राईससिटी मध्ये टलूरामनी घडविली धवलक्रांती 

राईस सिटी आणि दुर्गम अशी गोंदिया जिल्हयाची ओळख. सिंचनाचा अभाव असलेल्या या जिल्हयात एकाच पीकपध्दतीवर अवलंबित असल्याने अपेक्षीत आर्थिक बदल घडला नाही.

परंतु पांजरा येथील टलूराम बळीराम पटले यांनी शेतीपूरक दूग्धव्यवसाय, शेतीला यांत्रिकीकरणाची जोड आणि इतर पूरक आणि कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाच्या बळावर शेतीक्षेत्रात नवा विश्‍वास या भागातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

पटले कुटुंबियांची शेती 
पटले कुटुंबियांची वडीलोपार्जीत 12 एकर शेती. दूग्ध व्यवसायाच्या बळावर त्यात नव्याने 10 एकर शेतीची भर टलूराम यांनी घातली. आज एकूण जमीनधारणा 22 एकर आहे. या संपूर्ण शिवारात इतर शेतकऱ्यांप्रमाणे खरिप हंगामात धान (भात) लागवड केली जाते. रबी हंगामात हरभरा, लाखोळी गहू आणि ऊस अशी व्यवसायिक पीके घेण्यावर त्यांचा भर राहतो. करारावर आठ एकर शेती ते करतात.

त्यासाठी चार हजार रुपये प्रती एकर असा दर आकारला जातो. गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी करारावरील शेतीत देखील सातत्य राखले आहे. धानाची एकरी उत्पादकता सरासरी 15 क्‍विंटल, लाखोळीची पाच ते दहा क्‍विंटल अशी उत्पादकता होते.

व्यवस्थापन, वातावरण अशा अनेक बाबी लाखोळी उत्पादनावर परिणाम करणारे घटक ठरतात. पाण्याचा अभाव आणि कारखान्याचे असहकार्याचे धोरण यामुळे ऊस लागवड गेली तीन वर्ष केली नव्हती. यावर्षी दिड एकरावर पुन्हा ऊस लावला आहे. हरभरा देखील दिड एकरावर आहे. गहू आठ एकरावर लावला आहे.

ट्रॅक्‍टरचलित पंप 
गावालगत नाला आणि तलाव आहे. या दोन्ही स्त्रोतामधील पाण्याचा वापर गरजेच्यावेळी केला जातो. दोन्ही पाण्याचे स्त्रोत शेतीपासून हजार फुट अंतरावर आहेत. ट्रॅक्‍टरचलीत पंपाचा याकामी वापर होतो. ट्रॅक्‍टरच्या पीटीओ सॉफ्टव्दारे पाणी खेचले जाते. या सयंत्रासाठी 50 हजार रुपयांचा खर्च आला. एकाचवेळी दोन पंप चालतात अशी या सयंत्राची रचना आहे. टलूराम यांचा मुलगा देवानंद याने आपल्या कल्पकतेतून हे सयंत्र तयार केले आहे. जनावरांना हाकलण्यासाठी आवाजासाठी प्लॅस्टीक पाईप व लायटरचा उपयोग करीत विशेष सयंत्र तयार केले आहे. कारपेट टाकून त्यावर पाणी टाकल्यास नंतर लायटरचा वापर करुन त्यातून विशिष्ट आवाज निघतो त्याला प्राणी घाबरतात, असे त्यांनी सांगितले.

दुग्ध व्यवसायाची केली सुरवात 
2003 मध्ये त्यांनी अवघ्या साडेतीन हजार रुपयात एक म्हैस घेतली. परंतु अवघ्या काही वर्षातच ती मरण पावली. तिच्या मरणाचे कारण जाणून घेतले असता शवविच्छेदनात तिच्या पोटातून काही नाणी व इतर साहित्य निघाले. पहिली म्हैस सहज घेतली असली तरी तिच्यापासून दुग्ध व्यवसाय आणि दूधाळ जनावरांचा लळा लागला. परिणामी या व्यवसायात मागे वळून न पाहता पुढे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तिच्यापासून 11 वेत झाले. त्यानंतर आणखी एका म्हशीची खरेदी केली. आज त्यांच्याकडील जनावरांची संख्या लहान मोठे धरुन 51 वर पोचली आहे. त्यामध्ये गावरान, मुऱ्हा, जाफराबादी जातीच्या म्हशींचा समावेश आहे.

