योगाभ्यासाबाबत आतापर्यंत करण्यात आलेले अध्ययन, रुग्णांचे अनुभव आणि त्यांना होणारी वेदना तसेच, आजारामुळे आलेली अक्षमता यात योगाभ्यासामुळे झालेली सुधारणा आणि त्यामुळे, त्यांच्या जीवनमनात झालेले सकारात्मक बदल, यावर आधारित असते. योगाभ्यासाच्या परिणामांचा अभ्यास करणारे संशोधक, ज्यांनी वेदनेचे प्रमाण,वेदना सहन करण्याची क्षमता आणि शरीराची लवचिकता, यांचेही मोजमाप केले होते, त्यांना अभ्यासाअंती असे आढळले आहे की योगाभ्यासामुळे पाठ-कंबरदुखीचे दुर्धर दुखणे असलेल्या रूग्णांची वेदना कमी झाली, वेदना सहन करण्याची क्षमता वाढली आणि शरीराची लवचिकताही वाढली आहे.
नवी दिल्लीतील एम्स येथील शरीरशास्त्र विभागाच्या अतिरिक्त प्राध्यापिका डॉ. रेणू भाटिया यांनी आपले सहकारी डॉ राजकुमार यादव आणि डॉ श्री कुमार व्ही, यांच्यासह कंबरदुखीच्या जुनाट दुखण्यावर योगाभ्यासाचा काय परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी संशोधन केले.
कंबरदुखीचे दुर्धर दुखणे असलेल्या 100 रुग्णांबाबत हे अध्ययन करण्यात आले. हे सर्व रुग्ण पन्नाशीच्या वयातील होते आणि त्यांना किमान तीन वर्षांपासून हा त्रास होता. या सर्वांना चार आठवडे पद्धतशीर योगाभ्यास करायला सांगितला गेला त्यानंतर, क्वांटीटेटीव्ह सेन्सरी टेस्टिंग च्या मदतीने तपासले असता, कोल्ड पेन सहन करण्याची क्षमता आणि कोल्ड पेन सहिष्णूता दोन्हीमध्ये वाढ झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच रूग्णांमधील कॉर्टिकोमोटर एक्झिटेबिलिटी आणि लवचिकतेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे लक्षात आले.
या संशोधकांनी वेदना, सेन्सरी परसेप्शन आणि कॉर्टिकल एक्झिटेबिलिटी निकषांसाठी वस्तूनिष्ठ मोजमाप केले. या सर्व रूग्णांमध्ये सर्वच निकषांवर महत्वाचे बदल झाल्याचे त्यांना आढळले. सर्व प्रकारच्या निकषांमध्ये योगाभ्यासाने लाभ झाल्याचे आढळले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय पुरस्कृत ‘योग आणि ध्यानधारणेमागील विज्ञान आणि तंत्रज्ञान’ (SATYAM) संस्थेने या अध्ययनासाठी सहकार्य केले असून ‘जर्नल ऑफ मेडिकल सायन्स एंड क्लिनिकल रिसर्च’ मध्ये अलीकडेच हे अध्ययन प्रकाशित करण्यात आले आहे.
वेदना आणि कॉर्टिकोमोटर एक्झिटेबिलिटी निकषांच्या मुल्यांकनामुळे, योगाभ्यासाच्या लाभांचे शास्त्रीय पुरावे उपलब्ध झाले असून, त्याचा उपयोग अशा आजारांच्या रुग्णांना उपचारात्मक पद्धतींची शिफारस करण्यासाठी होऊ शकेल. तसेच रुग्णाच्या आजाराचे निदान आणि वेळोवेळी केल्या जाणाऱ्या तपासणीच्या वेळी देखील त्याचा उपयोग होऊ शकेल.
तसेच या रूग्णांसाठीच्या आणि फायब्रोमायलाग्लीयाच्या रुग्णांसाठी योगाभ्यासाचे प्रोटोकॉल देखील या संशोधक चमूने तयार केले आहेत.
दुर्धर कंबरदुखीचा त्रास असलेल्या रुग्णांना चार आठवडे योगाभ्यास करुन त्यांच्या दुखण्यात तसेच दुखण्यामुळे निर्माण झालेली शारीरिक अक्षमता यात सुधारणा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांच्या मणक्यांची लवचिकता आणि कॉर्टिकोमोटर एक्झिटेबिलिटी लक्षणीयरीत्या वाढल्याचेही आढळले आहे.
या आजाराच्या रुग्णांनी घरी दीर्घकाळ योगाभ्यास करण्याची शिफारस देखील या अध्ययनात करण्यात आली आहे. ही एक विनाखर्चिक उपचारपद्धती आहे, ज्यामुळे वेदना कमी होतातच, पण एकूण जीवनमानात आणि आरोग्यातही सुधारणा होते.