आस नाविन्याची… वाट प्रगतीची!

‘जुने जाऊ द्या मरणालागुनी

जाळुनी किंवा पुरुनी टाका

सडत न एक्या ठायी ठाका

सावध!ऐका पुढल्या हाका

खांद्यास चला खांदा भिडवूनी

केशवसुतांच्या ‘तुतारी’ या कवितेतील हे शब्द आपल्याला जुने सोडून नव्याची कास धरण्याचा आणि त्यासाठी एकत्र येत खांद्यास खांदा लावून चालण्याचा संदेश देते. पुढल्या हाका ऐकत जुन्याकडून नव्या तंत्रज्ञानाकडे जात हा संदेश आता महिलांच्या बचत गटांनी अंगिकारला आहे. महिला बचत गटांनी समूह स्वरुपात तसेच गटाच्या सदस्य महिलांनी स्वतंत्रपणेही स्थापन केलेले नवनवीन लघुउद्योग हे याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. अशाच एका महिलांच्या स्वयंसहायता समुहातील योगीता सचिन पाटेकर या महिलेची ही यशोगाथा..

मुळशी तालुक्यातील पौड या गावात 18 स्वयंसहायता समूह स्थापन झाले आहेत. समता स्वयंसहाय्यता समुह हा त्यापैकीच एक. या समुहाची स्थापना जानेवारी 2014 मध्ये झाली. गटाच्या स्थापनेनंतर पहील्या बैठकीपासूनच अंतर्गत कर्जवाटप व नियमित परतफेडही चालू झाली.

अडीअडचणीच्या वेळी समुहाकडून आवश्यक तेव्हा कर्ज मिळू लागल्याने सदस्यांच्या कुटुंबांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत झाली. समुहातील नियमित बैठकीत महिलांमध्ये स्वत:चा छोटासा उद्योग व्यावसाय सुरू करावा असा आत्मविश्वास निर्माण झाला. या समुहातील योगीता सचिन पटेकर यांनी स्वत:चा व्यावसाय सुरू करुन समुहापुढे एक आदर्श ठेवला आहे.

श्रीमती पाटेकर या सध्या समता स्वयंसहाय्यता समुहात सचिव म्हणून काम पाहतात. समुहात येण्याअगोदर त्यांची परिस्थिती जेमतेमच होती. त्यांचे पिको फॉल व डिझायनींगचे शिक्षण झालेले होते. त्या साध्या प्रकारच्या शिलाई मशिनवर वर्क करुन कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यास हातभार लावीत. नंतर जवळील 10 हजार रुपये आणि स्वयंसहाय्यता समुहातून 30 हजार रुपये कर्ज स्वरुपात घेऊन नवीन हायस्पिड शिलाई मशिन खरेदी केली. मशिन अत्याधुनिक असल्याने कमी वेळेत जास्त व उत्कृष्ट असे शिलाई काम करुन जास्तीचा पैसा मिळू लागला.

2015 च्या महिला दिनी पंचायत समिती परिसरात स्वयंसहाय्यता समुहाचे विविध वस्तूंचे, कपड्यांचे स्टॉल, विक्री व प्रदर्शन पाहून त्यांना गटाचा स्टॉल लावण्याची इच्छा झाली. पूर्वी करत असलेल्या कामात नवीन काहीतरी करावे या कल्पनेने त्यांनी नऊवारी साडी, कुशन, लेडिज पर्स आदी शिवणकाम सुरू केले.

तालुका स्तरावरील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी समुहाच्या बैठकीस आल्यानंतर विविध उद्योग, व्यवसाय करण्याबाबत, मार्केटिंगच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली. यातून मुळशी जत्रा, मानीनी जत्रा, महालक्ष्मी सरस अशा लघु व्यवसायिक, कारागीरांच्या कलेला वाव देणाऱ्या मोठ्या जत्रात सहभागी होण्याची संधी याबाबत माहिती त्यांना मिळाली.

तयार केलेले कुशन, नऊवारी साडी, हॅन्डवर्क मुंबई येथील महालक्ष्मी सरस प्रदर्शनात घेऊन जाण्याचे ठरवले.  यासाठी स्वत:चे आणि समुहातून कर्ज असे प्रत्येकी 10 हजार रुपये असे मिळून 20 हजार रुपयांचे कुशन, नऊवारी, नवरदेव फेटे, लेडिज पर्स तयार करुन गतवर्षी जानेवारीत महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री- 2020  मध्ये समुहाचा स्टॉल लावून तयार केलेला सर्व माल त्यांनी 40 हजार रुपये एवढ्या रक्कमेत विक्री केला. या महालक्ष्मी सरस मधूनन खूपच कमी दिवसात भांडवली गुंतवणुकीच्या दुप्पट निव्वळ नफा झाला.

गेल्यावर्षी आलेल्या कोविड-19 च्या महामारीने विविध व्यवसायांवर परिणाम केला. त्यातूनही हार न मानता योगीताताई नवीन संधींचा शोध घेत मास्क निर्मितीमध्ये उतरल्या. जवळपास 80 हजार मास्क या काळात त्यांनी बनवले. त्यातून त्यांना चांगला नफा मिळाला. बनवलेल्या मास्कच्या दर्जात अधिक सुधारणा करण्यासाठी त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेतले. पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस विभागास काही मास्क मोफत देऊन सामाजिक बांधीलकी देखील त्यांनी जपली आहे.

मास्क निर्मितीतून मिळालेला नफा आणि आधीची बचत यातून त्यांनी नुकतेच दोन महिन्यापूर्वी अत्याधुनिक दीड लाख रुपयांचे एम्ब्रॉयडरी मशीन घेतले. आता त्यांना एम्ब्रॉयडरीच्या ऑर्डर मिळू लागल्या आहेत. लवकरच यातील गुंतवणूक निघून नफा मिळू लागेल असा त्यांना विश्वास आहे.

सामान्यतेकडून असामान्यतेकडे जाण्याची ओढ श्रीमती पाटेकर यांना नवीन संधी देऊन गेली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक प्रगती झाली असून गावातील ही महिला आता शहरांमध्ये आपल्या कलाकुसरीचा माल सहजतेने विकत आहे. हे महिलांच्या समुहशक्तीचे यशच म्हणावे लागेल..!

योगीता सचिन पटेकर -पंचायत समिती येथे भरलेल्या बचत गटांच्या प्रदर्शनातून नवे काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली आणि महालक्ष्मी सरस प्रदर्शनात मिळालेल्या उत्पन्नामुळे उत्साह वाढण्यास मदत झाली. बचत गटाच्या मदतीने नवे शिलाई यंत्र घेतल्याने नव्या प्रकारचे साहित्य तयार करणे शक्य झाले. आपण आणखी प्रगती करू शकतो असा आत्मविश्वासही मनात निर्माण झाला आहे.