खाकी वर्दीतील ‘माणुसकी’

पुणे शहर पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्‍यंकटेशम यांच्‍या नेतृत्‍वाखाली पुणे पोलिसांनी टाळेबंदीच्‍या काळात कौतुकास्‍पद आणि विधायक काम केले. हे काम अत्यंत जोखमीचे आणि आव्‍हानात्‍मक होते. कारण त्‍यासाठी कोणतेही मॅन्‍युअल नव्‍हते, लेखी आदेश नव्‍हते, ड्यूटी चार्ट नव्‍हता.. आपल्‍या विवेकशक्‍तीचा वापर करुन प्राप्‍त परिस्थितीमध्‍ये योग्‍य वाटणारी कृती करुन अडचणीत असलेल्‍या लोकांची मदत करणे, हाच एकमेव उद्देश होता.

‘जे का रंजले गांजले, त्‍यासि म्‍हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेंचिं जाणावा’ असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी म्‍हटले आहे. या उक्‍तीचा तंतोतंत प्रत्‍यय पुणे पोलीस आयुक्‍तालयातील दलाने दाखवून दिला. पुणे शहरात 9 मार्चला कोरोनाची पहिली व्‍यक्‍ती आढळल्यानंतर सर्वच शासकीय यंत्रणा गतीने कामाला लागली. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्‍यासाठी शासनस्‍तरावरुन वेळोवेळी टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर करण्‍यात आली. पहिला टप्‍पा 25 मार्च ते 14 एप्रिल 2020, दुसरा टप्‍पा 15 एप्रिल ते 3 मे 2020, तिसरा टप्‍पा 4 मे ते 17  मे 2020 आणि चौथा टप्‍पा 18 मे ते 31 मे 2020 असा होता.

सर्वसाधारण परिस्थितीत पोलीस दल कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित कशी राहील, यासाठी प्रयत्‍न करत असते. कोरोनामुळे आलेल्‍या टाळेबंदीमध्‍ये मात्र पोलीस दलाला लोकांना कमीत कमी त्रास कसा होईल, यावर भर द्यावा लागला. पुणे शहर पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्‍यंकटेशम यांच्‍या नेतृत्‍वाखाली पुणे पोलिसांनी या काळात खूपच कौतुकास्‍पद आणि विधायक काम केले. हे काम अत्यंत जोखमीचे आणि आव्‍हानात्‍मक होते. कारण त्‍यासाठी कोणतेही मॅन्‍युअल नव्‍हते, लेखी आदेश नव्‍हते, ड्यूटी चार्ट नव्‍हता.. आपल्‍या विवेकशक्‍तीचा वापर करुन प्राप्‍त परिस्थितीमध्‍ये योग्‍य वाटणारी कृती करुन अडचणीत असलेल्‍या लोकांची मदत करणे, हाच एकमेव उद्देश होता.

पुणे शहर पोलीस दलातील सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त डॉ. मितेश घट्टे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, पोलीस उपायुक्त डॉ. पंकज देशमुख, सुहास बावचे, वीरेंद्र मिश्र, स्वप्ना गोरे, पौर्णिमा गायकवाड, शिरीष सरदेशपांडे, संभाजी कदम आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्‍तालयाच्‍या हद्दीतील लोकांसाठी अथक परिश्रम घेवून त्‍यांना दिलासा दिला.  टाळेबंदीच्‍या काळात पुणे शहर पोलीस दलातील ‘माणुसकी’चा अनुभव अनेकांना आला. त्‍यातील काही प्रसंग, घटनांना माध्‍यमांनी व्‍यापक प्रसिध्‍दी दिली. यापैकीच काही घटना येथे सादर करीत आहे.

मांडवावर वेल– पोलिसांच्या साक्षीने

‘कन्यादानासारखे पुण्‍य नाही, असे म्‍हणतात. टाळेबंदीच्‍या काळात पोलीस अधिकारी श्री. घाडगे यांना  कन्‍यादानाचा आनंद मिळाला. एक मूक मुलगी, तिच्या वडिलांचा फोन बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांना आला. त्या फोनवर झालेल्या संभाषणातून त्यांना कळालं, की ज्या मूक मुलाशी त्यांच्या मुलीचे लग्न ठरले आहे तो औरंगाबादला आहे. पण लॉकडाऊनमुळे त्याला पुण्यात येणं शक्य नव्हतं. वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक घाडगे यांनी फक्त ई-पास देऊन त्या मुलाला पुण्यात आणण्याची व्यवस्था केली नाही तर या लग्नात बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्यावतीने ५ जण नवऱ्या मुलाचे पाहुणे म्हणून आणि ५ जण नवरी मुलीकडचे म्हणून उपस्थित राहिले. त्यांनी छोटासा मांडव घातला, लहान स्टेज बांधले, भटजी  सुद्धा बोलावले आणि हा लग्न सोहळा आनंदात पार पाडला.

श्री. घाडगे म्हणाले, मला तर माझ्याच मुलीचे  ‘कन्यादान’ करतो आहे असे वाटत होते. ह्या लग्न सोहळ्यानंतर नवविवाहित दांपत्याला औरंगाबादला विना अडथळा पोहोचण्याची सुध्दा व्यवस्था केली. असे हे पोलीसांच्या साक्षीने झालेले लग्न.

