समशीतोष्ण ते उष्ण कटिबंधीय हवामान असलेल्या भारतातील सर्व राज्यांत मैदानी व डोंगराळ प्रदेशात बांबू आढळतो. जगात चीनच्या खालोखाल भारतात त्याचा आढळ आहे. बांबूच्या विविध प्रकारांची विविध वैशिष्ट्ये असून त्यांचे व्यावसायिक महत्त्वदेखील मोठे आहे. १९ सप्टेंबर हा जागतिक बांबू दिवस असतो. त्या निमित्ताने या भागात बांबू लागवडीची आवश्यक माहिती घेऊया.
• संवर्धन
अमरावती जिल्ह्यात वडाळी येथे बांबूच्या २९ प्रजातींचे संवर्धन केले आहे. जगातील ६४ दुर्मिळ व औषधी प्रजाती रुजवण्याचा प्रयत्न येथे केला आहे. बांबूच्या विविध प्रजातींचे संवर्धन करण्यात डेहराडूनचा (उत्तराखंड) पहिला व केरळचा दुसरा क्रमांक लागतो.
• जमीन व हवामान
लागवडीसाठी बारमाही पडीक ते कायमस्वरूपी सुपीक, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. पाणथळ, क्षारपड जमिनी लागवडीसाठी योग्य नाहीत.
उष्ण, दमट हवामान व जास्त पाऊसमान तसेच कोरड्या हवामानातही बांबू चांगला वाढतो. सिंचनाची सोय असल्यास लागवड ८ ते २५ अंश से. तापमान व सरासरी ७५० मि.मी. पाऊसमानाच्या प्रदेशात करावी. विदर्भ, कोकणात बांबू लागवडीस वाव आहे.
• अभिवृद्धी
– प्रामुख्याने बी, कांड्या व कंदापासून
– बियांपासून अभिवृद्धी करताना दोन प्रकारे राेपनिमिर्ती करतात. रोपवाटिकेत गादी वाफ्यावर किंवा पॉलिथिन पिशव्यांमध्ये बी लावून रोपे तयार करतात. वाळवीपासून बियाण्याच्या संरक्षणासाठी पेरताना गादीवाफ्यावर शिफारशीत रसायनाचा वापर करावा.
– पेरणीनंतर १० दिवसांत उगवण होते. डब्यात साठवलेले बियाणे ८ ते १० महिन्यांपर्यंत पेरता येते.
• रोपनिर्मिती
– रोपनिर्मितीसाठी बियाणे गादी वाफ्यावर पेरावे. त्यासाठी वाफ्याची लांबी उताराच्या आडव्या दिशेने ठेवावी. वाफ्याची रुंदी १ मीटर व लांबी सोयीनुसार १० मीटर ठेवावी. गादीवाफ्यातील अंतर ३० सें.मी. ठेवून आडव्या ओळीत सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये पेरणी करावी. तीन ते चार महिन्यांनी रोपे पॉलिथीन पिशवीत लावावीत. रोपे जून व जुलै महिन्यामध्ये लागवडीसाठी वापरता येतात.
– पॉलिथिन पिशवीत बियाणे लावूनही रोपनिर्मिती करता येते. यासाठी २५ सें.मी. बाय १२ सें.मी. आकाराच्या पॉलिथीन पिशवीत माती, वाळू व कुजलेले शेणखत यांचे १:१:१ मिश्रण करून ते भरून घ्यावे. प्रत्येक पिशवीत तीन ते चार बिया पेरून त्यास पाणी द्यावे.
– पिशव्यांत रोपांची वाढ चांगली होते. बियाणेही कमी लागते. मुळे न दुखविता पुनर्लागवड करावी लागते.
• शाकीय पद्धतीने लागवड
फळे व बियांच्या दुर्मिळतेमुळे नवी लागवड शाकीय पद्धतीने करतात. बांबूच्या वाढणाऱ्या खोडास कंद म्हणतात. एक वर्षाच्या आतील दोन-तीन बांबू काढून लागवडीच्या ठिकाणी गाडून लावावे. जमिनीवर १०-१२ सें.मी. बांबू ठेवून वरील भाग छाटावा. किमान दोन-तीन डोळे असणारा कंद निवडावा. अलीकडे उतीसंवर्धन पद्धतीनेही लागवड होत आहे.
• लागवड
– बियाणे उपलब्ध असल्यास मार्च, एप्रिल महिन्यामध्ये पेरणी करावी. एक एकरासाठी १०० ते १५० ग्रॅम बियाणे लागते. लागवड ३ बाय ३ बाय ७ मीटर अंतरापर्यंत करण्यात येते.
– बांबूबेट दरवर्षी पसरते. कालावधी ३५-४० वर्षांचा असल्याने जास्त अंतरावर लागवड करावी. परिणामी वाढही चांगली होते, तोडणीस अडचण येत नाही.
– पाच बाय पाच मीटरवर लागवड केल्यास हेक्टरी ४०० रोपे बसतात.
– लागवडीसाठी एप्रिल-मेमध्ये प्रत्येकी ५ मीटर अंतरावर ६० बाय ६० बाय ६० सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. रोपांपासून लागवड करावयाची असल्यास ३० बाय ३० बाय ३० सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत.
– कंदाचा आकार मोठा असल्यास त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवावा. खड्ड्यांत पावसाळ्यापूर्वी माती भरावी. त्यात एक घमेले कुजलेले शेणखत, ५० ग्रॅम अमोनिअम सल्फेट, २०० ग्रॅम सुपर फॉस्फेट मिसळावे. पुरेशा पावसानंतर लागवड करावी. खड्ड्यांमध्ये कंद, पॉलिथिन पिशवीत किंवा गादीवाफ्यावर वाढविलेली रोपे मुळांना इजा होणार नाही अशा तऱ्हेने मातीसह काढून लावावीत.
– पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साठू देऊ नये.
• अन्नद्रव्ये
दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीस रोप वा कंदाला १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५ ग्रॅम युरिया याप्रमाणे खते द्यावीत. दोन महिन्यांनी हीच मात्रा द्यावी. बांबू खतांना चांगला प्रतिसाद देते असे आढळून आलेले आहे.
• पाणी
– साधारणपणे ७५० ते ८०० मि.मी. पाऊस पडत असलेल्या ठिकाणी बांबूस सिंचनाची गरज नसते. तरीही रोपांची पावसाळ्यात लागवड झाल्यानंतर पहिल्या दोन वर्षी डिसेंबर ते मे या काळात पाणी द्यावे.
– हलक्या व मुरमाड जमिनीत एक आठवड्याच्या अंतराने तर मध्यम व भारी जमिनीत १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
– एक ते दोन वर्षांनंतर बांबूस पाणी देण्याची गरज पडत नाही.
• बांबूविषयी ठळक बाबी
– पृथ्वीतलावर सुमारे २०० दशलक्ष वर्षापासून अस्तित्व.
– वनातील अन्य वनस्पतींच्या तुलनेत ठराविक कालावधीत, ठराविक क्षेत्रात जास्तीत-जास्त जैविक वस्तुमान तयार करण्याची क्षमता.
– जगात सुमारे ९० जाती व १५०० प्रजाती.
– फुलांचा हंगाम जातींवर अवलंबून. काही जातीत एक किंवा अधिक वर्षांनंतर तर काही जातींत ३० ते ६० वर्षांतून एकदा फुले येतात. फुलल्यानंतर लवकरच वनस्पतीची जीवनयात्रा संपते.
– काही बांबू काटेरी असतात (उदा. कळक)
• प्रजाती व प्रकार
– पृथ्वीतलावर सुमारे १४०० प्रजाती. भारतात १४०; पैकी ६० लागवडीखाली. बांबूसा आणि डेंड्रोकॅलॅमस या त्यातील दोन प्रमुख.
– महाराष्ट्रात मानवेल, कटांग-काटस, कोंड्या मेस, पिवळा बांबू, चिवळीया प्रजाती
– कळक, मेज, चिवा, चिवारी, हुडा, मोठा, पिवळा बांबू असे लांबी व गोलाई यांवरून प्रकार
• बांबूच्या प्रकारांचे व्यावसायिक महत्त्व
– मानवेल – महाराष्ट्रात सर्व भागांत आढळतो. उंची ८ ते १६ मीटरपर्यंत तर व्यास २ ते ८ सें.मी.पर्यंत असतो. एक पेर ३० ते ४५ सें.मी. लांबीचे असते. टोपल्या, सुपे आदी वस्तूंच्या निर्मितीसाठी वापर.
– कटांग, काटस – १५ ते ३० मीटर उंच,३ ते ७ सें.मी. व्यास. एक पेर २५ ते ४५ सें.मी. लांबीचे असते. कुंपण व घरबांधणीसाठी यांचा उपयोग होतो.
– कोंड्या मेस – याची उंची १६ ते २३ मीटर, व्यास ८ ते १५ सें. मी. तर पेराची लांबी २० ते ४५ सें. मी. असते. याचा वापर बारीक विणकाम करण्यासाठी, फर्निचर बनविण्यासाठी करतात.
– पिवळा बांबू – घरात किंवा बागेत शोभेसाठी लागवड
– चिवळी – उंची ९ मीटर, व्यास २ ते ४ सें.मी. तर पेर १५ ते ३० सें.मी., टोपल्या व घरबांधणीसाठी वापर
– मानगा – उंचीने जास्त, अत्यंत मजबूत. काही वेळा ३० फुटांपर्यंत वाढतो. घराचे छप्पर, समारंभाचा मंडप उभारण्यासाठी वापर. हिरवट, तपकिरी रंगाच्या या बांबूला कलाकुसरीच्या वस्तूनिर्मितीसाठी मागणी.
- डॉ. विनायक शिंदे-पाटील, संदीप डमाळ, कृषी महाविद्यालय, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, विळद घाट, जि. नगर