Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

नैसर्गिक शेतीची पंचसूत्री

नैसर्गिक शेतीचे वेगळेपण काय ? नैसर्गिक शेतिमध्ये काही विशेष आहे का ? होय, नैसर्गिक शेतीमध्ये खुप साऱ्या गोष्टी रासायनिक शेतीपेक्षा वेगळ्या आहेत. नैसर्गिक शेतीचे वेगळेपण आपण पाहू:

१. बियाणे निवड:

नैसर्गिक शेतीमध्ये भरपूर उत्पादनाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या महागड्या बियाण्याची विक्री केली जात नाही, अशी महागडी बियाणे फ़क्त खोट्या जाहिराती मध्येच २ ते ४ वर्ष भरपूर उत्पादन देताना दिसतात व नंतर त्यांचा खोटारडेपणा समोर येतो पण तोपर्यंत जाहिराती मध्ये नवीन भरपूर उत्पादन देणारे बियाणे येते व शेतकरी पून्हा ठगला जातो या चक्रातच शेतकरी कंगाल होत जातो. नैसर्गिक पद्धतिमध्ये अशी बियाणे वापरली जातात जी हजारो वर्षापासून शेतिमध्ये भरपूर उत्पादन देत आली आहेत. आजही भारतामध्ये अशी पारम्पारीक बियाणे आहेत जे या कंपन्याच्या बियाण्यापेक्षा खुप जास्त उत्पादन देतात. फ़क्त अशी बियाणे दुर्लक्षित राहिली व त्यांची जाहिरात झाली नाही. अशी बियाणे आता नैसर्गिक शेतीमुळे समाजासमोर येत आहेत.

२. लागवडीतील अंतर:

नैसर्गिक शेतीमध्ये जास्तीत जास्त रोपांची संख्या वाढवून आपले उत्पादन वाढवण्याची कृषीविद्यापीठांची मूर्खपणाची शिकवण स्वीकारली जात नाही. या पद्धतिने कित्येक शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे यामुळे झाडे भरपूर वाढतात पण त्याला फळे लागत नाहीत, झाडाचे पोषण व्यवस्थित होत नाही व किडिन्चा प्रभाव वाढतो. कृषी विद्यापीठांच्या विक्रमी उत्पादन काढण्याच्या व काहीतरी नवीन करुण दाखवण्याच्या उचापतीमुळे कित्येक शेतकऱ्यांना आपल्या बागा फळ लागत नसल्यामुळे नष्ट कराव्या लागल्या याची कित्येक उदाहरणे आहेत.

३. पाणी व्यवस्थापन:

नैसर्गिक शेतीमध्ये पिकांच्या मुळाशी पाणी सोडलं जात नाही कारण मुळीजवळ पाणी सोडल्यामुळे मुळी आपले काम करणे बंध करते व पिकांची पाने पिवळी पडू लागतात याउलट नैसर्गिक शेतीत वापसा स्थिति ठेवण्यावर भर दिला जातो. ज्याप्रमाणे जंगलातील झाडे वर्षातील आठ महीने पाणी नसतानाही फळाफुलांनी बहरलेली असतात त्याप्रमाणे जेंव्हा आपण शेतांमध्ये आच्छादन करतो तेंव्हा १ किलो काडीकचरा हवेतील १ लिटर पेक्षाही जास्त पाणी शोषण करते.हे पहायचे असेल तर उन्हाळ्यात रात्री वाळलेल्या गवताची पेंढी उचलून पहा ती तुम्हांला ओली दिसेल व त्याखालची मातीही ओली दिसेल. ही गोष्ठ सामान्य माणूसही प्रयोग करून समजू शकतो पण इतकी महत्त्वपूर्ण गोष्ट कृषी विद्यापीठानी आपल्या शेतीत का रुजवली नाही यावरून समजते की कृषी विद्यापीठे पूर्णतः शेतकरी हितासाठी काम करत नाहीत.

४. किटकनाशक:

रासायनिक किटकनाशके खरोखरच खुप असरदार असतात असं आपल्याला वाटतं पण ते ज्या कीटकांना मारण्यासाठी आपण वापरतो त्या कीटकांना वाढवण्याचे कामही ही रासायनिक किटकनाशकच करतात.ते कसं ? ही किटकनाशक शत्रु किडी बरोबर मित्र किडीनाही मारतात व मोठ्या प्रमाणात मित्र किडी मेल्यामुळे वेगवेगळ्या शत्रुकिडी तुमच्या पिकांवर येतात व मोठ्या प्रमाणावर किडीमध्ये वाढ होते. शत्रु कीट हे झाडांची फुले फळे पाने यावर जगणारे शाकाहारी किटक असतात तर मित्र कीड़ हे अश्या शाकाहारी कीटकांना खाऊन जगणारे मांसाहारी कीटक असतात.कृषी विद्यापीठे कम्पन्याचे दलाल असल्यामुळे या गोष्टी आपल्या पर्यंत पोहचत नाहीत.याउलट नैसर्गिक शेतीतील किटकनाशक मित्र किडीना काहीही हानि न पोहचवता शत्रु किडीचा बंदोबस्त करतात.

 खते:

कृषि विद्यापीठे कधीही रासायनिक खतांचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना समजाऊन सांगत नाही.रासायनिक खतांनी हजारो हेक्टर जमीन नापीक करुण टाकली.रासायनिक खतांनी शेतकऱ्यांपासून पशुधन गायीं म्हशी बैल इत्यादिे हिसकावुन घेतले व शेतकऱ्यांना पूर्णतः परावलंबी बनवले.खतामध्ये मोठ्या प्रमाणात ५०% पेक्षा जास्त क्षार असतात जे जमिनीत पोहचल्यावर सीमेंट सारखे जमिनीला घट्ट व टनक बनवतात व जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते व जमिनीस अत्यंत आवश्यक असे सूक्ष्मजीव व गांडूळ यांना मारून टाकतात.मला कधी कधी आश्चर्य वाटतं की या कृषी विद्यापीठातील दलालांनी गांडूळाला शेतकऱ्यांचा मित्र तरी का म्हटलं असेल ? याउलट नैसर्गिक शेतीतील जीवामृत खरोखर हे एक अदभुत रसायन आहे.जीवामृताचे जर कोणी पेटंट घेऊन मोठ मोठ्या जाहिराती करुण शेतकऱ्यांना विकले असते तर ते शेतकऱ्यांनी रांगेत उभा राहून पैसे देऊन घेतले असते ते अगदीच फुक्कट मिळतय म्हणून त्याला काहीच किम्मत नाही. लाखो शेतकरी जीवामृताचा वापर करुण विक्रमी उत्पादन काढतायत तरीही शेतकऱ्यांचा विश्वासच बसत नाहीये. आज पतंजलि करोडो रुपयेवर जाहिराती खर्च करुन जेंव्हा आम्हाला आयुर्वेदिक वस्तूंच महत्त्व पटवून देतय तेंव्हा कुठं आम्हाला ते पटतय म्हणजे जाहिरात म्हणेल तेच खरं !

– श्री.जायगुडे श्यामसुंदर, प्रगतशील शेतकरी, कालवडे, भोर (पुणे)

Exit mobile version