खाकीतील देवदूत

२३ वर्षाच्या एका विवाहितेने विषारी औषध प्राशन केलं. तिला शिवणेतल्या मिनर्व्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर तिथल्या डॉक्टरांनी उत्तमनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांनी तिची माहिती घेतली व हॉस्पिटलला बिल भरत असल्याचे कळवले.  परंतु पंधरकरांनी दिलेल्या माहितीनुसार हॉस्पिटलने तिच्यावर मोफत उपचार करून त्याच दिवशी घरीही सोडले. या महिलेच्या पतीशी बोलल्यावर कळले की तो कोथरुडमधील एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करतो. परंतु लॉकडाऊनमुळे नोकरी सुटल्याने त्याच्याकडे पेट्रोल काय, रेशन आणायलासुद्धा पैसे नव्हते. त्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये जाऊ शकला नाही. पंधरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या दाम्पत्याला काही हजार रुपयांची मदत केली आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने महिन्याभराच्या रेशनची व्यवस्था केली. तसेच त्यांनी मेडिकलच्या मालकाशी बोलून त्याची नोकरी परत मिळवून दिली. त्याची पत्नी पिंपरी-चिंचवडमध्ये कामास होती. परंतु नोकरी गेल्याने तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. श्री. पंधरकर यांनी दोघांचे समुपदेशन केले. दोघे पती-पत्‍नी आता ठीक आहेत आणि पोलीसांचे आभार मानायला पोलिस स्टेशनला येऊनही गेले. खरंच पोलिसांच्या रूपात त्यांना ‘देवदूत’च भेटले.

निराधारांना आधार

सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सचिन निवंगुणे व अश्विनी गोरे या एसपीओच्या मदतीने नऱ्हे इथल्या नवले म्युनिसिपल स्कूलमध्ये २ महिन्यांपासून आश्रय घेतलेल्या ७५ जणांची उत्तम काळजी घेतली.

श्री. शेळके म्हणाले, लॅाकडाऊन जाहीर झाल्‍यावर आम्ही जेव्हा त्यांना इथे आणले, तेव्‍हा त्यांचा अवतार खूपच गबाळा होता. केस वाढलेले, दाढी-आंघोळीचा पत्ता नाही. पण या टीमने एसपीओंच्या व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या सर्वांची तात्काळ व्यवस्था केली, त्यांना नवीन कपडे दिले. या सर्व टीमने अगदी समरसून हे काम हाती घेतलं. त्यांना खाऊ-पिऊ घातलं, दाढी-आंघोळ-कपडे इतकंच नाही तर त्यांना मनोरंजनासाठी टीव्ही सुद्धा पुरवला. यातील काही दारुच्‍या तर काही अंमली पदार्थांच्या आहारी गेलेले होते. त्यांचं पुनर्वसनही करण्यात आलं. जेव्हा या निवाऱ्यातून निघायची वेळ आली, तेव्हा कित्येकांचा पाय निघत नव्हता. हीच पावती होती शेळके साहेब आणि त्‍यांच्‍या पथकाच्‍या कामाची !

काळ आला होता पण !

चतु:शृंगी पोलीस स्टेशनचा फोन वाजला. कंट्रोल रूममधून आलेला तो फोन  पी. आय. अनिल शेवाळे यांनी घेतला आणि त्यांना कळलं की, कुणीतरी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी लगेच बिट मार्शल्स दत्ता गेंजगे, प्रवीण शिंदे, मोबाईल स्टाफचे वन्दू गिरे आणि किशोर शिखरे यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. तिथे पोहोचल्यावर त्यांना दिसले की, बेरोजगार झालेला आणि सलूनमध्ये केशकर्तनाचे काम करणारा जयराम गायकवाड याने खचून जावून कात्रीने स्वत:वर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिथे असणाऱ्या लोकांनी अॅम्बुलन्ससाठी बरेच फोन केले, पण यश आले नाही म्हणून त्यांनी श्री. शेवाळे यांना फोन केला. त्यांनी त्या जखमीला पोलीसांच्या गाडीतून औंधच्या रुग्णालयात नेण्याची  सूचना केली. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या टिमने वेळीच हालचाल केली म्हणूनच आज जयराम जिवंत आहे

दोन जीवांची सुटका !

दि. 31 मार्च 2020 ची घटना. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या महिला पोलिस निरीक्षक विद्या राऊत या हवालदार विठ्ठल शिंदे आणि ऑपरेटर जगदीश खेडकर यांच्‍यासह वन मोबाईल व्हॅनवर कार्यरत होत्या. पुणे-सातारा नवीन हायवेवर पेट्रोलिंग करीत असताना पहाटे पावणे पाचच्या सुमारास बोगद्याच्या थोडं पुढे एक अँब्युलन्स कडेला उभी असलेली त्यांना दिसली. चौकशीअंती कळले की, त्यात 7 महिन्यांची एक गरोदर महिला होती व गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्‍या लोखंडी बार मध्ये अडकली होती. ही महिला हादऱ्यामुळे खूप घाबरली होती. मोबाईल व्‍हॅनमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला व तिच्या पतीला धीर देऊन खाली उतरवले. अडकलेली अँब्युलन्स बाहेर काढणे अवघड झाले होते, कारण लॉकडाऊनमुळे रस्त्यावर मदतीसाठी कुणीच नव्हते. एकंदर परिस्थिती पाहता श्रीमती राऊत व कर्मचाऱ्यांनी या महिलेस पतीसह पोलीस व्हॅनमध्ये बसवून भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

