फुल पिकात तणनियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.
तुती रेशीम उद्योग
सेंदीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हैसूर यांच्या शिफारशीनुसार रेशीम किटकावरील उझी माशीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने करणे गरजेचे आहे.उझीसाइड, स्टिकीटाय, निसोलायनेक्सचा जैविक उपाय व उझीट्राय या सर्व पर्यायांचा एकत्रित वापर केला तर ८४% पर्यंत उझी माशीचे नियंत्रण होते. सर्व खिडक्या दरवाज्यांना नायलॉन वायरमेश जाळी लावणे आवश्क असून दरवाजे अपोआप बंद होण्याची व्यवस्था करणे रॅकला चोहीबाजुने नायलॉन वायर मेशने अच्छादिन करणे त्याच बरोबर संगोपन गृह प्रवेश द्वारा बाहेर नायलॉन वायर मेशचा वापर करून १०’ x १०’ आकाराचे अँटीचेम्बर तयार करणे म्हणजे शेतातून तुतीपाला आणल्यानंतर सरळ संगोपन गृहात न आणता १ ते २ तास अँटीचेम्बर मध्ये ठेवावे. अँटीचेम्बर अंधार खोली सारखे करावे म्हणजे उझी माशी बाहेरच्या बाजूस उडून निघून जाईल.
सामुदायिक विज्ञान
गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात गर्भाचे प्रमुख अवयव जसे कि हृदय,मज्जातंतू नलिका,डोळे,नाक, कान, हात,पाय यांच्या प्राथमिक विकसनास सुरुवात होते.त्यामुळे अगदी सुरुवातीपासून गर्भवतीची सर्वतोपरी काळजी घेणे नितांत गरजेचे आहे.
(सौजन्य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)