तयार होत आहेत आकर्षक आकाश कंदील, पणत्या, उटणे, मेणपणत्यांसह भेटवस्तू
कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेच्या मान्यताप्राप्त दिव्यांग, गतिमंद मुलांच्या शाळांमध्ये दिवाळीसाठी विशेष मुले आकर्षक आकाश कंदील, रंगीबेरंगी पणत्या, उटणे, मेणबत्त्या यांच्यासह भेटवस्तू तयार करण्यात गुंतली आहेत. यंदाच्या गिफ्ट पॅकमध्ये साबण-तेलांसोबतच सॅनेटायझरच्या बाटलीचाही समावेश झाला आहे. बनवलेल्या वस्तू, स्पेशल ऑलंपिक, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभाग पाहून पंखाविना भरारी काय असते ते दाखवून दिले आहे.
इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्वयम गतिमंद शाळेतील उद्योग केंद्राच्या अध्यक्ष शोभा तावडे यांनी माहिती दिली. या शाळेतील उद्योग केंद्रात 18 वर्षापुढील 56 मुले आहेत. अत्यंत सुंदर पध्दतीने गणेश मूर्ती तयार करतात. वेगवेगळी फुले तयार करतात. दिवाळीसाठी उपयोगी असणाऱ्या वस्तूंचे बॉक्स तयार करण्यात येत आहे. फाईल तयार करण्यात येतात शिवाय पेंटींगचे प्रदर्शनही भरवण्यात येत असते. दुर्लक्षित असणाऱ्या या मुलांना आमच्या संस्थेमार्फत सक्षम करण्यात येते. या वस्तूंची खरेदी करावी असेही त्या म्हणाल्या. संपर्क- नवीन न्यायालयाच्या मागे, कसबा बावडा, कोल्हापूर. प्रमोद भिसे- 7276051472.
जिज्ञासा विकास मंदिर बौध्दिक अक्षम मुलांच्या शाळेत अत्यंत आकर्षक आकाश कंदीलची निर्मिती होत आहे. या शाळेच्या स्मिता दीक्षित म्हणाल्या, मेणपणत्या मुलं सुंदर रंगवतात. वजनानुसार उटण्याचं पॅकिंग करतात. शिवण विभाग, पाक विभागातही या मुलांना वेगवेगळ्या पध्दतीचं प्रशिक्षण दिलं जातं. मुलांसाठी व्यायामशाळा देखील आहे. मुलांना सतत कार्यरत ठेवलं जातं. या मुलांच्या सुंदर कलाकृती खरेदी करून आपल्या दिवाळीबरोबरच या मुलांच्या दिवाळीचा आनंदही व्दिगुणीत करावा. संपर्क- रघुनंदन हॉल, क्रशर चौक, कोल्हापूर. स्मिता दीक्षित- 9850060903.
चेतना अपंगमती विकास संस्थेचे चेतना विकास मंदिर –कृष्णात चौगुले व्यवस्थापकीय अधीक्षक- कागदाच्या लगद्यापासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवल्या जातात. मुलींसाठी चेतना बजार सुरू केले. तेलाचा घाणा सुरू आहे. 50 हजार पणत्या, 1 हजार डझन आकाश कंदील, 5 हजार लक्ष्मीपुजन पुडे दिवाळीच्या निमित्ताने विक्री करतो. 13 ते 14 लाखाची उलाढाल यामधून होत असते. यावर्षी लॉकडाऊनमुळे दिवाळीचे साहित्य आम्ही मुलांकडून घरातून करून घेतले आहे. घरातून 25 हजार पणत्या रंगवून आलेल्या आहेत. 200 डझन आकाश कंदील घरातून तयार करून आलेले आहेत. चिमण्यांची घरटी बनवली आहेत. यावेळच्या गिफ्ट बॉक्समध्ये सॅनेटायझरच्या बाटलीचाही आम्ही समावेश केला आहे.
मुख्याध्यापिका उज्ज्वला खेबुडकर – अमित सुतार, केदार देसाई, आशिष सावेकर, ओंकार राणे आणि प्राजक्ता पाटील या खेळाडूंनी स्पेशल ऑलंपिक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी सांकेतिक भाषेत सादर केलेल्या राष्ट्रगीतात शाळेतील 8 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. गोविंद नेहलानी दिग्दर्शित वुई केअर फिल्म फेस्ट यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या चित्रफितीतही चेतनाचा सहभाग राहिला आहे. संपर्क- कुष्ठधाम शेंडापार्क, कोल्हापूर, 0231-2690306/07.
स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी मतिमंद विद्यालय कागल-तृप्ती गायकवाड- मुलांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना व्यवसाय प्रशिक्षणाचे काम दिले जाते. एकूण 25 विद्यार्थी शाळेत शिकत आहेत. वेगवेगळ्या सणानिमित्त साहित्य निर्मिती केली जाते. रक्षाबंधनला राख्या तयार केल्या जातात. दिवाळी सणासाठी आकाश कंदील, पणत्या, नक्षीदार मेणपणत्या, सुंदर फुले सद्या तयार करण्यात येत आहेत. मतिमंद मुलं देखील उत्तम पध्दतीने काम करतात हे त्यांच्या वस्तू निर्मितीमधून स्पष्ट झाले आहे. यामधून त्यांना विद्या वेतन मिळते. संपर्क- तृप्ती गायकवाड- 9545159374.
सन्मती गतिमंद विकास केंद्र इचलकरंजी- व्यवसाय अधीक्षक किशोरी शेडबाळे- लिफाफे तयार करणे, बुके तयार करणे, बॉक्स फाईल तयार करणे, पणत्या रंगवणे, गिफ्ट बॉक्स, लक्ष्मीपुजनचा पुडा, रंगीबेरंगी पणत्या आदींचे प्रशिक्षण दिले जाते. शाळेमार्फत काही विद्यार्थ्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. या वस्तूंची खरेदी करून विद्यार्थ्यांचा सन्मान करावा. संपर्क- किशोरी शेडबाळे 9096250952.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने ही विशेष मुले पाठीमागे नाहीत हे त्यांनी बनवलेल्या वस्तूंमधून दिसून येते. गरज आहे ती त्यांनी बनवलेल्या वस्तूंना खरेदी करून दिलखुलासपणे दाद देण्याची.