कृषि हवामान सल्ला; 30 मार्च ते 4 एप्रिल 2021

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते अंशत: ढगाळ राहील. पुढील पाच दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानूसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 30 मार्च ते 10 एप्रिल 2021 दरम्यान कमाल तापमान 38.0 ते 42.0 अं. से. राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करूण साठवणूक करावी.काढणी केलेल्या करडई पिकाची मळणी करूण साठवणूक करावी.उस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी.हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. संत्रा / मोसंबी बागेत फळ गळ होऊ नये म्हणून जिब्रॅलीक ॲसीड 1.5 ग्राम 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.डाळिंब बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील फुटवे काढावे.चिकू बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी.

भाजीपाला पिके

कमाल तापमानात होत असलेल्‍या वाढीमुळे भाजीपाला पिकास जमिनीच्‍या प्रकारानुसार दोन पाण्‍याच्‍या पाळयातील अंतर कमी करावे. भाजीपाला पिकास पाणी शक्यतो सुक्ष्म सिंचन पध्दतीने सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

फुल पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. मोगरा फुलांची तोडणी सकाळी लवकर करावी.

 पशुधन व्‍यवस्‍थापन

उन्‍हाळी हंगामात हवा गरम होऊन तापमान वाढते. पशुधनाच्‍या शेडच्‍या पत्र्यावर गवताचे किंवा ऊसाच्‍या पाचटाचे आच्‍छादन केल्‍यास शेडचा पत्रा तापत नाही. या प्रक्रियेमुळे शेडमधील तापमान योग्‍य राहण्‍यास मदत होते. आच्‍छादनावर पाणी शिंपडल्‍यास अथवा फवारा सिंचन केल्‍यास शेडमधील तापमान थंड राहण्‍यास मदत होते. यामुळे दुभत्‍या जनावरांचे दुध उत्‍पादन वाढते.

चारा पिके

उन्‍हाळी हंगामासाठी लागवड केलेल्‍या चारापिकात सुक्ष्‍म सिंचन पध्‍दतीने पाणी व्‍यवस्‍थापन करावे.

सामुदायिक विज्ञान

स्वस्थ जीवनासाठी आवश्यक बाबी : वजन उंची आणि वयानुसार प्रमाणात ठेवा. ताण तणावापासून दूर रहा. नियमित व्यायाम करा. पुरेशी झोप घ्या. नियमित चेकअप करा. औषधे नियमित घ्या. मद्यपान आणि धुम्रपान करू नका.

 (सौजन्‍य :  डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)