दर्जेदार म्हैस खरेदीवर भर 
दूध देत नाही किंवा दूध काढताना त्रास देणाऱ्या म्हशी, गाई विकण्यावर अनेक शेतकऱ्यांचा भर राहतो. अशा म्हशी शोधून त्या खरेदी करण्यावर माझा भर राहतो, असे टलूराम सांगतात. भाकड म्हशी घेऊन त्या फळविण्यावर देखील त्यांनी लक्ष्य केंद्रीत केले आहे, अशी जनावरे बाजारात स्वस्त दरात मिळतात. सरासरी 70 ते 1 लाख रुपयांना बाजारात चांगल्या प्रतीची जनावरे मिळतात. परंतू भाकड आणि काही दोष असलेली जनावरे त्या तुलनेत स्वस्तात मिळतात. 2016 मध्ये 41 म्हशी होत्या आणि आता त्यांच्याकडील जनावरांची संख्या 51 झाली आहे. या व्यवसायात उतरतांना आणि शेतीसाठी कोणत्याही प्रकारचे कर्ज घेत नाही. शेती उत्पन्न शेती व्यवस्थापनावरच खर्च करीत असल्याने हे शक्‍य होते, असे ते सांगतात.

अशी आहे दुग्ध उत्पादकता 
दुग्ध व्यवसायासाठी पुढाकार घेणाऱ्या टलूराम यांच्याकडील रोजचे दूध संकलन 70 लिटरच्या घरात आहे. त्यामध्ये म्हैस आणि गाय या दोन्ही प्रकारच्या जनावरांपासून मिळणाऱ्या दूधाचा समावेश आहे. उत्पादीत दूधाची विक्री पहेला येथील अतूल डेअरीला होते. डेअरीच्या संचालकांकडून गावातील दूधाची उत्पादकता पाहता थेट गावातूनच कलेक्‍शन होते. दूधाला फॅटच्या प्रमाणात 18 ते 28 रूपये लिटरचा दर मिळतो. तुलनेत हा दर कमी असला तरी दूग्ध व्यवसाय दर आठवड्याला गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या पैशाची सोय करण्यास पूरक ठरतो.

प्रक्रियाजन्य उत्पादनावर भर 
ज्या दिवशी मागणी नसेल त्या दिवशी शिल्लक दूधापासून उपपदार्थ करण्यावर भर दिला जातो. त्यामध्ये दहि, तूप या उपपदार्थांचा समावेश आहे. महिन्याला दहा किलो तूप आणि मागणीनुसार दहि बनविले जाते. तूपाची विक्री 600 रुपये किलोप्रमाणे होते. परिसरातील अनेक गावांमध्ये तूपाच्या दर्जाविषयी माहिती असल्याने ग्राहकांकडूनच घरुनच तूपाची उचल होत असल्याचे ते सांगतात. तूप विकण्यासाठी कधीही बाजारात जावे लागले नाही. दह्याच्या बाबतीत देखील असेच आहे. लग्न किंवा इतर कार्यक्रमासाठी मागणी नोंदविले जाते. त्यानंतरच दह्याचा पुरवठा होतो.

चाऱ्याची अशी केली सोय 
दूधाळ जनावरांसाठी चाऱ्याची गरज भासते हे लक्षात घेत त्यांनी दोन एकर क्षेत्र याकरीता राखीवच ठेवले आहे. या क्षेत्रात मका, ज्वारी, बर्सीन गवत, बाजऱ्याची लागवड केली जाते. धान काढणीनंतर मिळणारे तणस देखील चारा म्हणून वर्षभर उपयोगात आणले जाते.

शेणखताचा होतो उपयोग
घरी दूधाळ जनावरांची मोठी संख्या आणि त्यापासून मिळणारे शेणही त्यामुळे मुबलक. या शेणाचा उपयोग व्हावा याकरीता टुलराम पटले यांनी शेणावर प्रक्रिया करीत ते कुजवित त्याचे कंपोस्ट तयार करण्यावर भर दिला आहे. त्यापूर्वीच त्यांचे वडील बळीराम पटले यांनी घरी जनावरांची संख्या जेमतेम असताना 11 फेब्रुवारी 1986 साली बायोगॅसची बांधण्यासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे त्यावेळी बायोगॅस उभारणीसाठी पैशाची सोय नसल्याने 2439 रुपयांचे कर्ज बॅंकेकडून घेण्यात आले. त्यासाठी 1100 रुपयांचे अनुदानही त्यांना मिळाले. त्यामुळे प्रयोगशीलता आधीपासूनच या कुटूंबाने जपली होती. 1986 साली बांधलेला हा गोबरगॅस आजही सुरु आहे. त्यांच्या कुटूंबात 8 व्यक्‍ती आणि चार नोकरांचा समावेश आहे. या सर्वांचा स्वयंपाक गोबरगॅसवरच होतो. त्यामुळे गेल्या 33 वर्षांत सिलींडरकरीता नोंदणीच केली नाही. पर्यायाने लाखो रुपयांची बचत झाली आहे. त्यांच्याकडील गोबरगॅसची दखल घेत त्याचवेळी गावात 26 गोबरगॅसची उभारणी झाली. परंतु आज त्यातील 2 गोबरगॅसच सुरु आहेत.