डॉक्टरांशी बोलल्यावर कळाले की, अँब्युलन्सला बसलेल्या हादऱ्यामुळे ही महिला घाबरली होती व तिचा रक्तदाब कमी झाला होता. तिला वेळेत हॉस्पिटलमध्ये आणल्यामुळे पुढचा धोका टळला होता व तिची तब्येत स्थिर झाली होती. पोलीस निरीक्षक विद्या राऊत, शिंदे, खेडकर यांनी कर्तव्‍यावर असताना दाखवलेल्या माणुसकीमुळे एक नव्हे तर दोन जीव कठीण परिस्थितीतून बाहेर आले.

पोलीस नव्हेमोठा भाऊ

हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करणारा सचिन चव्हाण हा १९ वर्षांचा सटाण्यातील पिंपळदरा (नाशिक) येथील मुलगा. लॉकडाऊनमुळे एकटा पडला होता. त्यात त्याला किडनी स्टोनचा त्रास. त्यामुळे तो तणावाखाली होता. अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री. डापसे (८३९५) यांना तो पोलीस स्टेशनजवळ फिरताना आढळला. त्याची विचारपूस करून त्यांनी  त्याला धीर दिला. इतकंच नाही तर एका महिन्यापर्यंत त्याच्या जेवणाची व्यवस्था केली आणि दोन महिन्याचे घरभाडेसुद्धा स्वतःच्या पगारातून भरले. त्याचबरोबर त्याची रितसर वैद्यकीय तपासणी करून नाशिकला परत जाण्याची सोय केली.

एका मोठ्या तणावातून सचिन मोकळा झाला. श्री. डापसे यांनी मोठ्या भावासारखी काळजी  घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले, तसेच समस्त पोलीस दलाचेही.

आत्ता हरवलेआत्ता सापडले !

पुणे स्टेशनहून बिहारला जाणाऱ्या कामगारांची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी पोलीस नाईक बर्डे आणि ढापसे यांच्यावर होती. नवरा-बायको दोन लहान मुलं व त्यांच्याकडे असणारी एक बॅग असे एक कुटुंब त्यांना स्टेशनकडे येताना दिसलं. ते सर्वांत शेवटी उतरले आणि ते उतरताच बस सुटली. बर्डे सांगत होते, त्यातील महिला रडू लागली. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिचे काही सामान बसमध्येच राहिलं. त्यात मुलाची दुधाची बाटली पण होती. तिला शांत केले आणि आम्ही दोघांनी बस आणि ड्रायव्हरची माहिती काढली. त्यांना असं कळलं की, बस हडपसर डेपोत पोहचली सुध्दा. पण हार न मानता ढापसे आपल्या दुचाकीवरुन वेगाने डेपोत गेले आणि त्या महिलेचे सामान परत मिळवले. तोपर्यंत बर्डे त्या कुटुंबाला धीर देत होते. त्यांनी आपले सामान परत आणलेले पाहताच सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यांचे चेहरे आनंदाने फुलले.

त्या चौघीपुन्हा आनंदी!

बिबवेवाडीत राहणाऱ्या श्रीमती के. आजोलिऊ लॉकडाऊनच्या एक दिवस आधी सांगवीत

राहणाऱ्या आपल्या मैत्रिणीला भेटायला गेल्या आणि तिथेच अडकल्या. यिनमिंगला रायखन, थँग्निमोई

ल्यूडीया वायफेई या इतर मैत्रिणीही त्यांच्यासोबत अडकल्या. परंतु, एका मर्यादेनंतर या सर्वांना तिथून निघणे आवश्यक झाले.  इकडे-तिकडे प्रयत्न करून आजोलिऊ यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्‍त बच्चन सिंग यांच्‍याशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला. त्‍यांनी तात्काळ युनिट १ चे वरिष्ठ पी.आय. अरुण वायकर यांना कळवले. वायकर साहेब सांगतात की, ती खूप घाबरलेली होती व मला ते जाणवत होते. त्यांनी लगेच पोलीस निरीक्षकांसोबत अधिकृत गाडी पाठवली आणि त्यांना घरी पोहोचवले.

काळजी ज्येष्ठ नागरिकांची !

