Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

रब्बी हंगामातील गहू व्यवस्थापन व सुधारीत वाण

गहू हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. भारतात एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या जवळपास ३ टक्के वाटा आहे. सुमारे ७५-८०% गहू चपातीसाठी वापरला जातो. तसेच गव्हाचा उपयोग पाव, बिस्कीट, केक, शेवई, कुर्डइ, इ. पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. वाढती लोकसंख्या आणि बदलती जीवनशैली यामुळे गव्हाचा वापर देशामध्ये वाढला आहे. गव्हाच्या लागवडीखालील क्षेत्र हे मात्र मर्यादित आहे. गव्हाची वाढती मागणी लक्षात घेता सन २०३० मध्ये गव्हाचे उत्पादन १०० दश लक्ष टन इतके होणे गरजेचे आहे;  सन २०१६-१७ गव्हाचे विक्रमी उत्पादन ९७.४४ दश लक्ष टन इतके झाले. (संदर्भ: मा. प्रकल्प संचालक, गहू, कर्नाल, यांनी अखिल भारतीय समन्वित गहू प्रकल्पाचा सन २०१६-१७ या वर्षीचा सादर केलेला अहवाल. द्वीपकल्पीय भागत (महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तालिळनाडू) असणारा पिकांचा कमी कालावधी, फेब्रुवारी महिन्या पासून वाढणारी उष्णता, पाण्याची कमतरता यामुळे गव्हाचे उत्पन्न मर्यादित स्वरूपात आहे.

महाराष्ट्रात गव्हाचे सरासरी हेक्टरी उत्पादन उत्तर भारताच्या तुलनेत फारच कमी आहे. गव्हाच्या पिकाचे योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते. अधिक उत्पादन देणार्‍य वाणांचा विकास व प्रसार या साठी पुणे येथील आघारकर संशोधन संस्था प्रयोगशील आहे. महाराष्ट्र राज्यात वर्षातून खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीन कृषि हंगामात पिके घेतली जातात.गहू उत्पादन वाढवण्यासाठी योग्य जमीनिची निवड, सुधारित व रोग प्रतिकारक जातीचा वापर , वेळेवर पेरणी, पाणी व्यवस्थापन, पीक व किड संरक्षण इ. द्वारे आपण गव्हाचे उत्पादन वाढवू शकतो.

जमीन व पूर्वमशागत:

गहू पिकासाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन निवड करावी. गव्हाच्या पिकाच्या उपयुक्त मुळ्या ६० ते ७५ सेंमी. खोलवर जात असल्यामुळे पिक घ्यायचे आहे त्या जमिनीची चांगली मशागत गरजेची असते. खरीप हंगामातील पिकानंतर १५ ते २० सेंमी. खोलीवर जमीन नांगरट करावी आणि १ ते २ वेळा कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुसीत करावी व आधीच्या पिकाची धसकटे व तण वेचून जमीन स्वच्छ करावी.शेवटच्या कुळवणी अगोदर १० ते १२ टन शेणखत प्रति हेक्टरी चांगले कुजलेले जमिनीत मिसळून घ्यावे.

बियाणे व पेरणी:
गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी हेक्टरी २० ते २२ लक्ष झाडांची संख्या असणे आवश्यक आहे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो किंवा विटाव्याक्स २ ग्राम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी तसेच २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर + २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणा-या जीवाणुंची बीज प्रक्रिया गुळाच्या पाण्याबरोबर करावी. नंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीमध्ये वाळवून पेरणीसाठी वापरावे.बागायत गव्हाची पेरणी बागायत वेळेवर १ ते १५ नोव्हेंबर व बागायत उशिरा १ ते १० डिसेंबर दरम्यान करावी, दोन ओळीतील अंतर २०-२३ सें.मी. ठेवावे, बियाणे ५ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये, त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी होते. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा / वापसा असताना शक्यतो दक्षिण-उत्तर दिशेने पेरणी करावी, त्यामुळे पिकास पुरेसा सूर्यप्रकाश मिळुन उत्पादनामध्ये वाढ होते. तसेच उभी आडवी पेरणी करू नये, एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते. पेरणीसाठी दोन चाड्याची पाभर किंवा सुधारित खते व बियाणे पेरणी यंत्र वापरावे, पाभरीने पेरणी केल्यामुळे गव्हाची मुळे खोलवर जाऊन ओलावा शोषून घेतात,पिक लोळत नाही.जमिनीच्या उतारानुसार २.५ ते ४.० मीटर रूंदीचे व ७ ते २५ मीटर लांब सारे पाडावेत व उताराला आडव्या दिशेने पाट पाडावेत.

