टोमॅटो बरोबरच शेतकरी देखील झाला मातीमोल

दीपक श्रीवास्तव  : निफाड 

निफाड तालुक्यात सध्या टोमॅटोचा हंगाम पूर्ण बहरात आला असून तालुक्यातील लासलगाव आणि पिंपळगाव या दोन्ही बाजार समित्यांमध्ये दररोज किमान 60 हजार जाळ्यांची म्हणजेच सुमारे सव्वा लाख किलो टोमॅटोची आवक होऊ लागली आहे. बाजारात टोमॅटोचा अक्षरशः महापुर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र मालाला उठाव नसल्याने भाव प्रचंड कोसळले असून उत्पादन खर्च तर सोडाच पण टोमॅटोची तोडणी करण्याचा व वाहतूक करण्याचा खर्च देखील भरून निघत नसल्याचा भयंकर प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवला आहे.

लासलगाव आणि पिंपळगाव या दोन्ही बाजार समित्यांकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रॅफिक जाम ची परिस्थिती निर्माण झाली असून हजारोच्या संख्येने टोमॅटोची वाहतूक करणारी वाहने ट्रॅक्टर्स, पिकअप व्हॅन, टेम्पो, मिनीडोर ही एकमेकांना मागे टाकून पुढे जाण्याच्या प्रयत्नात जागीच खोळंबून पडल्याचे चित्र बघायला मिळत आहे. द्राक्ष पिकाने गेल्या दोन-तीन वर्षापासून सातत्याने दगा दिल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटो व इतर वेलवर्गीय पिकांवर यंदा जास्त भर दिला. टोमॅटोच्या नवनवीन हायब्रीड जातींमुळे व अनुकूल हवामानामुळे यंदा टोमॅटोचे अभूतपूर्व असे उत्पादन झाले आहे, मात्र हे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी हातचे काहीही राखून न ठेवता, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, बांबू ,तारा , सुतळी , रोपे, मजुरी, वेगवेगळी औषधे, कीटकनाशके, खते या सर्व गोष्टींवर लाखो रुपयांचा खर्च केलेला आहे.

उत्पादनही चांगले झाल्याने भाव चांगला मिळेल या अपेक्षेने तोडणी वाहतूक यावर खूप मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी आपला माल बाजारात विक्रीसाठी आणला मात्र पीक काढणीला येतात गारपीट व्हावी तसेच संकट शेतकऱ्यांवर कोसळले. इतका प्रचंड खर्च करून व ढोर मेहनत करून पिकवलेला माल अक्षरशः कचरा किमतीला देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

गेल्या वर्षी 20 किलोच्या एका क्रेटला साधारणतः 800 रुपये दर मिळत होता. यंदा अचानक तो दर पन्नास रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. मुळात एक क्रेट टोमॅटोची तोडणी व मजुरीसाठीच तितकी रक्कम लागून जाते. त्यामुळे इतर सर्व खर्च हा कोठून भरून निघणार हा प्रश्नच आहे. टोमॅटोचे भाव कोसळण्या मागे विविध कारणे सांगण्यात येत आहेत.

प्रामुख्याने आपल्या देशातून टोमॅटोची निर्यात ही शेजारील पाकिस्तान बांगलादेश नेपाळ व आखाती देशांना होत असते परंतु गेल्या काही काळापासून राजकीय अस्थिरतेमुळे या देशांशी होणारा व्यापार ठप्प झालेला आहे, शिवाय कोरोणामुळे देशातील इतर बाजारपेठांमध्ये सुद्धा मालाचा पुरवठा होणे अडचणीचे होऊ लागले आहे. एकंदर या सर्व परिस्थितीमुळे मागणीपेक्षा पुरवठा खूप जास्त होऊ लागल्याने भाव कोसळले असल्याचे सांगितले जाते. टोमॅटो प्रमाणेच कारली व इतर पिकांची देखील परिस्थिती अशीच बिकट झाली असून केंद्र सरकारने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन योग्य मार्ग न शोधल्यास शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान अटळच आहे यात शंका नाही.