डेअरी तंत्रज्ञानात आहे उज्ज्वल करिअर

अमेरिकेनंतर भारत हा दुध उत्पादनात अग्रेसर देश आहे. शेतीला पूरक असा हा व्यवसाय असल्याने ग्रामीण भागात सर्वात जास्त दुग्धोत्पादन होते आणि त्यावर प्रक्रिया करणारे उद्योगही सहकारी संस्थांच्या माध्यमातून विस्तारले आहेत. डेअरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुध उत्पादन, प्रक्रिया, संकलन, साठवणूक, पॅकेजिंग, वितरण आदी बाबतीत काम केले जाते.

दुध आणि त्यापासून निर्माण होणारे पदार्थ नाशवंत असल्याने त्याच्यावरील प्रक्रिया आणि टीकवणूक यातील संशोधनाला फार महत्व उरते. डेअरी तंत्रज्ञान या क्षेत्रात करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत जाणून घेऊया..

डेअरी तंत्रज्ञानसाठी पात्रता :
डेअरी तंत्रज्ञान हे व्यापक क्षेत्र आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयातून किमान ५० टक्के गुणासहित बारावी पास अनिवार्य आहे. काही संस्था प्रवेश परीक्षाही घेतात.
पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही घेता येते. डेअरी सायन्स हा विषय नव्याने अभ्यासक्रमात अंतर्भूत केला आहे. याचा कालावधी चार वर्षाचा असून डेअरी टेक्नॉलॉजी हस्बैंड्री हा दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. काही विद्यापीठात ट्रेनिंग प्रोग्रामही आयोजित केले जातात. देशात १७ संस्थात डेअरी सायन्स आणि डेअरी टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम शिकवले जातात.
कर्नाल येथील आनंद संस्थेमार्फत डेअरी सायन्स कॉलेजच्या माध्यमातून क्वालिटी कंट्रोल तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खडगपूर येथून बी.टेक आणि एम.टेक (अॅग्रीकल्चर फूड इंजिनिअरिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, वेटरनरी सायन्स) या विषयातील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसेच पीएचडीही या विषयातून करता येईल.

संबंधित अभ्यासक्रम :
• डेअरी मायक्रोबायोलॉजी
• डेअरी केमिस्ट्री
• डेअरी टेक्नॉलॉजी
• डेअरी इंजिनीअरिंग
• अॅनिमल जेनेटिक्स अँड ब्रीडिंग
• लाइव्हस्टॉक प्रॉडक्शन अँड मॅनेजमेंट
• अॅनिमल न्यूट्रिशन
• अॅनिमल फिजिओलॉजी
• बायोकेमिस्ट्री
• डेअरी इकॉनॉमिक्स
• डेअरी एक्सटेन्शन एज्युकेशन
• अॅनिमल बायोटेक्नॉलॉजी
• अ‍ॅनिमल रीप्रॉडक्शन
• फूड क्वालिटी अ‍ॅण्ड अ‍ॅश्युरन्स
• अ‍ॅनिमल सायकॉलॉजी

अशा आहेत संधी :
देशात चारशेपेक्षा अधिक डेअरी प्रकल्प आहेत. जे वेगवेगळ्या दुग्ध उत्पादनांची निर्मिती करत असतात. हे सर्व प्रकल्प यशस्वीरित्या चालविण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज भासत असते. हे क्षेत्र वेगाने विस्तारत असल्याने या क्षेत्रास लागणाऱ्या यांत्रिक साधनांची आवश्यकता लागते त्यानुसारही रोजगाराच्या संधी मिळतात.
सध्या देशात या क्षेत्राशी सबंधित साहित्य निर्मिती करणाऱ्या १५० हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. यात अनुभवी असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. अध्यापन, संशोधनही करता येईल. काही काळ अनुभव घेतल्यानंतर आईस्क्रीम निर्मितीच्या व्यवसायातही उतरता येईल.
डेअरी प्रोसेसिंग प्लॅण्ट, प्रॉडक्ट मार्केटिंग, डेअरी फर्म्स, डेअरी प्लॅण्टस, मिल्क फेडरेशन्स, ग्रामीण बँक, डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड‍्स आदीमध्ये काम करता येईल.

प्रशिक्षण संस्था
• डेअरी सायन्स इन्स्टिट्यूट, मुंबई
• महाराष्ट्र अॅनिमल अँड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी, नागपूर
• कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, उदगीर
• शेठ एमसी कॉलेज ऑफ डेअर सायन्सेस आणंद
• नॅशनल डेअरी रिसर्च इंस्टिट्यूट (एनडीआरआई), करनाल
• आंध्र प्रदेश अॅग्रीकल्चरल विद्यापीठ, हैदराबाद
• जवाहरलाल नेहरू कृषि विश्वविद्यालय, जबलपुर
• अॅग्रीकल्चर इंस्टीट्यूट इलाहाबाद