खत व्यवस्थापन:
बागायत वेळेवर पेरणी गव्हासाठी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रती हेक्टरी व बागायत उशिरा पेरणीसाठी ९०किलो नत्र, ६०किलो स्फुरद व ४०किलो पालाश प्रति हेक्टरी प्रमाणे दयावे, त्यापैकी अर्धे नत्र,संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीचे वेळी व राहिलेली नत्राची अर्धी मात्रा पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी खुरपणी नंतर द्यावी किंवा १/३ नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीचे वेळी व राहिलेली नत्राची मात्रा अर्धी-अर्धी पहिल्या व दुसऱ्या पाण्याच्या वेळी द्यावी.

सुधारित वाण:
आपल्याकडे बागायत वेळेवर व बागायत उशिरा अशा दोन टप्यामध्ये पेरणी केली जाते. बागायत वेळेवर पेरणीचे वाण हे बागायत उशिरा पेरणीच्या वाणापेक्षा उशिरा परिपक्व होणारे असतात. बागायत उशिरा पेरणी साठी शिफारस केलेले वाण लवकर परिपक्व होणारे असतात व ते पिकाच्या वाढीच्या शेवटी येणाऱ्या उष्ण तपमानास प्रतिकारक असतात म्हणून पेरणीसाठी शिफारस केलेलेच वाण वापरावेत.

सुधारित वाण———-उंची (सेंमी)——-परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस)———सरासरी उत्पादन (क्वि. / हे.)——-बियाणे प्रमाण (कि. / हे.)

बागायत वेळेवर पेरणी योग्य:

एम.ए.सी.एस.६२२२(स)——————-८२————१०६———————————५०-५५——————————-१००
एम.ए.सी.एस.६४७८(स)——————-८०————११०———————————५२-५६——————————-१००
एन.आय.ए.डब्ल्यु.३०१[त्रिंबक](स)——१०० ———–११५———————————-४०-४५——————————१००
एन.आय.ए.डब्ल्यु.९१७ [तपोवन](स)—-८७————१०५———————————-४७-५०——————————-१००
एन.आय.डी.डब्ल्यु.२९५ [गोदावरी] (ब)–८४————१०८———————————-४५-५०——————————-१००
एम.ए.सी.एस.३१२५ (ब)——————८०————११२———————————-४४-५२——————————-१००
एम.ए.सी.एस.३९४९ (ब) ——————८१———–११२———————————–४६-५०——————————-१००
डी.डी.के.१०२९ (ख)————————८५———–१०७————————————४०-४४——————————१००
एम.ए.सी.एस. २९७१ (ख)—————–८६———–११०————————————४६-५०——————————१००
एच. डब्ल्यु. १०९८ (ख)——————–८५———–१०५————————————४५-५०——————————-१००

बागायत उशिरा पेरणी योग्य:
एन.आय.ए.डब्ल्यु. ३४(स)—————-७८————१००———————————–३८-४०——————————-१२५
राज ४०८३ (स)—————————–६८————९१————————————३५-४०——————————-१२५
एच.डी. २९३२ (स)————————-७३————-९४————————————४३-५५——————————-१२५
एच.डी. ३०९० (स)————————-८०————१०१———————————–४०-४२——————————–१२५
स:- सरबती वाण; ब :- बन्सी वाण व ख:-खपली वाण.