निवृत्त जनरल शेरलेकर (वय वर्षे ८७) हे बी. टी. कवडे मार्गावर सोपान बागेतील त्यांच्या घरात एकटेच राहत होते. त्यांचा मुलगा  हा वडगाव शेरी येथे राहतो. पण लॉकडाऊनमुळे पिता-पुत्र यांची भेट होऊ शकत नव्हती. खूप प्रयत्न केल्यावर त्यांनी उपायुक्‍त बच्चन सिंग यांच्या व्हॉट्सॲपवर याबाबत संपर्क साधला. त्‍यांनी हडपसरच्या क्राईम ब्रँच युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांना कळवले. श्री.  चव्हाण यांनी पीएसआय सोमनाथ शेंडगे यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना याची कल्पना दिली आणि त्यांची टीम श्री. शेरलेकर यांच्या घरी पोहोचवली. त्यांनी फक्त भाजीपाला किंवा इतर सामान असे नाही दिले तर त्यांच्या औषधांची सुद्धा व्यवस्था केली. दोन दिवस त्यांच्या मदतीला त्यांच्यापैकी सतत कोणीतरी होतं. दरम्यानच्या काळात त्यांनी त्यांच्या मुलांशी संपर्क साधला आणि त्यांची विना-अडथळा नियमित भेट व्हावी यासाठी प्रवास परवानगीची सोय केली. एवढेच नाही तर मुलाच्या गाडीसाठी पेट्रोल सुद्धा मिळवून दिले. श्री. चव्हाण म्हणतात, आम्ही केलेल्या या मदतीमुळे शेरलेकर साहेबांना खूप आनंद झाला. आम्ही अजूनही त्यांची रोजच विचारपूस करतो. एका जेष्ठ नागरिकासाठी डी.सी.पी. बच्चन सिंग, पी.आय. दत्ता चव्हाण, पी.एस.आय. सोमनाथ शेंडगे आणि त्यांच्या टीमने केलेल्या या मदतीचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे.

देव माणूस !

हिंदी चित्रपटात पोलिस नेहमीच अगदी शेवटी येतात. पण टाळेबंदीच्‍या कालावधीत हडपसर पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. प्रसाद लोणारे हे खऱ्या अर्थाने हिरोच्या भूमिकेत चमकले. त्यांनी अशी मदत केली जी एक हिरोच करू शकेल. विकी कवडे हा दिव्यांग त्याच्या तीन चाकी अॅक्टिवावर किरकोळ वस्तू विकून उपजीविका करायचा. पण कोरोनाच्या संकटामुळे सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. संपूर्ण लॉकडाऊन झाल्यावर विकी आणि त्याच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली. विकी डोळ्यात अश्रू घेऊन लोणारे साहेबांसमोर उभा राहिला. त्‍यांनी त्याला धीर दिला. त्याला आवश्यक वस्तूंची त्यांनी सोय केली. हसतमुखाने विकी घराकडे निघाला. पण तो जाण्यापूर्वी श्री. लोणारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला नुसतंच आश्वासन दिले नाही तर जबाबदारी सुद्धा घेतली की, त्याचा व्यवसाय जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत विकी आणि त्याच्या कुटुंबाला ते नियमित अन्नधान्य पुरवतील.

श्री. लोणारे म्हणाले, ‘हे आम्ही काही फार मोठं काम केलं आहे, असं नाही. तर आपण या समाजाचं काही देणे लागतो,  ही भावना मनात ठेवली आणि कृती केली’.  ही गोष्‍ट प्रत्‍येकासाठी नक्‍कीच प्रेरणादायी आहे.

पुनर्भेट

बंडगार्डन पोलीस स्टेशनअंकित ताडीवाला रोड पोलिस चौकीचे ए.पी.आय. अमोल काळे यांना हॉटेल मेरूच्या गेटसमोर ८० वर्षांची एक वृध्द महिला आढळून आली. त्या महिलेची अवस्था पाहून त्‍यांनी माहिती घेतली. जेव्हा त्यांना कळालं की, ती बोलू शकते आहे, तेव्हा त्यांनी तिची विचारपूस केली. तिच्यासाठी खाण्या-पिण्याची व्यवस्था केली. त्यांनी तिचा फोटो काढून त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधील तब्बल ६०० लोकांपर्यंत पोहचवला. काही वेळातच त्यांना कळाले की, ती वृध्द महिला बालमित्र मंडळ भागात राहते. त्यांनी तिला तिच्या घरी पोहोचविण्याची सोय केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी तिच्या नातेवाईकांना चौकीवर बोलावून घेतले आणि अशा दिवसात वृध्द नातेवाईकांची कशी आणि किती काळजी घेतली पाहिजे, याबद्दल समजावून सांगितले. त्यांच्यावर नीट लक्ष ठेवा आणि त्यांना घराबाहेर पडू देवू नका, अशी तंबी सुध्दा दिली.

मेरे पास मेरी माँ है !

कोथरूडमध्ये एक अंध दाम्पत्य राहते. ते दोघेही एका बँकेत नोकरी करतात. ती महिला गरोदर  होती. नववा महिना चालू झाला होता. अशा वेळी तिच्याजवळ तिची आई असणं खूप आवश्यक होतं. अर्थात असं कुठल्याही गर्भवती महिलेला वाटणं साहजिकच आहे. पण लॉकडाऊनमुळे लातूर येथे राहणारी तिची आई पुण्यात येणार कशी ? हा मोठा प्रश्न होता. त्यांनी क्राईम ब्रँचचे डी.सी.पी. बच्चन सिंग यांना संदेश पाठवला. डी.सी.पी. साहेबांनी तात्‍काळ क्राईम ब्रँच वरिष्ठ पी.आय. महेंद्र जगताप यांना याबाबत कल्पना दिली.

आता त्या महिलेच्या आईला पुण्यात आणायचं कसं ? खूप प्रयत्नानंतर त्यांना कळालं की, त्यांचेच एक सहकारी पोलीस नाईक दाऊद सय्यद हे सुट्टीसाठी लातूरला गेले आहेत. त्यांनी लगेच श्री. दाऊद यांच्याशी संपर्क साधला. श्री. दाऊद यांनी त्यांना सोबत घेतलं आणि कोथरूडमध्ये त्या अंध दाम्‍पत्यापर्यंत पोहचवलं ! टाळेबंदीच्‍या काळात  ‘मला माझी आई हवी’ ही त्या महिलेची इच्छा खाकी वर्दीने पूर्ण केली.

बाजीगर

टाळेबंदीचे (लॉकडाऊन) व्यवस्थित पालन होते आहे ना,  हे पाहण्यासाठी बिट मार्शल ग्रुपची नेमणूक करण्यात आली होती. बिट मार्शल ग्रुपमधील शेखर बाबासाहेब कौटकर (बिल्ला नं. ३६३६) हे बालगंधर्व भागात डयुटीवर होते. त्‍यावेळी त्यांना रस्त्याच्या कडेला एक माणूस झोपलेला आढळला. पण त्याला गाढ झोप लागली आहे, असे वाटून ते पुढील फेरीसाठी गेले. ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांना तोच माणूस त्याच अवस्थेत तिथे निपचित पडलेला दिसला. त्याची काहीच हालचाल होत नव्हती. त्याची ती अवस्था पाहून हा माणूस मृत तर झाला नसेल ना अशी त्यांना शंका आली. कोरोना संसर्गाचे वातावरण बघता त्यांना त्याच्याजवळ जाण्याचे धाडस होईना. तरी सुध्दा जराही वेळ न घालवता त्यांनी त्वरीत जवळच्या पोलीस चौकीशी संपर्क साधला. त्यानंतर पुणे महानगरपालिकेचे एक डॉक्टर आले. त्यांनी त्या माणसाला तपासले आणि भुकेने व्याकूळ झाल्यामुळे त्याची अशी अवस्था झाली असल्‍याचा निष्‍कर्ष काढला. श्री. कौटकर यांनी लगेच त्या माणसासाठी खाण्याच्या पदार्थांची व्यवस्था केली. पुरेसं खाणं झाल्यावर त्या माणसाला जरा तरतरी आली. त्याला काही प्रश्न विचारल्यावर त्याने कसेबसे सांगितले की, तो एक सिक्युरिटी गार्ड आहे. पण लॉकडाऊन असल्याने त्याची खाण्यापिण्याची सोय होऊ शकली नाही. अंगातील त्राण गेल्याने त्याची अशी अवस्था झाली होती. त्यानंतर १०८ क्रमांकावरुन ॲम्बुलन्सला बोलावून त्याला अधिक तपासणी आणि उपचारासाठी ससून रूग्णालयात पाठवण्यात आले.

तो माणूस मूळचा सातारा भागातील होता. पण असाध्य व्याधीमुळे घरचे लोक त्याला सांभाळण्यास तयार नव्हते. ४-५ दिवसांनी कळाले की, त्याचा ससून रुग्‍णालयात मृत्यू झाला आणि त्याचा मृतदेह शवागारात हलविण्यात आला आहे. पोलीस आणि प्रशासनाने नातेवाईकांना ही बातमी कळविण्याचा प्रयत्न केला. पण शव ताब्यात घेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही म्हणून पोलीसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

निधड्या छातीचे योद्धे !

चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनअंकीत पाषाण पोलीस चौकीमध्ये पीएसआय राकेश सरडे त्यांच्या कामात व्यस्त होते.  त्यांना पाषाण येथील सोसायटीमधून एका महिलेचा फोन आला की, तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. पी.एस.आय सरडे आणि त्यांचे सहकारी महेश बामगुडे, अनिकेत भोसले आणि दिपक फासले यांच्या सोबत पोलीस मित्र गब्बर शेख हे त्या महिलेच्या घरी पोहचले.

तिकडे जात असतानाच त्यांनी पुणे महानगरपालिकेचे संपर्क अधिकारी आणि अँब्युलन्स सेवेला सुध्दा फोन करुन या घटनेची कल्पना दिली. पण, तिथे पोहचल्यावर महानगर पालिकेने मृतदेह स्‍वीकारुन पुढील कार्यवाहीस नकार दिला. याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी त्या गृहस्थाचा कोविड-19 अहवाल पॉझिटिव्ह आला होता. राकेश सरडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि 9 मजले चढून ते त्या घरात पोहचले. त्यांच्यातील दोघांनी पीपीई कीट परिधान केले होते. त्यांनी अधिकृत प्लॅस्टिकच्या बॅगेत तो मृतदेह व्यवस्थित गुंडाळला आणि ससूनमध्ये नेला. तिथे शवचिकित्सा झाल्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार सुध्दा केले.

खाकी वर्दीतील निधड्या छातीच्या योद्ध्‍याने ते धाडस दाखवले, ते जीवावर उदार होवून लढले.  श्री. सरडे  म्हणाले की,  ‘हे एक टिमवर्क होते आणि पार पाडायचेच असाच सगळ्यांनी विचार केला.’

