बांबू उद्यानात प्रवेश करता-करता दोन्ही बाजूला ‘बांबूसा वलगेरिस स्टायटा’च्या सोनपिवळ्या बांबूचा कमान असलेला बोगदा लक्ष वेधून घेतो. त्याखालून चालताना निसर्गसुखाची अनुभूती येते. पुढ्यात अनोखी अशी वन-औषधी बाग आहे. औषधी वनस्पतीच्या असंख्य आणि दुर्मिळ रोपट्यांची वाढ व त्यांचे जतन येथे केले जात आहे. प्रत्येक रोपांवर त्याविषयी विस्तृत माहितीसुध्दा दिली आहे. एक आश्चर्यकारक बाब म्हणजे या बागेच्या मधोमध एक वेली बांबू पन्नास फुटाच्या झाडावर वेलीसारखा चढून परत बाजूच्याच दुस-या झाडावर अर्ध्यापर्यंत पोहचलेला दिसतो. बांबू आणि वेलीसारखा ! हा बांबू आहे ‘डायनोग्लोबा अंडमानीका’ प्रजातीचा. तो केवळ अंदमानातच आढळतो.
‘बांबू रोपवाटिका’
बाजूला लागूनच डाव्या हातावर महत्वपूर्ण ‘बांबू रोपवाटिका’ आहे. एका मोठ्या भूखंडावर असंख्य दुर्मिळ बांबू प्रजातींची रोपटी लावलेली आहेत. सुरुवातीलाच आसाममध्ये असलेला ‘बांबूसा आसामिका’चे रोपटे असून ते अंदाजे दहा फूटापर्यंत वाढले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या बांबूला फांद्या नसून तो सरळ वाढतो. त्याची गोलाई अंदाजे दोन इंच व्यासाची असून तो अत्यंत टणक आहे. त्यामुळे या बांबूची मागणी देशात अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे. बाजूनेच ‘बांबूसा अफीनिस’ बांबूचे रोपटे दिसते. हा बांबू सरळ, लवचिक आणि न तुटणारा असल्यामुळे जगभरात त्याची मागणी मासोळी पकडण्याकरिता फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. म्हणून तो भारतातून निर्यात केला जातो.
देशातील या पहिल्या बांबू उद्यानात जगभरातील एकूण 63 प्रकारच्या बांबू प्रजातीची लागवड केली असून त्यात भारतातील 55 व 08 प्रकारचे जगातील इतर बांबू प्रजाती आहेत. त्यात जगातील सर्वात ऊंच, सर्वात मोठा, विना फांदीचा बांबू, काटेरी बांबू, खाण्यायोग्य बांबू इ. प्रकार आहेत. अंदमान-निकोबारमध्ये असलेला वेली बांबू आणि एवढेच नव्हे तर मंजूळ सप्तसूर काढणा-या बासरीचा ‘वेणूनाद’ लावणा-या बांबू प्रजातीची लागवडही येथे करण्यात आली आहे.
भारताचा दुसरा नंबर
जगात बांबू उत्पादनात चीनचा पहिला क्रमांक असून भारताचा दुसरा नंबर लागतो. चीनमध्ये बांबूच्या 340 ते भारतात बांबूच्या 134 प्रजाती आहेत. तर महाराष्ट्रात केवळ दहा प्रकारचे बांबू प्रजाती आहेत. चीनमध्ये तर बांबूचे साहित्य बनविण्यापासून सॉप्ट ड्रिंक करिताही बांबूचा उपयोग केल्या जातो. बांबू हा पर्यावरण संतुलन राखत असून लाकडाऐवजी बांबूचा उपयोग करण्यात येवू शकतो.