तणनियंत्रण:
पेरणीपासून ३० ते ४० दिवसाचे आत तणाचे प्रमाण लक्षात घेवून एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी. जरुरी प्रमाणे १-२ कोळपणी करून जमीन मोकळी करावी त्यामुळे तणांचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते व हवा खेळती राहून फुटव्याची संख्या वाढते त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते. रासायनिक तणनियंत्रणामध्ये पेन्डीमिथेलीन ३०% ई.सी. हे तणनाशक पेरणी नंतर लगेच पिक उगवण्याच्या अगोदर जमिनीमध्ये ओलावा असताना २.५ – ३.० लिटर प्रति/हे.किंवा २-४-डी सोडियम क्षार ८०% डब्लू.पी. पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी ५०० -१००० ग्राम प्रति/हे. ५०० ते ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

पाणी व्यवस्थापन:
बागायत गव्हास पेराणीपुर्वीचे ओलित सोडून जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाच ते सहा पाळ्या लागतात. गहू पिकाच्या वाढीच्या नाजूक अवस्थामध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.पाण्य्च्या उपलब्धतेनुसार खाली दिल्याप्रमाणे पाण्याचे व्यवस्थापन करावे.

गहू पिकासाठी पाण्याचे नियोजन:
१ पाणी——मुकुटमुळे फुटण्याचे वेळी (२१-२५ दिवसांनी)
२ पाणी——मुकुटमुळे फुटण्याचे वेळी (२१-२५ दिवसांनी) आणि कांडी धरण्याचे वेळी (४०-४५ दिवसांनी)
३ पाणी——मुकुटमुळे फुटण्याचे वेळी (२१-२५ दिवसांनी), कांडी धरण्याचे वेळी (४०-४५ दिवसांनी) आणि दाणे चिकात असताना (७५-८० दिवसांनी)
४ पाणी——मुकुटमुळे फुटण्याचे वेळी (२१-२५ दिवसांनी), फुटवे येण्याचे वेळी (३०-३५ दिवसांनी), कांडी धरण्याचे वेळी (४०-४५ दिवसांनी) आणि दाणे चिकात असताना (७५-८० दिवसांनी)
५ पाणी——मुकुटमुळे फुटण्याचे वेळी (२१-२५ दिवसांनी), फुटवे येण्याचे वेळी (३०-३५ दिवसांनी), कांडी धरण्याचे वेळी (४०-४५ दिवसांनी), गहू फुलावर येताना (६०-६५ दिवसांनी) आणि दाणे चिकात असताना (७५-८० दिवसांनी
६ पाणी——मुकुटमुळे फुटण्याचे वेळी (२१-२५ दिवसांनी), फुटवे येण्याचे वेळी (३०-३५ दिवसांनी), कांडी धरण्याचे वेळी (४०-४५ दिवसांनी), गहू फुलावर येताना (६०-६५ दिवसांनी), दाणे चिकात असताना (७५-८० दिवसांनी आणि दाणे पक्व होताना (९० दिवसांनी)

गव्हावरील किडी व रोग नियंत्रण:
गहू पिकावर अनेक किडींची नोंद करण्यात आली असली तरी आपल्या विभागात या पिकावर मुख्यतः खोडकिडी, मावा, तुडतुडे, वाळवी इत्यादी किडी व प्राण्यामध्ये उंदराचा प्रादुर्भाव होतो व पानावरील व खोडावरील तांबेरा , करपा ,काणी इ. रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो त्याच्या नियंत्रणासाठी खाली दिलेल्या उपाय योजना कराव्यात.

खोडकिडा:
या किडीचे नियंत्रणासाठी उभ्या पिकातील किडग्रस्त झाडे आठवड्याचे अंतराने २-३ वेळा मुळासकट उपटून नाश करावीत,हेक्टरी २ किलो कार्बारील ५० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी ५०० लिटर पाण्यात मिसळुन पहिली फवारणी ३० दिवसांनी करावी.