प्राण रक्षक!

सोलापूरला राहाणाऱ्या अभय चावरे यांना त्यांच्या लहान मुलासाठी पुण्यातील सिंहगडरोड येथील डॉक्टरांनी काही औषधे कुरियरने पाठवली होती. पण टाळेबंदीमुळे शहरांतर्गत कुरियर सेवा बंद झाली होती आणि औषधांचे पार्सल अडकून पडले. श्री. चावरे यांनी सिंहगडरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांच्याशी संपर्क साधला. ज्यांनी पुढे ए.पी.आय. सतीश उमारे यांना काही सूचना दिल्या. श्री. उमारे यांनी ती कुरियर कंपनी शोधून त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना त्यांचे दुकान उघडायला लावून किलोभर वजनाचे औषधाचे पार्सल ताब्यात घेतले. नंतर पोलीस नाईक श्री. पोळ यांच्याकरवी ते पार्सल हडपसर येथील त्यांचे सहकारी ए.पी.आय. श्री. पाटील यांच्याकडे पोहचवले. श्री. पाटील यांनी ते सोलापूरला पाठवण्याची व्यवस्था केली आणि ती औषधे त्या गरजू मुलापर्यंत वेळेत पोहचली. श्री. उमारे म्हणाले की, हे एक टीमवर्क होतं. शेळके साहेब, पोलीस नाईक पोळ, माझे सहकारी पाटील यांच्या प्रयत्नातून ते पार्सल सोलापूरला वेळेत पोहोचवले गेले, ही समाधानाची व आनंदाची बाब होती.

का रे दुरावा ?

पोटचा गोळा म्हणजे आई वडिलांचा जीव की प्राणच! पण लष्कर पोलीस स्टेशनमधील पोलीस नाईक दिपक लांडगे यांना त्यांच्या नवजात मुलीला तब्बल दोन महिने स्पर्शसुध्दा करता आला नव्हता. श्री. लांडगे यांना एक मुलगा आहे. आता मुलीच्या जन्माने त्यांना खूप आनंद झाला होता.

१४ मार्च रोजी जन्मलेल्या मुलीला माझ्या हातात घेण्यासाठी २४ मे पर्यंत वाट पहावी लागली. माझ्यासाठी हे खूपच कठीण होतं. पण, मी संयम राखला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसले आणि लष्कर पोलीस स्टेशनमधील माझ्या सहकाऱ्यांनी मला खूप धीर दिला, याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे! अशा शब्दात दिपक लांडगे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

या कालावधीत ते त्यांच्या मुलीला व्हिडिओ कॉल किंवा व्हॉट्सअॅपवर आलेल्या फोटोतच पाहू  शकले. कारण, पुण्यातील कोविड बाधीत क्षेत्र कॅम्प भागात ते आणि त्यांचे सहकारी गरजूंना मदत करत होते. लॉकडाऊनच्या काळात अनेकांची भूक त्यांनी भागवली. तब्बल दोन महिन्यानंतर जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीला पहिल्यांदा हातात घेतलं, तो क्षण म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे, असे ते म्हणाले.

आजीबाईंचा वाढदिवस

जोरात टाळया वाजल्या. सर्वांच्या चेहऱ्यावर छान हसू फुललं आणि आनंद पसरला. विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांचे डोळे पाणावले. कारण त्यांनी 83 वर्षांच्या एका आजींचा वाढदिवस धडाक्यात साजरा केला.  मागील साठ दिवसांपासून या आजींनी घराबाहेर पाऊल टाकलं नव्हतं. पण, आम्ही सर्वांनी ठरवून त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्याचा आनंदी चेहरा, त्यांचं ते हसू पाहून आम्ही सुध्दा आनंदलो. अशा ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, म्हणूनच आम्हाला बळ मिळतं, असे रवींद्र कदम म्हणाले.

‘आजी, हॅपी बर्थ डे’ असं जोरात ओरडून आजींनी शंभरी नक्की पार करावी, अशा शुभेच्छा सर्वांनी व्यक्त केल्या.

एक कहाणी पोतराजाची

पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर आणि गल्लोगल्ली फिरून स्वत:च्या उघड्या पाठीवर चाबकाचे फटके मारून गुजराण करणाऱ्या पोतराजाला सगळेच ओळखतात. हडपसर भागात असाच एक पोतराज या गल्लीतून त्या गल्लीत पोटासाठी काही मिळतं का ते शोधत फिरत होता. पण लॉकडाऊनमुळे त्याच्यावर बिकट प्रसंग आला. कुणीतरी त्याला हडपसर पोलीस स्टेशनमध्ये जावून नोडल ऑफिसर ए.पी.आय. प्रसाद लोणारे यांना भेटायला सांगितलं. आतापर्यंत बहुतेक सर्व नागरिकांना समजलं होतं की, लोणारे साहेबांनी अनेक लोकांना अशा काळात मदत केली आहे. चौकीबाहेर बराच वेळ थांबल्यावर त्या पोतराजाची आणि लोणारे साहेबांची भेट झाली. त्‍यांनी आणि त्यांच्या सहका-यांनी त्याला १५ दिवस पुरेल एवढे अन्नधान्य दिले.  ही देवाचीच कृपा झाली असे समजून पोतराजाने सगळ्यांचेच आभार व्यक्त केले.

