2020 हे साल संपूर्ण जगासासाठी कठीण संकटाचे आणि अडचणींचे ठरले आहे. या वर्षात कोरोना, लॉकडाऊन, क्वॉरंटाईन सारखे नववीन शब्द सामान्य माणसाच्या शब्दकोशात दाखल झाले. महाराष्ट्र शासन कोरोनावर मात करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. आणि त्यात यशस्वी देखील झाला आहे. महाराष्ट्राने प्लाझ्मा उपचार करण्यास सुरुवात केली अहे. आपण प्रथमच ह्या प्लाझ्मा उपचाराचे नाव ऐकले असणार पण हा उपचार काही नवीन नाही. याचा शोध 130 वर्षां पूर्वी जर्मनीच्या फिजियोलॉजिस्ट एमिलवॉन बेह्रिंग यांनी लावला होता. यासाठी त्यांना नोबल पारितोषिकही देण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्रातील हे पहिलेच नोबेल पारितोषिक होते.
संसर्गजन्य रोगांवर उपचार म्हणून अनेक दशकांपासून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. यापूर्वी सार्स (2003) आणि मर्स (2012) मध्ये प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार केले गेले होते. कोरोना विषाणू देखील या प्रकारात येतात. 1918 मध्ये पहिल्या महायुद्धाच्याकाळात पसरलेल्या स्पॅनिश फ्लूपासून लोकांची सुटका करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता. इबोला या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांकरीता प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता. इबोलाने थैमान घातल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने प्लाझ्मा थेरपीबाबत मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या होत्या. कोरोना विषाणूवर अद्याप लस निघालेली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत प्लाझ्मा थेरपी हे एक वरदानच ठरु शकेल.
महाराष्ट्र हे प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तसेच जगातली सगळ्यात मोठी प्लाझ्मा थेरपीची ट्रायल महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्रात 23 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालयात या थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यापैकी 17 ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु करण्यात आली. या केंद्रांवर दाखल झालेल्या महाराष्ट्रातील सर्व रूग्णांसाठी संपूर्ण प्लाझ्मा थेरपी उपचार मोफत आहे. गंभीर रुग्णांना चांगले करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा प्रथमच उपयोग होतो आहे. राज्याने एप्रिलमध्ये प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग केला होता.
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. या नंतर हा प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते. तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज मुक्त होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात. जे आधी कोरोनाशी लढलेले असतात. हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर्स ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण निवडला जातो. डॉक्टर्स आपल्या रक्तातून प्लाझ्मा स्वतंत्ररित्या काढू शकतात. यात अँटीबॉडी असतात. जी एखाद्या रोग्याला दिली जातात. यामुळे त्याची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे. प्लाझ्मा वेळेत दिल्याने 10 पैकी 9 रुग्ण बरे झाले आहेत. प्लाझ्मा बँक तयार करणे आणि ते शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध करून देणे ही जबाबदारी आपणास पार पाडावी लागेल. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे. आयसीएमआरतर्फे देशभरात प्लाझ्माच्या क्लिनिकल ट्रायल सुरु आहेत.
‘प्लाझ्मा दान’साठी जनतेने पुढे येणे आवश्यक आहे.
प्लाझ्मा देण्यापूर्वी रुग्ण संपूर्णपणे कोरोनामुक्त झाल्यानंतर 14-28 दिवसांपर्यंत प्रतिक्षा करणे आवश्यक आहे. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोरोनामुक्त व्यक्तीला ताप, श्वास घेण्यास कोणतीही अडचण येत नाही. त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण सामान्य आहे म्हणजेच 95 टक्के ते 100 टक्के आहे. एकूणच त्या व्यक्तीचे आरोग्य चांगले आहे. इतर काही संक्रमण किंवा संसर्गजन्य रोगाची बाधा झालेली नाही याची खात्री झाल्यानंतरच प्लाझ्मादान करण्यास ती व्यक्ती सक्षम असते.
प्लाझ्मा कसे संकलित केले जाते?
प्लाझ्माफेरेसिस नावाच्या प्रक्रियेद्वारे रक्तातील प्लाझ्मा गोळा केला जातो. या प्रक्रियेस सुमारे 45 मिनीटे वेळ लागतो. या प्रक्रियेदरम्यान, रक्त काढले जाते आणि प्लाझ्मा वेगळे केले जातात. संकलित केले जाण्यासाठी प्लाझ्माची सामान्य मात्रा 300 मिली ते 600 मिलीमीटर दरम्यान असते. एकदा काढलेला प्लाझ्मा 10 डिग्री सेल्सिअस तापमानात थंड वातावरणात ठेवला जातो. प्लाझ्मा काढण्याच्या तारखेपासून 12 महिन्यांपर्यंत संग्रहित केला जाऊ शकतो.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दि.29 जून 2020 रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपीच्या ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. एखादा पूर्णपणे बरा झालेल्या रुग्णाने www.plasmayoddha.in या संकेतस्थळावर आपली नोंद करून प्लाझ्मादान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री महोदय यांनी जनतेला केले आहे. यामुळे एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो. गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा प्रथमच उपयोग होत आहे. जगातली ही सर्वात मोठी सुविधा महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही प्लाझ्मा दान करून एक नवा आदर्श जनतेसमोर ठेवला आहे. कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर प्लाझ्मा दान महत्त्वाचे ठरेल. आवश्यक ती काळजी आणि वेळीच उपचारामुळे कोरोना अटकाव सहज शक्य आहे.
– प्रविण डोंगरदिवे
माहिती सहाय्यक, विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई