कृषी हवामान सल्ला; १२ ते १६ डिसेंबर, २०२०

मराठवाड्यात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहण्याची शक्यता 

मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहून किमान तापमान १४.० ते १९.० सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिक वेचणी अवस्थेत असून कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराटया  जमा करून त्यांची योग्य ती विल्हेवाट लावावी.तूर पिक शेंगा वाढणे अवस्थेत असून उशीरा पेरणी केलेल्या तूर पीकाला पाण्याच्या उपलब्धतेनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तूर पिकाच्या  दीर्घकालीन वाणात अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क़्विनॉलफॉस २५ % २० मिली किंवा इमामेक्टीन  बेन्झोएट ५ % ४.४ ग्राम प्रती १० लिटर  पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 रब्बी ज्वारी पिक वाढीच्या अवस्थेत असून रब्बी ज्वारी पिकाला पाण्याच्या उपलब्धतेनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. उगवण झालेल्या रब्बी ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम १२.६ % + ल्यामडा सायहालोथ्रीन ९.५ झेडसी ५ मिली किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिक पेरणी अवस्थेत असून वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाला पाण्याच्या उपलब्धतेनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. उशीरा बागायती गहू पिकांची पेरणी १५ डिसेंबर पर्यंत करता येते. उशीरा बागायती गहू पिकांच्या पेरणीसाठी निफाड-३४, एचडी-२५०१, एचडी-२८३३ किंवा समाधान या वाणाची निवड करावी. उशीरा बागायती गहू पिकांच्या पेरणीसाठी ८०:४०:४० किलो नत्र, स्फुरद व पालाश खताची शिफारस आहे त्यापैकी पेरणी वेळी अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद व पालाश खत मात्रा द्यावी.  वेळेवर पेरणी केलेल्या गहू पीकाला पाण्याच्या उपलब्धतेनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी पिक घड बाहेर पडणे अवस्थेत असून  मृग बाग लागवड केलेल्या केळी बागेत सिगाटोगा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनाझोल १० मिली + स्टिकर प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बाग घड बाहेर पडणे अवस्थेत असताना झाडांना काठीचा आधार द्यावा. आंबा पिक वाढीच्या अवस्थेत असून आंबा बागेत तण नियंत्रण करावे. द्राक्षे पिक फुलोरा अवस्थेत असून आवश्यकतेनुसार द्राक्षे बागेत पाणी व्यवस्थापन करावे.  द्राक्षे बागेत पिठ्या ढेकूणच्या जैविक नियंत्रणासाठी व्हर्टीसिलियम लकेनी  ४० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

फुल शेती काढणी अवस्थेत असून पुनर्लागवड केलेल्या फुल पिकात तण व्यवस्थापन करून पाणी  व्यवस्थापन करावे. काढणीस आलेल्या फुलांची आवश्यकतेनुसार  काढणी करून घ्यावे.

भाजीपाला पिके

भाजीपाला पीक वाढीच्या अवस्थेत असून रब्बी हंगामात लागवड केलेल्या भाजीपाला पिकात पाणी व्यवस्थापन करावे. वांगे भाजीपाला पीकात  शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा  प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी  शेतात एकरी २ कामगंध सापळे लावावे किंवा  क्लोरंट्रानिलीप्रोल १८.५ % एससी ४ मीली किंवा क्लोरपायरीफॉस २० %  एससी २० मीली किंवा सायपरमेथ्रीन   १० %  ईसी ११ मीली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुती रेशीम उद्योग

ढगाळ हवामानामुळे रेशीम कीटक संगोपनगृहातील तापमान २० अंश च्या खाली असेल तर कीटक तुती पाने खात नाहीत तसेच २५ ते २८ सें. मर्यादित ठेवण्यासाठी  संगोपनगृहात कोळसा शेगडी धूर रहित किंवा इलेक्ट्रीक रूम हिटरचा वापर करावा. तरच रेशीम कीटक तुती पाने खारतात व त्यांची चांगली वाढ होते. तापमान मर्यादित ठेवण्या बरोबर आद्रता ८०-८५ % ठेवण्यासाठी ह्युमिडी फायर चा वापर करावा म्हणजे चांगले कोषाचे उत्पादन वाढ होईल.

 

सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी