कडूलिंबाचे झाड एक; अनेक उपयोग

सर्वत्र आढळणारे कडू लिंबाचे झाड निंब व नीम या नावांनी ओळखले जाते. पुरातन काळापासून आयुर्वेद औषधांमध्ये याचा उपयोग होत आला आहे. मेलिएसी (म्हणजे निंब) कुलातील हा वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव अ‍ॅझॅडिराक्टा इंडिका असे आहे. द. भारत, कर्नाटक, श्रीलंका, मलेशिया व ब्रह्मदेश या प्रदेशांत म्यानमार हा वृक्ष आढळतो.

कडू लिंब: पाने व फुलोरा
मध्यम आकाराच्या कडू लिंबाच्या वृक्षाची उंची सु. १५-२० मी. तर विस्तार २-३ मी. असतो. पाने हिरवीगार, एकाआड एक, संयुक्त व विषमदली असून फांद्यांच्या टोकास वाढतात. तसेच ती समोरासमोर, तळाशी तिरपी व भाल्यासारखी दातेरी असतात. फुले लहान व पिवळसर पांढरी असून मार्च ते मे मध्ये गुच्छाने येतात. फळे (लिंबोळ्या) हिरवी-पिवळी व १.५ सेंमी. लांब आठळीयुक्त असून उन्हाळ्याच्या मध्यावर येतात. बिया लंबवर्तुळाकार असून बीजपत्रे जाड आणि तेलकट असतात.

अनेक उपयोग
कडू लिंबाच्या झाडांचे अनेक उपयोग असून त्याचा प्रत्येक भाग उपयोगी आहे. डासांना तसेच कीटकांना पळवून लावण्यासाठी त्याच्या पानांचा उपयोग पूर्वीपासून होत आहे. खोडाची तसेच मुळाची साल कडवट असून रक्तस्त्राव थांबविण्यासाठी उपयुक्त आहे.
खोडातून पाझरणारा डिंक औषधी असून त्वचारोगावर वापरतात. याच्या डिंकाचे लाडू बाळंतपणात देण्यात येतात. पाने वातशामक व मूत्रल असून त्यांचा उपयोग श्वासनलिकांमधून स्त्रवणारा कफ कमी करण्यासाठी होतो. पानांचा काढा हिवतापावर उपयोगी असून यकृताचे कार्य सुलभतेने होण्यास मदत करतो. कडू लिंबाची पाने व खोड कुष्ठरोगावर औषध म्हणून वापरतात. पोटिस बांधणे, वाफेने शेकणे, मलम तयार करून वापरणे इत्यादींसाठीही पानांचा उपयोग करतात.

जखमा, त्वचेचे रोग, व्रण, आतड्यातील जंत, मधुमेह इत्यादींवर कडू लिंबाच्या काढ्यांचा उपयोग केला जातो. त्याच्या खोडाचा व लिंबोळ्यांचा वापर मूळव्याधीसाठी करतात. तसेच डहाळीचा वापर दात घासण्यासाठी पूर्वीपासून केला जात आहे. त्यापासून काढलेला रस दंतधावनाचा (टूथ पेस्टचा) एक घटक म्हणून वापरतात.