माणसाच्या दैनंदिन व्यवहारातून विविध प्रकारच्या टाकाऊ वस्तू तयार होत असतात. यापैकी माणसाचा मैला, मूत्र व सांडपाणी या वस्तू वगळून इतर टाकाऊ वस्तूंना ‘घनकचरा’ हे नाव आहे. मनुष्याच्या घरगुती अथवा व्यावसायिक व्यवहारातून निर्माण होणार्या व त्यांच्या पूर्ण वापरानंतर वापरणार्याच्या दृष्टीने निरुपयोगी भासणार्या जैविक व अजैविक वस्तूंचे मिश्रण म्हणजे ‘घनकचरा’ होय. योग्य व्यवस्थापन केल्यास हा कचराही कांचन ठरू शकतो.
घनकचरा समस्येची सद्यःस्थिती
ङ्क्षआज भारतामध्ये घनकचरा या विषयाकडे सामान्य नागरिकांकडून विशेष गांभीर्याने पाहिले जात नाही. ग्रामपंचायती, नगरपालिका वा महानगरपालिका यांच्याकडूनदेखील या विषयाला आवश्यक तितके महत्त्व दिले जात नाही. नागरिक व प्रशासन दोघांकडूनही हा विषय शास्त्रशुद्ध पद्धतीने हाताळला जात नाही. त्यामुळे ही समस्या आपल्याकडे टिकून आहे.
पारंपरिक भारतीय जीवनशैलीमध्ये कचरा कमीत कमी होईल, याचे भान होते; परंतु सद्यःस्थितीमध्ये झपाट्याने बदलणारी जीवनशैली, वेगाने वाढणारे शहरीकरण, वापरा व फेका या पाश्चात्य जीवनशैलीचे वाढते आक्रमण, बाजार व बाजारू वस्तूंचे सतत बदलणारे स्वरूप व जाहिरातबाजी या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे आपल्या देशात कचर्याचे प्रमाण वाढले आहे व कचर्याचे स्वरूपही बदललेले आहे. यामुळे घनकचर्याच्या समस्येची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. घनकचरा समस्येतील धोके, त्यांची तीव्रता व जबाबदारीची जाणीव सर्व थरांतील नागरिकांना करून देणे; तसेच सर्व प्रकारच्या घनकचर्याची शास्त्रीय; परंतु सोप्या व सुयोग्य पद्धतीने हाताळणी करणे ही आज काळाची गरज बनली आहे.
घनकचर्याचे स्वरूप ः
घनकचर्याचे वजन व स्वरूप हे नागरिकांची आर्थिक स्थिती, सामाजिक स्तर व जीवनशैली यानुसार बदलते, यात विरोधाभासाची गोष्ट आहे की, सामाजिकदृष्ट्या ज्यांना विकसित समजले जाते त्यांच्याकडून निर्माण होणार्या कचर्याचे प्रमाण हे तथाकथित अविकसित समाजापेक्षा कितीतरी जास्त असते. सर्वसाधारणपणे शहर विभागात प्रति व्यक्ती प्रतिदिन 700 ग्रॅम ते 1000 ग्रॅम कचरा निघतो. ग्रामीण भागात हेच प्रमाण 300 ते 400 ग्रॅम असते, तर आदिवासी भागात अत्यल्प म्हणजे प्रति व्यक्ती प्रतिदिन 50 ते 100 ग्रॅम कचरा निघतो.
घनकचर्याचे प्रकार ः
घनकचर्याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.
अ) विघटनशील अथवा जैविक कचरा ः यामध्ये भाजीपाल्याचा कचरा, खरकटे, पालापाचोळा, गोठ्यातील कचरा, शेतातील कचरा, धूळ इत्यादींचा समावेश होतो. या कचर्याचे विविध प्रकारांनी कम्पोेस्टमध्ये रूपांतर करता येते.
आ) अविघटनशील अथवा अजैविक कचरा ः यात प्लॅस्टिक, काच, कपडा, कागद, धातू इत्यादींचा समावेश होतो. याचे कम्पोेस्टमध्ये रूपांतर होऊ शकत नाही. मात्र, यातील बर्याच घटकांचा पुनरुपयोग अथवा पुनर्चक्रीकरण करणे शक्य असते.
व्यावसायिक कचरा ः वेगवेगळ्या व्यवसायांमधून विविध प्रकारचा कचरा निघत असतो. व्यवसायाच्या स्वरूपानुसार हा कचरा भिन्न स्वरूपात असतो. उदा. भाजीबाजारातील कचरा, दुकानांमधील कचरा, हॉटेल्स्मधील कचरा, हॉस्पिटल्समधील कचरा, कत्तलखान्यांमधील कचरा, विविध उद्योगांमधील औद्योगिक कचरा. या कचर्यांचे स्वरूप भिन्न असल्यामुळे त्या प्रत्येकाची व्यवस्थाही भिन्न प्रकारेच करणे आवश्यक ठरते.
घनकचर्यापासून धोके ः
घनकचर्याची शास्त्रीय पद्धतीने व्यवस्था न झाल्यास त्यापासून अनेक प्रकारचे गंभीर धोके व दुष्परिणाम संभवतात. हे धोकेदेखील कचर्याच्या प्रकारानुसार भिन्न स्वरूपाचे असतात.