मावा:या किडीचे नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसुन आल्यावर थायामिथोक्‍झाम (२५ डब्ल्यू.जी.) ५० ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड २५० ग्रॅम/ हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी/धुरळणी १५ दिवसानी वरीलप्रमाणे करावी. जैविक उपायांमध्ये व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझियम ॲनिसोप्ली २५० ग्रॅम /हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळुन १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.

तुडतुडे:
या किडीचे नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसुन आल्यावर थायामिथोक्‍झाम (२५ डब्ल्यू.जी.) ५० ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड २५० ग्रॅम/ हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

वाळवी:
वाळवीचा बंदोबस्त करण्यासाठी बांधावर असलेली वारूळे खणुन काढावित व त्यातील राणीचा नाश करावा. वारुळ नष्ट केल्या नंतर जमीन सपाट करावी व मध्यभागी सुमारे ३० से.मि. खोलवर एक छिद्र करावे आणि त्यात क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही हे किटकनाशक १५ मि.लि. १० लिटर पाण्यात मिसळुन हे औषधाचे मिश्रण ५० लिटर एका वारुळासाठी या प्रमाणात वारुळात टाकावे जमिनीमध्ये निंबोळी पेंड २०० किलो प्रति हेक्टरी टाकावी.

उंदीर:
उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी विषयुक्त आमिषांचा वापर करावा. हे आमिष तयार करण्यासाठी वीघटक सौम्य विष तसेच झिंक फॉसस्फाईड वापरावे. प्रथम १०० ग्रॅम पिठामध्ये ५ ग्रॅम तेल व ५ ग्रॅम गुळ मिसळून त्याच्या गोळ्या २-३ दिवस उंदरांच्या येण्याजाण्याचा मार्गावर ठेवावे, त्यामुळे उंदरांना चटक लागेल. त्यानंतर वरीलप्रमाणे गोळ्या कराव्यात त्यात ३ ग्रॅम झिंक फोस्फाईड टाकून, हातमोजे घालून किंवा काठीने मिश्रण करावे. पीठाच्या गोळ्या करून उंदरांच्या येण्याजाण्याचा मार्गावर ठेवाव्या जेणेकरून ते खाऊन उंदीर मरतील.

तांबेरा व पानावरील करपा:
तांबेरा व करपा रोगापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक जातींचा वापर करावा. रासायनिक खतांची संतुलित मात्रा दयावी व नत्राचा शिफारशीपेक्षा अधिक वापर केल्यास गव्हाचे पीक तांबेरा रोगास जास्त प्रमाणात बळी पडते. तांबेरा व करपा रोगाची लागण दिसताच मॅन्कोझेब (डायथेन एम ४५) हे बुरशीनाशक १००० ग्रॅम/हेक्टरी, ५०० मि.लि. प्रोपिकोनॅझोल/हेक्टरी ५००-६०० लिटर मिसळुन फवारणी करावी रोगाची तीव्रता लक्षात घेउन १० ते १५ दिवसांचे अंतराने फवारण्या कराव्यात. रासायनिक खतांची संतुलित मात्रा घ्यावी. नत्राचा शिफारशीपेक्षा अधिक वापर केल्यास गव्हाचे पीक तांबेरा रोगास जास्त प्रमाणात बळी पडते.

काजळी किंवा काणी:
या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास व्हिटॅव्हॅक्स किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची २.५ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बिज प्रक्रिया करावी, तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत.

काढणी:
साधारणतः ११०-१२० दिवसामध्ये गहू पक्व होतो, गव्हाच्या काही जातींचे दाणे पीक पक्‍व झाल्यानंतर शेतात झडतात व नुकसान होते. तसे होऊ नये म्हणून पीक पक्‍व होण्याच्या २ ते ३ दिवस आधी गव्हाची कापणी करावी. कापणीवेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ टक्‍के असावे. गव्हाची मळणी यंत्राच्या साह्याने करावी. मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.

