मदनाने कठोर गणेशसाधना केलेला नाशिकचा गणपती

नाशिकचा मोदकेश्वर
नाशिक शहरात गोदावरी नदीच्या तीरावर मोदकेश्वराचे पुरातन मंदिर आहे। याचा आकार मोदकाच्या आकाराचा असल्यामुळे त्याला मोदकेश्वर असे नाव पडले। जागृत स्थान म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे. गणपतीच्या ५६ स्थानांपैकी हे एक स्थान आहे. या गणपतीला हिंगण्यांचा गणपती म्हणूनही ओळखले जाते. याविषयी पुराणात एक आख्यायिका सांगितली जाते, की श्री शंकरांनी मदनाला शाप दिल्यानंतर त्याला पूर्ववत होण्यासाठी गणेशोपासना सुचविली। त्यावेळी रतिसह मदनाने कठोर गणेशसाधना करून श्री गणेशाचा कृपाप्रसाद मिळविला. मोदकेश्वर म्हणजे मदनाने आराधना केलेले “कामवरद’ महोत्कट क्षेत्र होय.
 नाशिकमध्ये एक ढोल्या गणपती आहे। नाशिक शहराच्या मध्यवर्ती अशोक स्तंभ चौकात या गणपतीचे मंदिर आहे। ही गणेशमूर्ती सात ते आठ फूट उंचीची आहे।
नाशिकपासून साधारणतः: आठ किलोमीटर अंतरावर आनंदवल्ली गाव आहे. या ठिकाणी गोदावरीच्या तीरावर गणेशाचे पेशवेकालीन मंदिर आहे. याला नवश्‍या गणपती असे म्हणतात. हे स्थान फारच रम्य आणि शांत स्थान आहे. या ठिकाणी मंदिराच्या सभागृहात अष्टविनायकांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. अशा या आठ मूर्ती आणि गाभाऱ्यातील मूळ मूर्ती असे मिळून एकूण नऊ गणपती होतात म्हणून याला नवश्‍या गणपती हे नाव पडले असे म्हणतात. तर काही भक्‍तांच्या सांगण्यानुसार नवसाला पावतो म्हणून या गणपतीचे नाव नवश्‍या गणपती असे.
याशिवाय नाशिक शहरात सोमवार पेठेतील पेशवेकालीन खांदवे गणपती, काळाराम मंदिरातील गणपती; गोरेराम मंदिराच्या पश्‍चिमेकडील दशभुज सिद्धिविनायक; पंचवटीतील गणेशवाडी येथील पुरातन तिळ्या गणपती; कपालेश्‍वर मंदिराजवळील उजव्या सोंडेचा गणपती; दूध बाजारातील त्र्यंबक दरवाजा चौक गणपती; उपनगर, नाशिक रोड येथील इच्छामणी गणपती; भद्रकाली मंदिराजवळील साक्षी गणेश; रविवार कारंजा चौकातील श्री सिद्धिविनायक अशी अनेक गणेशस्थाने आहेत।