Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

मूर्ती रंगविली आणि सिद्धिविनायक मंदिरात घडला बदल

सिद्धिविनायक

सिद्धिविनायक

मुंबई व ठाणे परिसरातील गणपती
मुंबईमधील अनेक गणपतींपैकी एक म्हणजे सध्या प्रख्यात असलेला प्रभादेवीजवळचा सिद्धिविनायक. लक्ष्मण विठू पटेल यांनी हे मंदिर १८०१ मध्ये बांधल्याचा कागदोपत्री पुरावा सापडतो. मूळचे मंदिर तसे लहान आहे. अक्कलकोटच्या महाराजांचे शिष्य रामकृष्ण जांभेकर यांनी गोविंदराव फाटक यांना मंदिराच्या देखभालीकरीता पाठविले. त्याप्रमाणे श्री फाटक यांनी बरेच कष्ट घेऊन येथील परिसराची सुधारणा केली. एकदा त्यांच्या मनात मूळची काळ्या पाषाणाची असलेली मूर्ती रंगविण्याचे आले. त्यानुसार त्यांनी आकर्षक स्वरूपात ही मूर्ती रंगविली. तेव्हापासून या मंदिरात बदल घडून आला. मंदिराची सध्याची वास्तू नव्याने बांधण्यात आली आहे. १९९४ साली श्रृंगेरी पीठाच्या जगद्‌गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते या नव्या वास्तूवर विधिवत कलश बसविण्यात आला.
टिटवाळ्याचा महागणपती 
ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्‍यात मध्य रेल्वेच्या मार्गावर टिटवाळा स्टेशन आहे। स्टेशनपासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर टिटवाळ्याच्या महागणपतीचे मंदिर आहे. येथे महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतभरातून भाविक दर्शनासाठी येतात. असे म्हणतात की महाभारतात वर्णन केलेल्या प्रसिद्ध कण्वमुनींचा आश्रम आजच्या टिटवाळा गावच्या परिसरात होता. दुष्यंत राजाने आपली पत्नी शकुंतला हिला ओळखले नाही तेव्हा कण्वमुनींनी शकुंतलेला गणेशव्रत करण्यास सांगितले. त्यानुसार तिने गणेशाचे पूजन-अर्जन केले. शकुंतला ज्या गणेशाची पूजा करीत असे तीच मूर्ती म्हणजे टिटवाळ्याचा महागणपती. पेशवेकाळापर्यंत ही गणेशमूर्ती गुप्त अवस्थेत होती.
मात्र थोरले माधवराव पेशवे यापरिसरात आले असता त्यांना गणेशमूर्तीबाबत दृष्टांत झाला। दरम्यान त्याचवेळेस पाण्याच्या सोयीसाठी येथील तलावाची दुरुस्ती सुरू असताना तिथे रामचंद्र मेहेंदळे यांना आजची गणेशमूर्ती सापडली। पेशव्यांनी त्यानंतर तिथे तत्काळ छोटेसे गणेशमंदिर बांधले. या गणेशाला “वरविनायक’ किंवा “विवाहविनायक’ असेही म्हणतात. कारण ज्यांचे विवाह जुळण्यात काही अडचणी असतील अशांचे विवाह या गणेशाच्या भक्तीने जुळून येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मुंबईमधील इतर गणपती मंदिरांची माहिती पुढीलप्रमाणे – गिरगांवचा फडके गणपती; बोरीवलीच्या वझिरा नाका येथील स्वयंभू गणपती, मुंबादेवीजवळचा गणपती; भुलेश्वरजवळील गणेश मंदिर, वांद्रा येथील सिद्धिविनायक; डोंगरबाग, दादर येथील जोशी यांच्याकडील मांदार गणेश; ठाणे येथील एकवीसमुखी वरदविनायक।
ठाणे जिल्ह्यातील अन्य गणपती मंदिरे अशी – भिवंडी तालुक्‍यातील अणजूर येथील नाइकांचा सिद्धिविनायक; मुरबाड येथील कमलचक्राधिष्ठित गणपती; ठाणे शहरातील जांभळी नाक्‍यावरचा मांदार सिद्धिविनायक।
Exit mobile version