दर्जेदार कंपोस्ट उत्पादन आणि वापर 
जनावरांपासून रोज सरासरी 200 किलो शेण मिळते. बायोगॅसमधील वापर वगळता उर्वरित शेण घराजवळच साठविले जाते. त्यासाठी खास जागा राखीव आहे. त्याच ठिकाणी शेतातील काडीकचराही जमा केला जातो. हे कुजल्यानंतर उत्तम प्रतीचे शेणखत तयार होते. या खताचा वापर दरवर्षी शेतात होतो. त्यामुळे रासायनीक खतावरील खर्चही वाचला आहे. सेंद्रीय शेतमाल उत्पादनाचा उद्देश यामुळे बहूतांशी साध्य होतो, असे ते सांगतात.

गोमूत्राचा होतो शेतीकामी वापर 
त्यांच्याकडील जनावरांपासून रोज 100 लिटर गोमूत्र मिळते. गावातील काही शेतकऱ्यांची मागणी असल्यास त्यांना निशुल्क दिले जाते. त्यासोबतच गरजेच्यावेळी घरच्या शेतात त्याचा वापर केला जातो. सकाळ तसेच संध्याकाळ असे दोन्ही वेळचे गोमूत्र संकलनासाठी दोन वेगवेगळे टॅंक तयार करण्यात आले आहेत. सकाळी जनावरे चरण्यासाठी गेल्यानंतर आणि परतल्यानंतर दोन्ही वेळचे गोमूत्र या माध्यमातून संकलन होते.

तीन ट्रॅक्‍टरचा होतो शेतीकामी उपयोग
शेतीत प्रयोगशीलता जपणाऱ्या टलूराम यांनी यांत्रिकीकरणावर देखील गेल्या अनेक वर्षांपासून भर दिला आहे. 1992 मध्ये त्यांनी पहिला ट्रॅक्‍टर घेतला. 72 हजार रुपयात खरेदीचा करार झाला. इसारापोटी 100 रुपये त्या मालकाला दिले. ट्रॅक्‍टर मालकावर 60 हजार रुपयांचे कर्ज होते. तीन वर्ष वापरल्यानंतर संबंधीताने खरेदीचा व्यवहार पूर्ण केला नाही. परिणामी तो निशुल्कच वापरतात आला. त्यानंतर आता तीन ट्रॅक्‍टरची खरेदी त्यांनी केली आहे. जमीन सपाटीकरण तसेच मशागतीसाठी ते भाडेत्वावर दिली जातात; अतिरिक्‍त उत्पन्नाचा पर्याय या माध्यमातून त्यांनी शोधला आहे. रोटाव्हेटरकरिता तासाला एक हजार रुपये आकारले जातात. चिखलणीसाठी एक हजार रुपये तर जमीन सपाटीकरणासाठी 600 रुपये तास असा दर आहे. त्याकामी लागणाऱ्या सयंत्राची खरेदी त्यांच्याव्दारे करण्यात आली आहे.

दुग्धोत्पादकांचे गाव 
सुमारे 1200 लोकवस्तीच्या पांजरा गावात 123 म्हशी आणि 280 गावरान, 47 जर्सी गाई, 340 शेळ्या आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गावातील जनावरांची संख्या पाहता गावात नियमीत सर्व्हेक्षण आणि शेड्युलनुसार लसीकरण करण्यावर भर दिला गेला आहे. त्यामाध्यमातून गावातील जनावरांचे आरोग्य राखता आले आहे. विशेष म्हणजे या गावात दूग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी टलूराम यांनीच पुढाकार घेतला. गावातील अनेकांना स्वस्तात म्हशी मिळवून देण्यासाठी देखील ते प्रयत्न करतात. त्यांच्या पुढाकारानेच गावात धवलक्रांतीची बीजे रुजण्यास मदत झाली आहे.