दाक्षिणात्य देशामध्ये बांबूची सर्वात जास्त उत्पादने तयार करण्यात येतात. त्यामुळे प्लॅस्टीक वापराला आळा बसत असून पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होते. भारतातही काही राज्यात बांबूची साहित्य निर्मिती होते. बांबू हा दैनंदिन वापरासोबत घराचीही शोभा वाढवण्यास मदत करते. भारतात एकूण असलेल्या वनक्षेत्रापैकी १३ टक्के ही बांबूची वने आहेत. देशातील या पहिल्या बांबू उद्यानात कमळ उद्यान, कॅक्टस उद्यान आणि फुलपाखरु उद्यानाचीही उभारणी होत असून पर्यटकांकरिता ही एक पर्वणीच ठरत आहे.
ही काष्ट सदृश्य, तंतूमय पण काठिण्य असलेली वनस्पती जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळून येते. याच्या असंख्य जाती-प्रजाती आहेत. भारतातील सर्व जंगलात बांबूची वने आढळतात. बांबूच जीवनचक्र 30 ते 120 वर्षाच असून तीस वर्षानंतर त्याला फुल येतात आणि त्यानंतर त्या बांबूच आयुष्य संपून जाते. ख-या अर्थानं बांबू हा मानवाचा सोबती आहे. जन्मापासून ते मरेपर्यंत बांबू त्याची सोबत करत असतो. बांबू हा दरिद्र् य नारायणाचा कल्पवृक्ष असून मध्यम वर्ग आणि पंचतारांकित संकृतीला अलंकृत करणारा आहे. इंडोनेशिया देशामध्ये पंचतारांकित हॉटेल्समध्ये बांबूपासूनच सजावट करतात. एवढच नव्हे तर वाद्यवृंद सुध्दा बांबूपासनच तयार केला जातो. परदेशी पर्यटकांचं ते एक मोठं आकर्षण आहे.
वनपाल सैय्यद अहमद हे अमरावतीच्या या बांबू उद्यानाची प्रमुख धूरा सांभाळणारा बांबूवेडा माणूस. गेल्या तेवीस वर्षापासून ते रात्रंदिवस भारतातील अस्तित्वात येत असलेल्या पहिल्या बांबू उद्यानासाठी झटत आहे. देशभरातून आणि विदेशातून विशिष्ट बांबू प्रजातीचा शोध घेवून आणि ज्ञान प्राप्त करुन अमरावतीच्या या चाळीस हेक्टरमधील वडाळी बांबू उद्यानात ते लावत गेले. एवढेच नव्हेतर चीनमधील जगप्रसिध्द ‘अंजी बांबू गार्डन’ पाहिल्यानंतर ते भारावून गेले. तेथील बांबू उद्यानाची भव्यता आणि जगभरातील पर्यटकांची ओसंडून वाहणारी गर्दी, बांबूचे साहित्य, उत्पादने इ.मुळे त्यांची जिज्ञासा वाढली आणि येथेच त्यांना खरी प्रेरणा मिळाली आणि अमरावतीच्या भारतातील पहिल्या बांबू उद्यानाचा प्रवास अधिक गतीशील झाला. त्याला खरी साथ मिळाली ती अमरावतीच्या वन विभागातील वरिष्ठ अधिका-यांची. आज या उद्यानातील बांबूच्या असंख्य रांजीमधून फिरताना सुखद अनुभव येतो.
बांबूचे साहित्य
दिवसेंदिवस वाढत जाणा-या सिमेंट काँक्रिटच्या शहरांमुळे भयंकर वृक्षतोड झाली. पाखरांची लाखो घरटीही उध्वस्त झाली. त्यामुळे पक्षी नाहीसे झाले. अमरावतीच्या या बांबू उद्यानात टाकावू बांबूपासून पक्ष्यांची सुंदर घरटी बनविणे सुरु झाले असुन, आतापर्यंत शेकडो बांबू घरट्यांची विक्री झाली. ही घरटी अत्यंत नैसर्गिक पध्दतीने बनविण्यात आली असून अशा जवळपास सहा हजार घरट्यांची मागणी त्यांच्याकडे नोंदविली आहे. त्यामुळे आता या बांबू घरट्यांमुळे सिमेंट काँक्रिटच्या शहरातही पक्ष्यांची संख्या वाढण्यास सुरवात झाली आहे.
