कृषि हवामान सल्ला, २३ ते २८ फेब्रुवारी २१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहील.  आजपासून पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करावी.उशिरा पेरणी केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी  डायमेथोट 30 % 13 मीली किंवा असिफेट 75 %  10 ग्राम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हंगामी ऊस पिकाची लागवड करून एक महिन्याचा कालावधी झाला असल्यास नत्राची दुसरी मात्रा 40 % नत्र (100 किलो नत्र प्रति हेक्टरी) देउन पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

आंबे बहार मोसंबी बागेत 400 ग्राम नत्र प्रती झाड व आंबे बहार संत्रा बागेत 500 ग्राम नत्र प्रती झाड खताची मात्रा बांगडी पध्दतीने देऊन बागेत पाणी व्यवस्थापन करावे. आंबे बहार डाळिंब बागेत 300 ग्राम नत्र प्रती झाड खताची मात्रा बांगडी पध्दतीने देऊन बागेत पाणी व्यवस्थापन करावे.चिकू बागेत फळ गळ होऊ नये म्हणून बागेस पाणी द्यावे.

भाजीपाला पिके

पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळी भाजीपाला पिकांची लागवड तसेच पुनर लागवडीसाठी तयार असलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांची पुनर लागवड करून पाणी व्यवस्थापन करावे.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

पुनर लागवडीसाठी तयार असलेल्या जिलारर्डीयाच्या रोपांची पुनर लागवड करुन पाणी व्यवस्थापन करावे.

पशुधन व्‍यवस्‍थापन

मागील आठवडयात झालेल्या गारपीटीमुळे जनावराच्या शरीरावर गारांचा मार लागल्यामुळे जखमा झाल्या असल्यास, जखमांचे स्वरूप पाहुण त्या पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणाने किंवा आयोडीनच्या द्रावणाने स्वच्छ धुवून, त्यांची मलमपटटी करावी. गारपीटग्रस्त जनावरांना त्वरीत सकस व प्रोटीन आणि उर्जायूक्त आहार पुरवणे आवश्यक असते. पाण्यातून क्षार, गुळ, मिसळून द्यावा. तसेच ताण प्रतिरोधक औषधी  (जसे की स्ट्रेसनेल) आणि रोग प्रतिकार शक्ती वाढविणारी औषधी (इम्यूनोस्टीम्यूलंट्स) पाण्यामधून द्यावीत. नजीकच्या पशुवैद्यकाशी संपर्क साधून पुढील उपचार करावेत जसे की, प्रतिजैवकाची मात्रा व इतर.

सामुदायिक विज्ञान

दुधामध्ये कॅल्शीयम हाडांसाठी आवश्यक असते आणि प्रथिने हे स्नायूंच्या बळकटीकरण करण्याकरीता आवश्यक आहे. सकाळी दुध घेतल्या नंतर दिवसभर ताजे वाटते. दुधामध्ये झिंक आणि व्हिटामीन डी असल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारे अन्न असे समजले जाते म्हणून एका प्रौढ पुरूषाने 200 मिली दुध रोज घेतले पाहिजे.

 चारा पिके

मका पिकावरील लष्‍करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्‍यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी इमामेक्‍टीन बेन्‍झोएट 5 % 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रती 10 लिटर पाण्‍यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी