अवकाश कवेत घेताना…

हा संधींचा काळ आहे. नेहरू विज्ञान केंद्रातर्फे ‘Space – An Opportunity for India’ अर्थात अवकाश क्षेत्रात भारतासाठी उपलब्ध संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. महिनाभरापूर्वी केंद्रीय मंत्रीमंडळाने अवकाश क्षेत्रात खाजगी सहभागाला हिरवा कंदिल दाखवला, त्या अनुषंगाने या व्याख्यानाचे आयोजन समयोचित ठरते.

डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारताने कशाप्रकारे अवकाश तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला, अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत या क्षेत्रात कशाप्रकारे क्षमता उभारणी होत गेली, या क्षेत्रात आज भारत कोणत्या स्थितीत आहे आणि आपण पुढे कशा प्रकारे मार्गक्रमणा करू शकतो, अशा अनेक मुद्द्यांबाबत, अंतराळ विभागाचे माजी सचिव आणि इस्रोचे अध्यक्ष पद्मश्री एस किरण कुमार यांनी या व्याख्यानात चर्चा केली. अवकाशातील घडामोडींचा भारत कशाप्रकारे लाभ करून घेऊ शकतो, हे त्यांनी विशद केले. अवकाश तंत्रज्ञान देशासाठी उपयुक्त ठरू शकते, हे डॉ. विक्रम साराभाई यांनीच सरकारला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अवघ्या दहा वर्षानंतरच्या काळात पटवून दिले. कोणत्याही पायाभूत सुविधांशिवाय भारताने आपल्या अवकाश क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली आणि आज भारताने स्वबळावर सर्व पायाभूत सुविधा उभारल्या आहेत, असे कुमार यांनी सांगितले.

राष्ट्रीय विकासासाठी अवकाश तंत्रज्ञानाचा वापर करणे, हे डॉक्टर विक्रम साराभाई यांचे ध्येय होते. त्यांच्या या दूरदृष्टीमुळेच भारताने भारतीय भूमीवरून 1967 साली पहिले रॉकेट प्रक्षेपित केल्यानंतर अवघ्या सहा वर्षांच्या काळात त्रिवेंद्रममधील थुंबा येथून एका विषुववृत्त रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

अवकाश क्षेत्रातील विविध संधींबाबत सविस्तर तपशील देताना ते म्हणाले की प्रक्षेपण वाहने, उपग्रह, अँप्लिकेशन्स आणि सेवा अशा सर्व संबंधित बाबी जमेस धरता अवकाश क्षेत्राशी संबंधित अर्थव्यवस्था ही 400 अब्ज डॉलरची बाजारपेठ आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची सक्षमता लक्षात घेता, आता जागतिक अर्थव्यवस्थेत आपण या सक्षमतेचा कसा वापर करून घेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. त्याचबरोबर आपण लक्षात ठेवले पाहिजे की अवकाश क्षेत्र सर्वांसाठी लाभदायक ठरले पाहिजे, जेथे विभिन्न देश आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्र काम करत राहतील.

 

संधी:

अवकाशातील कचऱ्यावर देखरेख आणि अवकाशातील रहदारीचेव्यवस्थापन:

‘शहरांप्रमाणेच अवकाशातही रहदारीशी संबंधित समस्या उद्भवतात. कक्षेतील सक्रिय आणि निष्क्रीय अशा उपग्रहांच्या गर्दीमुळे अवकाशातही रहदारीशी संबंधित समस्या उद्भवतात. कक्षेतील उपग्रह परस्परांच्या मार्गात येऊ शकतात. हा धोका लक्षात घेता अवकाशातील रहदारीचे व्यवस्थापन ही अत्यंत महत्वाची बाब ठरते. त्याचबरोबर या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या देशांच्या वाढत्या संख्येमुळे अवकाशातील कचऱ्याचे व्यवस्थापन आणि देखरेख या बाबीही महत्वाच्या ठरतात. 2020 या वर्षात अवकाशातील कचऱ्यावर देखरेख आणि तो हटविण्यासाठीच्या बाजारपेठेचा महसूल अंदाजे 2.7 अब्ज डॉलर्स इतका आहे.

अवकाशातील खाणकाम या क्षेत्रातही विलक्षण संधी उपलब्ध आहेत.आपल्या सौर मंडळाच्या उगमाच्या काळापासून अनेक उल्का अस्तित्वात आहेत आणि त्यांच्यात प्रचंड प्रमाणात खनिजे आहेत. हे काम करण्यासाठी अनेक देश विविध कंपन्यांना परवाने देत आहेत, असे ते म्हणाले.अवकाशातील साहित्य मोठ्या प्रमाणात जेव्हा पृथ्वीवर आणले जाते, तेव्हा त्यायोगे विविध कामे करण्याची आपली क्षमता वाढू शकते. ‘सध्या दरवर्षी पृथ्वीच्या आजूबाजूने 2 दशलक्षपेक्षा जास्त उल्का प्रवास करतात आणि उल्का खाणकाम संबंधित बाजारपेठ अंदाजे 5 ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

अवकाश पर्यटन ही आणखी एक मोठी संधी ठरू शकते. मंगळावर जाणाऱ्या वन वे तिकिटांची विक्री करणार्‍या अनेक कंपन्या आहेत. हा निश्चितच भरभराटीला येणारा उद्योग आहे आणि अनेक लक्षाधीशांनी यापूर्वीच अंतराळात पर्यटक म्हणून प्रवास केला आहे.

अवकाशात सौर उर्जेची शेती – पृथ्वी स्वत:भोवती फिरत असल्यामुळे पृथ्वीवर सूर्याची उष्णता किंवा सूर्यप्रकाश पूर्ण वेळ असत नाही. अवकाशात मात्र हा सूर्यप्रकाश अव्याहतपणे उपलब्ध असतो. विविध प्रक्रियांच्या माध्यमातून सूर्यप्रकाशाचे विविध प्रकारांतील उर्जांमध्ये रूपांतर करणे शक्य आहे. यातून मोठ्या प्रमाणावर नवीकरणीय उर्जा उपलब्ध होऊ शकते.

‘मानव जमीन, पाणी आणि वायूवर विजय मिळवत आला आहे. आता अवकाश जिंकायचे आहे. जगातला प्रत्येक देश आता या दृष्टीने अवकाशातील संधींची चाचपणी करत आहे. आज 40 पेक्षा जास्त देश पूर्णवेळ अंतराळ विषयक उपक्रम राबवित आहेत तर 100 पेक्षा जास्त देश अवकाश यंत्रणा आणि सेवांचा उपयोग करीत आहेत. अवकाश तंत्रज्ञान केवळ राष्ट्रीय विकासासाठीच नाही तर संपूर्ण मानवतेच्या फायद्यासाठी आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

संकटांचे संधीत रूपांतर करा, असे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार नमूद केले आहे. संपूर्ण देश आत्मनिर्भर भारताच्या दिशेने प्रवास करत असताना खाजगी भागिदारीसाठी खुले झालेले अवकाश क्षेत्र, ही चौथी आघाडी निश्चितच अनंत संधी प्रदान करणारी आहे.

खालील दुव्यांवर हे व्याख्यान पाहता येईल.

https://www.facebook.com/watch/?v=850767465451890

https://www.facebook.com/watch/?v=907074353156891