ईद साजरी होणारच !

आपल्या आयुष्यात उत्सव रंग भरतात. पण सध्या कोरोनाच्या संकटामुळे कसला सण आणि कसला उत्सव. दर वर्षी दिमाखात साजरी होणारी ईद यावर्षी साधेपणाने साजरी करावी लागली. काही जणांच्या नशिबी ते सुध्दा  नव्हतं. पोलीस नाईक रामचंद्र गुरव यांना अमन दौलत खान हा 12 वर्षाचा मुलगा स्वारगेट येथील जेधे चौकात आढळून आला. तो त्याच्या आजी –आजोबांसोबत राहत होता. जे कंत्राटी कामगार होते. श्री. गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या तिघांना नियमितपणे फक्त खायला दिलं नाही तर त्यांचं रेशनसुध्दा भरुन दिलं.

जेव्हा अमनला विचारल की, या वर्षी तो ईद कशी साजरी करणार आहे? तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ‘शक्यच नाही हो!’ त्याने दिलेलं उत्तर ऐकून श्री. गुरव हेलावून गेले. त्यांनी कपड्यांसाठी त्या मुलाची मापं घेतली आणि ईद साजरी करण्यासाठी त्याला नवीन कपडे शिवून दिले. अमन तर हरकून गेला. एका मुस्लिम मुलाची ईद साजरी करण्यासाठी जणू  श्री रामचंद्रच अवतरले! खरंच, माणुसकीला कुठलाच रंग नसतो.

अनाथाला दिले जीवदान

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा यांनी दिलेल्या माहितीनुसार साळुंखे विहार रोड येथे एक भिक्षेकरी फीट आल्याने खाली कोसळला होता. त्याच्या डोक्याला मार लागल्याने रक्त येत होते. नागरिकांपैकी कोणीही मदत करायला पुढे येत नव्हते. मार्शल ड्युटी असलेले पोलीस शिपाई प्रशांत कांबळे व आनंद धनगर यांनी त्याला पाहताच रिक्षातून जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले व  तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार झाले.  या दोघांनी त्याच्या चहा -जेवणाची सुध्दा सोय केली. तसेच पुढील उपचारांसाठी मीनाताई ठाकरे या शासकीय रुग्णालयात दाखल केले.  या मार्शल्समुळे एका निराधार व्यक्तीचे प्राण वाचले.

मदत मोलाचीप्रचिती माणुसकीची !

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर 30 एप्रिल रोजी सकाळी कात्रज चौकात नाकाबंदीवर ड्युटी करत होते. यावेळी आठ महिन्यांची एक गरोदर महिला खांद्यावर बॅग आणि आपल्या 5 वर्षांच्या मुलासह चालत येताना त्यांना दिसली. मेव्हण्यांचे निधन झाल्याने त्या मार्चमध्ये गुजरातहून पुण्यात बहिणीकडे फातिमानगर येथे आल्या होत्या आणि लॉकडाऊनमुळे इथेच अडकल्या. परंतु, त्रास होऊ लागल्यामुळे त्या सकाळी 5 वाजताच तिच्या घरुन निघाल्या. अँब्युलन्स मागवून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये पाठविले व त्यांच्या चहा-नाष्ट्याची व्यवस्था केली. त्यांच्या पतीशी संपर्क साधून त्यांना पुण्याला येण्यास सांगितले व त्यासाठी लागणाऱ्या डिजीटल पासबाबत मार्गदर्शनही केले. पास मिळण्यास दोन दिवस लागत असल्याने या महिलेला निवारा केंद्रात दाखल केले. पास मिळताच तिचे पती येथे आले व तिला सोबत घेऊन गुजरातला घरी गेले. या महिलेची परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, विद्या भोसले, उपनिरीक्षक महेंद्र पाटील यांनी या कामात मार्गदर्शन केले.

मायलेकींची पुनर्भेट

पुण्यातील मूकबधीर जोडप्याची ७ वर्षांची मुलगी आजीकडे गावी गेली होती. परंतु लॉकडाऊनमुळे तिथेच अडकली. काही दिवस राहिली. परंतु नंतर ती आई-बाबांकडे जाण्याचा हट्ट करू लागली.         त्यासाठी तिच्या मामाला तिला सोडण्यासाठी पुण्याला येण्याची व नंतर गावी परत जाण्यासाठी प्रवासाची परवानगी द्यावी, अशी विनंती सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्याकडे केली. त्‍यानुसार परवानगी देण्यात आली. तसेच प्रवासादरम्यान अडचण आल्यास गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी स्वतःचा मोबाईल नंबरही दिला. ती मुलगी आई-बाबांकडे सुखरूप पोहोचल्याचे नंदिनी जाधव यांनी नंतर कळवले व पोलिसांचे आभार मानले. माझ्याकडे त्या जोडप्याने विनंती केली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची हाक पोलीस खात्याने ऐकली, त्याबद्दल त्‍यांनी कृतज्ञता व्‍यक्‍त केली. त्या पुढे म्हणतात, ड्युटी करत असताना पोलीस बांधव स्वतःच्या मुला-बाळांना भेटू शकत नाहीत. पण समाजात सर्वांनाच मदत करण्यासाठी ते पुढे असतात, मदतीचा हात देतात. यामुळेच मला पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. बच्चन सिंह साहेबांसारखे अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांच्‍या प्रयत्नांमुळेच आज ती लहानगी आपल्या आईच्या कुशीत आहे.  पुन्हा एकदा त्यांना मनापासून धन्यवाद.