तसेच गांडूळ खताचीही निर्मिती येथे होत असून त्यासही पर्यटकांकडून भरपूर मागणी येत आहे. याच बांबू उद्यानात वनधन-जनधन सेंटरमध्ये येथेच बांबूपासुन बनविलेल्या सुप, टोपल्या, दवड्या, ग्रिटिंग कार्ड विक्रीकरिता उपलब्ध असून त्यासही भरपूर मागणी वाढली आहे. या बांबू उद्यानात अत्यंत आकर्षक असे बांबू माहिती केंद्रही सुरु करण्यात आले असून, तेथे बांबूपासून अत्यंत कलाकुसरी केलेले साहित्य ठेवण्यात आले आहेत. यात कंदिल, फुलझाडे, टेबल, सोफा, बॅग आणि इतकेच नव्हेतर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळासाठी लागणारे धनुष्यबान इ. साहित्यही ठेवण्यात आले आहेत. बांबूनिर्मित आकर्षक असे उपहारगृह येथे सुरु करण्यात येत असून तेथे बांबू कोंबापासून तयार केलेले विशेष पदार्थ ठेवण्यात येणार आहे.
देशातील एकमेव अशा या बांबू उद्यान पाहण्याकरिता दररोज पर्यटकांची गर्दी वाढत असून प्रती व्यक्ती रुपये 20 एवढे नाममात्र शुल्क ठेवण्यात आले आहे. सुट्टीच्या दिवशी हे बांबू उद्यान पर्यटकांनी गजबजले जात असून आत्तापर्यंत 8 महिन्यात येथे जवळपास दोन लाख पर्यटकांनी भेट दिली असून महिन्याला जवळपास 5 लाख रुपये एवढा महसुलही मिळत आहे. गेल्या 15 ऑगस्ट रोजी येथे जवळपास 11 हजार पर्यटकांनी भेट दिली असून हा आजपर्यंतचा उच्चांक आहे. बांबू उद्यानाला मिळणा-या आर्थिक उत्पन्नातूनच येथे अनेक विकास कामे करण्यात येत आहे.
अमरावतीच्या वडाळी येथील वन उद्यानात 23 वर्षापूर्वी लावलेलं बांबूचं रोपट आज जवळपास 18 हेक्टर परिसरात बांबू उद्यान म्हणून विस्तीर्णपणे पसरल आहे. भारतातील सर्वात मोठ आणि पहिल बांबू उद्यान म्हणून नावारुपास येण ही बाब महाराष्ट्राकरिता अत्यंत अभिमानास्पद आहे. या बांबू उद्यानात एक फुटापासून ते शंभर फुटापर्यंत वाढलेल्या बांबूच्या रांजी पसरलेल्या दिसतात. देश-विदेशातील 63 प्रकारच्या विविध बांबू प्रजातीतून हे उद्यान साकारल असून बासरीसाठी लागणारा ‘मेलीकाना बासिफेरा’ बांबू, जगातील सर्वात मोठा जाडी असलेला महाबांबू, सर्वात उंच वाढणारा ड्रायड्रोक्लेनेस ब्रँडेसी, अंदमानचा वेली बांबू, आसामचा सरळ वाढणारा बिन-फांद्यांचा बांबू येथे आहेत. आता तर बांबूवर आधारित विविध उपयोगी आकर्षक वस्तूचे उत्पादन आणि विक्रीही सुरु झाली आहे. वडाळीच्या या बांबू उद्यान परिसरात सोबतीला कमळ उद्यान, कॅक्टस उद्यानसुध्दा आहेत. ते पाहण्याकरिता दिवसेंदिवस वाढणारी देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी ही सरकारच्या वन विभागास मिळणारी यशाची पावती आहे.
– प्र.सु.हिरुरकर, विभागीय माहिती कार्यालय, अमरावती.