छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाऊ यांची तारखेनुसार 424 वी जयंती आहे. त्यांचे जन्मगाव असलेल्या सिंदखेडराजा गावी जिजाऊ यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी लाखों शिवप्रेमी एकत्र येतात. मात्र यंदाही या कार्यक्रमावर कोरोनाचे सावट आहे. असे असले तरी मराठी माणसाच्या मनात या महान मातेचे स्थान अढळ आहे. जाणून घेऊ यात त्यांच्या बद्दल..
विदर्भातील सिंदखेडच्या सरदार घराण्यात जन्म :
वडील लखूजी जाधव हे निजामशाहीतील मातबर सरदार होते. त्यांच्या पोटी जिजाऊ माँसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये १२ जानेवारी १५९८ साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागुनच आहे. याच वस्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. येथे नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे, या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरीहाराचे सुंदर शिल्प आहे, तर राजे लखुजीराव जाधवांनी मंदिराचे पुर्नजीवन केल्याचा शिलालेख कोरलेला आहे. या मंदिरासमोरच चौकोनी आकारात तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे. तर ८व्या ते १० व्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिर आहे.
दौलताबादच्या किल्ल्यात विवाह :
ज्या ठिकाणी जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजे रंगमहाल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती. पुढे मालोजी भोसले यांच्या शहाजी या मुलाशी त्यांचा १६०९ च्या सुमारास त्यांचा दौलताबादच्या किल्ल्यात विवाह झाला. या प्रसंगी मुर्थजा निजामशाह हजर होता. पुढे काही कारणाने भोसले व जाधव यात वैमनस्य आले. जिजाबाई यांना सहा मुले झाली. पैकी दोन वाचली. ती संभाजी व शिवाजी होत.
एक राजा घडविताना :
१६३६ पूर्वीच राजमाता जिजाबाई शहाजीच्या पुण्याच्या जहागिरीत रहावयास आल्या. त्यांनी पुण्यात लाल महाल, तसेच खेड-शिवापूर येथे एक वाडा बांधला. शहाजीच्या राजकारणाचे व धोरणांचे त्यांना ज्ञान होते. पुणे प्रांताच्या कारभारात लक्ष घालून त्यांनी अनेक वेळा न्यायनिवाडे केले. त्यामुळे राज्यकारभाराचे मार्गदर्शन छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणातच मिळाले. मातोश्री जिजाबाई या स्वाभिमानी, करारी आणि स्वतंत्र वृत्तीच्या होत्या.
रचला स्वराज्याचा पाया :
छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण शिवनेरी, माहुली (ठाणे जिल्हा) व पुणे येथे गेलेले दिसते. बंगलोरलाही ते काही काळ राहिले. शिवाजी आणि जिजाबाई यांच्याकडे महाराष्ट्रातील जहागिरीची व्यवस्था सोपवून शहाजीराजांनी त्यांची पुण्याला रवानगी केली. मातोश्री जिजाबाईंचा देशाभिमान, करारीपणा आणि कठीण प्रसंगांतून निभाऊन जाण्यासाठी लागणारे धैर्य, या त्यांच्या गुणांच्या तालमीत शिवाजीराजे तयार झाले. त्यांच्या या शिकवणीतून शिवाजीराजांना स्वराज्यस्थापनेची स्फूर्ती मिळाली. त्यामुळेच प्रत्येक मातेला असे वाटते की आपण जिजाऊ व्हावे..
आपल्या जहागिरीच्या संरक्षणासाठी गड, किल्ले आपल्या ताब्यात असले पाहिजेत, ही जाणीव त्यांना बालवयापासून झाली. सन १६४६-४७ नंतर छत्रपती शिवाजीराजांनी प्रत्यक्ष कारभार हाती घेतला. त्यांनी गड आणि किल्ले आपल्या ताब्यात घेण्यासाठी अनेक मोहिमा आखून यशस्वीरीत्या पार पाडल्या. या कामात त्यांना आपल्या मातोश्रींचे आशीर्वाद होतेच.
अढळ स्थान :
स्वराज्याची स्थापना करण्यात मातोश्री जिजाऊ यांचे मोलाचे मार्गदर्शन यांनी पाठिंबा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या हयातीत राज्याभिषेक झाला आणि त्या राजमाता झाल्या. राज्याभिषेक पाहिल्यानंतर बारा दिवसांनी पाचाड येथे त्यांनी देह ठेवला. मात्र त्यांचे स्थान प्रत्येक मराठी माणसाच्या आणि भारतीयाच्या मनात अढळ आहे.