आजींना मोलाची मदत

प्रभात पोलीस चौकीचे बीट मार्शल चेतन चव्हाण आणि मोहन मालगुंडे ३ मे रोजी प्रभात रोड गल्‍ली  क्रमांक 8 येथे गस्तीवर असतांना तेथील एका वृद्ध महिलेने त्यांना आवाज देऊन बोलावले. त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात आले की, त्या एकट्या राहत असून गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना पैशांची गरज होती. परंतु लॉकडाऊनमुळे वाहन उपलब्ध होत नव्हते. त्यांना पायाच्या दुखण्यामुळे पेन्शन आणण्यासाठी चालत जाणेही शक्य नव्हते आणि म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रच्या भांडारकर रोड शाखेतून पेन्शनची रक्कम काढून आणण्याबाबत त्यांनी बीट मार्शल्सना विनंती केली. त्यानुसार बँकेचे पुस्तक घेऊन बीट मार्शल्स बँकेत गेले. बँक व्‍यवस्‍थापकाशी चर्चा करून त्या आजींच्‍या खात्यातून रक्कम काढली व आजींना पैसे सुपूर्द केले. यासाठी स्वतः बँक व्‍यवस्‍थापक पोलिसांसोबत त्यांच्या घरी गेले होते. यापुढेही दर महिन्याची पेन्शन घरी पोहोचवण्याची तयारी दर्शवली. तसेच काही मदत लागल्यास व्‍यवस्‍थापकांनी स्वतःचा फोन नंबर आजींना दिला. विनंतीला मान देऊन मोलाची मदत केल्याबद्दल या आजींनी  प्रभात बीट मार्शल्सचे मनापासून आभार मानले.

संजीवनीच जणू

दत्तवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांना माहिती मिळाली की, एका वृद्ध दाम्पत्याला मदतीची गरज आहे. ज्यांचा मर्चंट नेव्हीत नोकरीस असलेला मुलगा लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडला आहे. जराही वेळ न दवडता श्री. घेवारे त्यांच्या घरी गेले. त्यांना लक्षात आले की, दाम्‍पत्‍याला औषधांची तसेच डोळ्यांच्या तपासणीची गरज होती. त्यांनी लगेचच डॉक्टरांची व्यवस्था केली. त्यांची तपासणी करुन घेतली व लिहून दिलेली औषधे स्वतः आणून दिली. तसेच डोस कसा घ्यायचा आहे हेही सांगितले. इतकं करूनही  ‘माझ्या कुटुंबासाठी केलं असतं तेच केलं’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पोलीस स्टेशनपासून पंधरा मिनिटांवर घर असूनही दोन महिने श्री. घेवारे घरी गेले नव्हते. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सेल्फ क्वारंटाईन करुन घेतले होते, असे ते अभिमानान सांगतात.

सह्रदयी दामिनी

सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती केदारी, यास्मिन खान व श्रीमती सोनावणे यांचे दामिनी पथक जीपीओ परिसरात दि. ९ जून २०२० रोजी पेट्रोलींग करत होते. सोबत लहान मुले असलेली एक महिला साधू वासवानी चौकात भीक मागत आहे व त्यामुळे तेथे गर्दी होते आहे, अशी एका गृहस्‍थाने तक्रार केली. दामिनी पथकाने तेथे जाऊन पाहिले. तेव्हा कळले की, ती महिला उत्तर प्रदेशची रहिवासी होती व तिला परत जायचे होते. शिवाय लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून ती व तिची मुले उपाशी होती. तिला पथकाने वडापाव खाण्यास दिले, पाचशे रूपये दिले. तसेच उत्तर प्रदेशला जाणाऱ्या रेल्वेची चौकशी करून तिला माहितीही दिली. जेव्हा कोणीही लक्ष देत नव्हते, तेव्हा पोलीसांनी जेवण दिले व गावी जाण्यासही मदत

केली. याबद्दल तिने दामिनी पथकाचे मनःपूर्वक आभार मानले तेव्‍हा पथकाच्‍या डोळ्यांतही समाधानाचे अश्रू तरळले.

माणुसकीची परीक्षा पहाणारा टाळेबंदीचा कालावधी निश्चितच कोणालाही आवडणारा नव्‍हता.  पण परिस्थितीच तशी होती. या कालावधीत लोकांनीही  पोलिसांना मोलाची साथ दिली. वेगवेगळ्या प्रसंगांमुळे पोलीस व लोकांमध्ये विश्वासाचे एक घट्ट नाते वृध्दींगत झाले. खाकी वर्दीतील ‘माणूस’ही अनेकांनी जवळून अनुभवला.

राजेंद्र सरग, जिल्‍हा  माहिती अधिकारी, पुणे