Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

आयुष आणि कोविड – 19 लढा

हजारो आयुष व्यावसायिक कोविड – 19 विरोधातील जन आंदोलनात सहभागी होत आहेत, पारंपरिक औषधांच्या पद्धतीमध्ये या चळवळीला लक्षणीय बळकटी मिळाली आहे. ही चळवळ आयुष दवाखाने, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, निरामय केंद्र आणि अन्य केंद्रांमध्ये चालविली जात आहे. आयुष व्यावसायिक हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून, त्यांच्यात मिसळून काम करीत आहेत, आणि म्हणूनच जागरुकता मोहिमेदरम्यान लोकांच्या सवयींवर परिणाम घडवून मोहिमेला वेग देण्यामध्ये ते यशस्वी होऊ शकले आहेत.

आयुष मंत्रालयाच्या आढाव्यामध्ये असे पाहण्यात आले आहे की, 26 ते 30 ऑक्टोबर 2020 या पाच दिवसांच्या काळात आयुष भागधारकांनी प्रत्यक्ष संवाद साधण्यापासून ते डिजीटल माध्यमांपर्यंतच्या चॅनलद्वारे कोविड– 19 परिस्थितीत योग्य सवयींबाबत सूचना देणारे संदेश सुमारे 1 कोटी 11 लाख लोकांपर्यंत पोहोचविले. सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात सार्वजनिक आरोग्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे, कारण लोक सण साजरे करण्याच्या भावनेत, उत्साहात सावधगिरी बाळगण्याचे विसरतात, आणि साथीच्या रोगाचा प्रसार या काळातच होण्याचा धोका वाढतो. अशी अपेक्षा आहे की आयुष व्यावसायिकांच्या हस्तक्षेपामुळे देशभरातील लोकांना कोविड संदर्भातील योग्य वर्तणूक अंगिकारण्यास प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नांमध्ये आणखी भर पडेल.

आयुष मंत्रालयाने खासगी क्षेत्रातील उद्योगाशी संलग्न असलेल्या आणि सहाय्यक असलेल्या कार्यालयांमार्फत भागीदारी तयारी केली आहे आणि या भागीदारीमुळे अनेक भागधारकांना या कार्यात सहभागी होण्यामध्ये यश आले आहे. आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आयुष मिशनच्या पाठिंब्याने आयुष दवाखान्यांसह राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयुष संचालनालयांनी तातडीने वर्तनात्मक बदल संप्रेषण पसरविण्यासाठी एक मोठे जाळे म्हणून काम केले आहे. आनेक राज्य / केंद्रशासित प्रदेशांमधील आरोग्य सचिवांनी देखील या मोहिमेमध्ये त्यांच्या संदेशांसह मोहिम सुरू केली आहे.

या पाच दिवसांच्या काळात विभिन्न राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील संस्थांमध्ये वेगवेगळे आयुष घटक (आयुष केंद्र, रुग्णालये, शैक्षणिक संस्था)  यांनी एकत्र येऊन जवळपास 5000 भीत्तीपत्रके आणि 8000 फलकांवर निवडक संदेश लावले. यामध्ये “मास्क घाला, हात धुवा आणि योग्य अंतर कायम ठेवा” या सारख्या मानक संदेशांचाही समावेश होता तसेच आयुष प्रतिकार शक्ती आणि संबंधित योगासनांबाबत उद्देशून देखील काही संदेशांचा समावेश होता.

या पाच दिवसांच्या काळात हे देखील लक्षात आले की, आयुष भागधारकांच्या प्रयत्नांमुळे, जवळपास 200 वर्तमानपत्रांमध्ये लेख आणि 300 मुद्रित जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या. पुढे, रुग्णांसाठी शिक्षणाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुमारे 3 लाख पुस्तिका आणि माहितीपत्रके वितरित केली गेली. काही थोड्या संस्थांनी ई – न्यूजलेटर देखील तयार केले. या सगळ्या प्रयत्नांमध्ये जवळपास 750 आयुष वैद्यकीय महाविद्यालये, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या समूहासह आणि शिक्षकांसह एका मोठ्या जाळ्याच्या माध्यमातून या कार्यात सक्रीय सहभागी झाले.

या पाच दिवसांच्या कालावधीत असेही पाहण्यात आले की, या विषयावर एकत्रितपणे अशा प्रकारे आयुष संस्थांनी सुमारे 200 समाजमाध्यम संदेश सुमारे पाच लाख लोकांपर्यंत पोहोचविले. चर्चा आणि बातमी स्वरूपातील आरोग्य जागरुकता आणि कोविड संदर्भातील योग्य वर्तन अथवा सवयींबाबत दूरचित्रवाणी आणि नभोवाणीच्या माध्यमातून 78 वेळा जनजागृती करण्यात आली. या विषयावर आयुष संस्थांनी आयोजित केलेल्या विविध वेबिनारमध्ये हजारो लोक सहभागी होऊ शकले.

काही संस्थांनी खूप मोठ्या प्रमाणावर या उपक्रमाचा प्रसार करताना औषधी रोपे, आयुर रक्षा किट, मास्क आणि रोगप्रतिबंधक औषधांचे वाटप देखील केले. जवळपास 9 लाख लाभार्थ्यांना ते त्यांच्या संबंधित विविध राज्यांमध्ये उपलब्ध झाले. रुग्णालयांमध्ये असणाऱ्या बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांसाठी आणि आयुष ग्राम मधील रहिवाशांसाठी मास्क घालण्याच्या योग्य पद्धती, हात धुण्याच्या योग्य पद्धती आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अन्नाच्या योग्य सवयी याबाबत अनेक विविध ठिकाणी प्रात्यक्षिके दाखविण्यात आली आणि त्यात मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग होता. गर्दीच्या ठिकाणी घ्यावयाची काळजी या विषयावर काही निवडक संस्थांनी व्याख्यानाचे देखील आयोजन केले होते.

जनजागृती शिबिर, कार्यशाळा, व्याख्याने, शपथ घेणे, योग प्रात्यक्षिके आणि आरोग्य शिबिरे या अन्य उपक्रमांचा देखील समावेश होता.

Exit mobile version