निफाड वार्तापत्र : दीपक श्रीवास्तव
शेतकरी सातत्याने विविध संकटांना सामोरे जात, संकटांशी सामना करत आपली वाटचाल करीत असतो . दुष्काळ, वारा, वादळे, गारा, पाऊस, जीवघेणी थंडी अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना त्याला कायमच करावा लागतो. गेल्या काही वर्षांपासून मात्र निफाड तालुक्यातील शेतकरी वर्ग हा या सर्व नैसर्गिक आपत्तींबरोबर वन्य जीवांच्या वाढत्या त्रासामुळे मेटाकुटीला येऊ लागला आहे.
निफाड तालुका हा दाट झाडी झुडपे, दरीखोर्यांचा जंगल भाग नसल्याने व सपाट मैदानी प्रदेश असल्याने हिंस्र प्राणी, वन्य श्वापदे या तालुक्यात जवळपास नसल्यातच जमा होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील गोदावरी व कादवा नदी लगतच्या गावांमध्ये बिबट्यांची संख्या हळूहळू वाढतच गेली . आता बिबट्यांचा प्रसार हा जवळजवळ पुर्ण तालुकाभरात झालेला आढळुन येतो. नांदूर मधमेश्वर, म्हाळसाकोरे , तारुखेडले, चापडगाव, मांजरगाव, भेंडाळी, सायखेडा, शिंगवे, कोठुरे, चितेगाव, गोंडेगाव, जळगाव, काथरगाव, कुरुडगाव, पिंपळस, नैताळे, सोनेवाडी, कोळवाडी, या संपूर्ण परिसरात इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष तालुक्याचे गाव असलेल्या निफाड शिवारात देखील बिबट्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.
निफाड तालुक्यामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात अनेकांचे बळी गेले आहेत. अगदी अलिकडच्या काही दिवसांमध्ये मनुष्यावर बिबट्याने हल्ला केल्याची नोंद दिसुन आलेली नसली तरी, शेती वस्त्यांवरील शेळ्या, बकऱ्या, कुत्रे, वासरे, कोंबड्या यांची बिबट्याने शिकार करण्याच्या घटना वारंवार घडत असतात. निफाड तालुक्याच्या गावात कोळवाडी रस्ता, सोनेवाडी रस्ता, आचोळा नाल्यापासून दोन तीन किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यात बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत आहे.
जोपर्यंत मानवावर वन्य प्राण्याचा हल्ला होत नाही तोपर्यंत वनखात्याचे अधिकारी देखील लक्ष देत नाही. वन विभागाचे नेहमीचेच ठरीव साच्याचे प्रतिपादन असते की लोकांनी वने, जंगले यांच्यावर आक्रमण केले आहे. वन्यप्राण्यांना जंगले शिल्लक राहिलेली नसल्यामुळे ते मानवी वस्तीकडे येतात. या ठिकाणी उसाची शेती जास्त असल्याने त्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळते, इत्यादी, इत्यादी . त्यांचे मत तत्वतः योग्य असले तरी मानव आणि वन्य जीवांचा संघर्ष हा दुर्लक्ष करण्याचा मुद्दा ठरत नाही. जसे वन्यजीवांना संरक्षण गरजेचे आहे तसेच माणसांनाही सुरक्षित वातावरण लाभणे गरजेचे आहे.
बिबटे येथे आधी कधीच आढळत नव्हते आता मात्र प्रत्येक पंचक्रोशीत बिबटे दिसुन येऊ लागले आहेत. त्यांना सुरक्षित व पुरक वातावरण मिळाल्याने त्यांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. त्यांच्या वाढत्या संख्येचा त्रास शहरी लोकांना न होता आडरानात शेती वस्त्यांवर वस्ती करून राहणाऱ्या गरीब शेतकरी, शेतमजुरांना होत असतो. त्यांची बाजू कोण समजून घेणार? बिबट्यांबरोबरच आता येथील शेतकरी वर्गाला रानडुकरांचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.
बिबट्या तरी पाच-सात किलोमीटर मध्ये एखादा दिसून येईल मात्र माजलेली पोसलेली रानडुकरे सर्वत्र मोठ्या संख्येने संघटीत पणे शेतीपिकांचे, जमीनीचे नुकसान करीत असतात. निफाड कोळवाडी रस्त्यालगत असलेल्या शेतांमध्ये या डुकराच्या टोळीने धुमाकूळ माजवून टाकला आहे. लाखो रुपये खर्च करून केलेली ठिबक संचाच्या पाईप व नळ्यांची ही रानडुकरे पूर्णपणे मोडतोड करून टाकतात. आपल्या धारदार सुळ्यांनी माती उकरताना द्राक्षबागांची झाडांची मुळे तोडून टाकतात.
त्यामुळे प्रचंड खर्च करून व कष्ट करून उभी केलेली द्राक्षाची बाग, वेली झाडे उभी पिके नष्ट होतात. उस, गहू, मका,भाजीपाला, कांदे या सर्वच पिकांची ही रानडुकरे नासाडी करीत असतात . त्यांच्या आडदांडपणामुळे व जास्त संख्येमुळे कोणीच त्यांना अडवण्याचा हिंमत करू शकत नाही. मध्यंतरी शासनाने रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी त्यांच्या शिकारीची परवानगी दिली होती, मात्र नंतर या सवलतीचा दुरुपयोग होत असल्याचे कारण दाखवून रानडुकरांच्या शिकारीवर बंदी घालण्यात आलेली आहे.
शासनाच्या या चुकीच्या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्याचा अथवा पाळीव प्राण्यांचा बळी केल्यास त्यांना शासनाकडुन नुकसान भरपाई मिळते. मात्र अशी नुकसान भरपाई रानडुकरांनी केलेल्या नुकसानीसाठी मिळत नाही . त्यामुळे या संकटाचा सामना करावा हे शेतकऱ्यांना कळेनासे झाले आहे.