संस्थेने विकसित केलेले सुधारित वाण व त्यांची वैशिस्ट्ये खालील प्रमाणे :

१. एम.ए.सी.एस.६२२२: सरबती वाण, ऊंची ८२ सेमी, कालावधी १०६ दिवस. खोडावरील व पानावरील तांबेरा रोगास प्रतिकारक, प्रथिनांचे प्रमाण १२.५ ते १३ % आहे. पाव व चपातीसाठी उपयुक्त, सरासरी उत्पादन प्रती हेक्‍टरी ५० क्विंटल, कमाल उत्पादन क्षमता ६० क्विं/हे इतकी आहे. हे वाण उशिरा पेरणी साठी देखील चांगला प्रतिसाद देतो.
२. एम.ए.सी.एस.६४७८: सरबती वाण, ऊंची ८० सेमी, कालावधी ११० दिवस. पानावरील तांबेरा रोगास प्रतिकारक, टपोरा व चमकदार दाणा, पाव व चपातीसाठी उत्तम, प्रथिनांचे प्रमाण १४% आहे. सूक्ष्म पोषणतत्वे – जस्त ४४ पीपीएम, लोह ४२.८ पीपीएम. सरासरी उत्पादन प्रती हेक्‍टरी ५२ क्विंटल, कमाल उत्पादन क्षमता ६२ क्विं/हे इतकी आहे.
३. एम.ए.सी.एस.३१२५: बंसी वाण, ऊंची ८० सेमी, कालावधी ११२ दिवस. सरबती वाणापेक्षा अधिक उत्पादन देणारा. पानावरील तांबेरा व करपा रोगास प्रतिकारक, सरासरी प्रती हेक्‍टरी ५० क्विंटल, कमाल उत्पादन क्षमता ६० क्विं/हे इतकी आहे. रवा, शेवई व कुर्डइ तसेच पास्ता बनविण्यासाठी उत्कृष्ट.
४. एम.ए.सी.एस.३९४९: बंसी वाण, ऊंची ८१ सेमी, कालावधी ११२ दिवस. खोडावरील व पानावरील तांबेरा रोगास प्रतिकारक, टपोरा व चमकदार दाणा, पास्ता व रवा तयार करणेसाठी उत्तम, प्रथिनांचे प्रमाण १२.९% आहे सरासरी उत्पादन प्रती हेक्‍टरी ४६ ते ४८ क्विंटल, कमाल उत्पादन क्षमता ६४ क्विं/हे इतकी आहे.
५. एम.ए.सी.एस. २९७१ (ख): खोडावरील व पानावरील तांबेरा रोगास प्रतिकारक, प्रथिनांचे प्रमाण १२.९% आहे सरासरी उत्पादन प्रती हेक्‍टरी ४६ ते ५० क्विंटल , कमाल उत्पादन क्षमता ५१.८ क्विं/हे इतकी आहे.
संशोधनांतर्गत प्रयोगातील नवीन विकसित वाण व तंत्रज्ञान शेतकर्‍यापर्यंत पोहोचविण्यास आघारकार संशोधन संस्था नेहमीच प्रयत्नशील असते. शेतकर्‍याने नविन विकसित केलेल्या वाणांची निवड व तंत्रज्ञानाचा वापर केल्यास, बागायती वेळेवर गव्हाचे उत्पन्न प्रति हेक्टरी ४० ते ५० क्विंटल इतके निश्चित मिळेल व महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळी वरील उत्पन्न वाढण्यास हातभार लागेल.

— डी.एन.बनकर, एस.एस.रासकर, व्ही.डी.गिते, बी.के.होनराव, ए.एम.चव्हाण,

अनुवांशिक आणि वनस्पती पैदास विभाग, आघारकर संशोधन संस्था, पुणे

(सौजन्य : केव्हीके, बारामती )

संपर्क : 

आधारकर संशोधन संस्था,

गोपाल गणेश आगरकर मार्ग, पुणे, महाराष्ट्र,

फोन क्रमांक :  + 91-20-25325000 / + 91-020-25653680
इमेल : info@aripune.org

संकेतस्थळ : http://www.aripune.org/

Exit mobile version