अ) विघटनशील कचर्यापासून धोके ः हा कचरा एका जागी साठल्यास थोड्याच अवधीत कुजू लागतो व त्याची दुर्गंधी सुटते. यामुळे विविध प्रकारचे किटक (माशा, झुरळे इ.) तसेच उंदीर, घुशी, डुकरे हे प्राणी त्याकडे आकर्षित होतात. त्यांची प्रजा वाढवण्यासही कचर्याचा उपयोग होतो. या प्राण्यांमुळे व प्रत्यक्ष कुजणार्या कचर्यामुळे पाणी, जमीन, हवा व अन्न हे घटक प्रदूषित होतात. अशा प्रदूषणामुळे मानवी वस्तीभोवती गलिच्छता तर वाढतेच; पण विविध रोगांचा प्रसारही यामुळे होतो.
ब) अविघटनशील कचर्यापासून धोके ः प्लॅस्टिक, काच, धातू यासारखे टाकाऊ पदार्थ कचर्यात आल्यास त्यापासून माणसाला विशेषतः कचरा हाताळणार्यांना दुखापत होऊ शकते. प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये घरातील जैविक कचरा भरून टाकल्यास जनावरे हा कचरा खाताना त्यांच्या पोटात या पिशव्या जाण्याचे प्रमाण मोठे आहे.
क) व्यावसायिक कचर्यापासून धोके ः विविध व्यवसायांमधून जो विघटनशील कचरा निघतो, त्यापासून वरीलप्रमाणे धोके मोठ्या प्रमाणावर संभवतात. त्याचबरोबर विविध उद्योगांमधून जो रासायनिक कचरा निघतो त्याने प्रदूषणाचे व आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. हॉस्पिटल्स् व दवाखाने यामधून निघणार्या कचर्यांपासून तर विविध रोगजंतूंचा प्रसार होण्याचा धोकादेखील मोठा आहे.
कचर्यांपासून फायदे ः या जगात खरे तर टाकाऊ अशी एकही वस्तू नाही. या म्हणीनुसार कचरादेखील टाकाऊ ठरत नाही. घनकचर्यांकडे कल्पक व शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास असे दिसते की, यातील जवळजवळ सर्व घटकांचा पुनरुपयोग अथवा पुनर्चक्रीरण करणे शक्य आहे. यामुळे तिहेरी फायदे होतात.
1) कचरा हाताळणीचा प्रश्न सोपा होतो. 2) आरोग्याचे व प्रदूषणाचे प्रश्न सुटतात. 3) मोठा आर्थिक फायदा होतो.
आजकाल वाढत्या शहरीकरणामुळे व कचर्याच्या वाढत्या प्रमाणामुळे कचरा नष्ट करण्याची प्रवृत्ती वाढते आहे; परंतु याउलट कचर्यातील विविध घटकांचे पुनर्चक्रीकरण करणे ही काळाची निकडीची गरज आहे. म्हणूनच घनकचर्याची विल्हेवाट ही जुनी संकल्पना बदलून घनकचर्याचे व्यवस्थापन ही नवी शास्त्रीय संकल्पना रुजवणे महत्त्वाचे आहे.
घनकचर्याचे घरोघरी पुनर्चक्रीकरण केल्याने थोडाफार आर्थिक लाभ नक्कीच होऊ शकतो. त्याचप्रमाणे गावागावांमधून हा एक नवा व्यवसाय उभा राहू शकतो, ज्यातून बेरोजगार युवकांना वा महिलांना उत्पन्नाचे एक नवे साधन मिळू शकते.
घनकचरा व्यवस्थापनाची मूलतत्त्वे ः 1) जीवनशैलीतील बदल जसे – अ) कचरा कमीत कमी निर्माण करणे, आ) वस्तूचा जास्तीत जास्त पुनरुपयोग करणे, इ) कचर्याचे शक्य तितके पुनर्चक्रीकरण.
2) कचर्याच्या निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण (प्रामुख्याने विघटनशील व अविघटनशील घटक वेगळे करणे), 3) निर्मितीच्या ठिकाणापासून जवळजवळ प्रक्रिया, 4) विकेंद्रित स्वरूपात छोटी प्रक्रिया केंद्रे, 5) विशिष्ट व्यावसायिक कचर्याची विशेष हाताळणी.
घनकचरा व्यवस्थापनाची प्रत्यक्ष कार्यवाही ः अ) घनकचरा व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष स्वरूप, आ) लोकसहभाग
घनकचरा व्यवस्थापनासारखा दुर्लक्षित विषय समाजात रुजविण्यासाठी लोकसहभाग हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यासाठी पुढील उपाय अवलंबिणे शक्य आहे.
1) प्रभावी लोकप्रबोधन ः घनकचर्याच्या अव्यवस्थेमुळे निर्माण झालेले धोके, घनकचर्याच्या व्यवस्थापनामुळे होणारे फायदे, घनकचरा व्यवस्थापनाच्या शास्त्रीय पद्धती या सर्वांची माहिती लोकांना होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी 1) प्रशिक्षण, 2) प्रात्यक्षिके, 3) विविध माध्यमांचा उपयोग करून जनजागृती इत्यादी उपाय अवलंबता येतील. शाळा, महाविद्यालये, महिला मंडळे व युवा मंडळे अशा ठिकाणी प्रभावी लोकप्रबोधन होऊ शकते.
2) दंडयोजना ः लोकप्रबोधन व सोयींची उभारणी चांगल्याप्रकारे झाल्यानंतर त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये विविध दंडयोजनांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यायोगे आम समाजाला घनकचरा व्यवस्थापनाची शिस्त व योग्य वळण लागेल.
-श्रीकांत नावरेकर