कृषी हवामान सल्ला : ५ ते ९ फेब्रुवारी २२

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील दोन दिवसात किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सियस ने घट होऊन नंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असून जमिनितील ओलावा कमी झालेला असल्यामूळे पिकाच्या संवेदनशील अवस्थेनूसार पिकास पाणी देण्याची आवश्यकता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 09 ते 15 फेब्रुवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात घट होण्याचा अंदाज लक्षात घेता संत्रा/मोसंबी बागेत खोडाभोवती अच्छादन करावे, बागेस संध्याकाळी पाणी द्यावे. बागेत 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  किमान व कमाल तापमानातील तफावतीमूळे डाळींब बागेत फळे तडकण्याचे (क्रॅकींग) प्रमाण वाढू शकते,क्रॅकींग टाळण्यासाठी बागेत पाण्याचे योग्य नियोजन करावे. बागेत थोडेथोडे आणि संध्याकाळी चार नंतर पाणी द्यावे यामूळे बागेतील थंडी कमी राहण्यास मदत होईल.

भाजीपाला

किमान तापमानात घट होण्याचा अंदाज लक्षात घेता भाजीपाला पिकांचे थंडीपासून संरक्षण ‍ करण्यासाठी भाजीपाला पिकास सायंकाळी पाणी द्यावे. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.

फुलशेती

किमान तापमानात घट होण्याचा अंदाज लक्षात घेता फुल पिकाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी फुलपिकास सायंकाळच्या वेळी पाणी द्यावे.

चारा पिके

चारा पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम उद्योग

तुतीबागेत केसाळ अळी (बिहार हेअरी केंटर पिलर) याचा प्रादुर्भाव हिवाळयात जाणवतो. पानांवर पुंजक्यात 200 ते 300 अळया अंडयातुन फुटून बाहेर येतात व पानांवर उपजिवीका करतात यामुळे पानांची चळणी झालेली दिसते. याच्या व्यवस्थापनासाठी किटकनाशक न फवारता भौतीक पध्दतीने म्हणजे हाताने प्रादुर्भावग्रस्त पाने तोडावेत व अळया रॉकेलमध्ये बुडवून नियंत्रण करावे.

पशुधन व्यवस्थापन

किमान तापमानात घट होण्याचा अंदाज लक्षात घेता थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत.

सामुदायिक विज्ञान

बालक जेव्हा अपेक्षेप्रमाणे चांगली कृति करतात, तेव्हा पालकांनी त्यांचे लगेच कौतूक करावे. म्हणजे पुन्हा पुन्हा चांगल्या कृती करण्यास बालकास प्रेरणा ‍मिळते.

सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी