Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

रब्बी हंगामातील सुधारित जिरायत व मर्यादित पाणी गहू व्यवस्थापन

महाराष्ट्रातील ८७ टक्के क्षेत्र हे अवर्षणप्रवण आहे. या सर्व क्षेत्रात खरीप हंगामातील पिके ही पावसाच्या पाण्यावर घेतली जातात. परंतु रब्बी हंगामातील पिके ही बहुतांश सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात घेतली जातात. त्यासाठी अवर्षणप्रवण क्षेत्रात रब्बी जिरायत गहू उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. जिरायती गहू उत्पादन वाढवण्यासाठी योग्य जमीन सुधारणा, सुधारित जाती, वेळेवर पेरणी, आवश्यक तेथे पाणी, पीक व किड संरक्षण इ. द्वारे जिरायत गव्हाचे उत्पादन वाढवू शकतो.

जमीन

गहू पिकासाठी चांगल्या निच-याची भारी आणि खोल जमिनीची निवड करावी. हलक्या व मध्यम जमिनीत भरपूर भरखते घालणे आवश्यक आहे. जिरायत गहू ओलावा टिकवून धरणा-या भारी जमिनीतच घ्यावा. जमिनीची पूर्वमशागत योग्य पद्धतीने करून जमीन तयार ठेवावी.

पूर्वमशागत
गव्हाच्या पिकाकरिता जमीन चांगली भुसभुशीत होण्याकरिता योग्य व पुरेशी मशागत करणे आवश्यक असते.कारण, गव्हाच्या पिकाच्या उपयुक्त मुळ्या ६० ते ७५ सेंमी. खोलवर जात असल्यामुळे पिक घ्यायचे आहे त्या जमिनीची चांगली मशागत गरजेची असते. म्हणूनच, खरीप हंगामात पिक घेऊन झाल्यावर लोखंडी नांगराने १५ ते २० सेंमी. खोलवर जमीन नांगरावी आणि ३ ते ४ वेळा वखराच्या पाळ्या द्याव्यात. अशा प्रकारे मशागत केल्याने जमिनीत असलेली आधीच्या पिकाची धसकटे व तण वेचून जमीन स्वच्छ करणे शक्य होते.

पेरणीची वेळ
जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरवड्यात करावी (१५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर).
पेरणी
पेरणीचे दोन ओळीतील अंतर २३ सें.मी. ठेवून करावी. बीयाणे ५ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये, त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी होते. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा/वापसा असताना पेरणी करावी. पेरणी शक्यतो दक्षिण-उत्तर दिशेने करावी त्यामुळे पिकास पुरेसा सूर्यप्रकाश मिळुन उत्पादनामध्ये वाढ होते. तसेच उभी आडवी पेरणी करू नये. एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते. पेरणी शक्यतो दोन चाड्याच्या पाभरीने किंवा सुधारित खते व बियाणे पेरणी यंत्राने करावी, म्हणजे पेरणीबरोबरच रासायनिक खते देखील देता येईल. जमिनीच्या उतारानुसार २.५ ते ४.० मीटर रूंदीचे व ७ ते २५ मीटर लांब सारे पाडावेत व उताराला आडव्या दिशेने पाट पाडावेत.

बियाणे व बीज प्रक्रिया
गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी हेक्टरी २० ते २२ लक्ष झाडांची संख्या असणे आवश्यक आहे. जिरायत गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे वापरावे व २३ सें.मी. अंतरावर पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी तसेच २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर + २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणा-या जीवाणुंची बीज प्रक्रिया गुळाच्या पाण्याबरोबर करावी. नंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीमध्ये वाळवून पेरणीसाठी वापरावे.

सेंद्रिय तसेच रासायनिक खत व्यवस्थापन
१) हेक्टरी २५ ते ३० बैलगाड्या शेणखत/कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत २ टन प्रती हेक्टर कुळवाच्या पाळीने मिसळावे.
२) जिरायत गव्हास पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश द्यावे किंवा युरिया-डीओपी ब्रिकेट मार्फत पेरणीचे अंतर कमी करून दोन जोड ओळीमध्ये १ गोळी (२.७ ग्रॅम वजनाची) १० से.मी खोल खोचावी.
३) गहू फुटवे फुटण्याच्या अवस्थेत असताना (३० दिवसांनी) १९:१९:१९ @ ७० ग्रॅम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) गहू दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरियाची फवारणी करावी.

जिरायत/कोरडवाहू गव्हाचे सुधारित वाण
जात/वाण——–फुलावर येण्याचा कालावधी (दिवस)——परिपक्व होण्याचा कालावधी (दिवस)——-सरासरी उत्पादन (क्वि/हे.)
सरबतीवाण
एन. आय. ५४३९——————५५-६०————१०५-११०————१२-१५
एच.डी.२७८१ (आदित्य)————५५-६०————१००-११०————-१६-१८
के.९६४४ (अटल)——————-६०-६२—————११०-११५———११-१५
एन.आय.ए.डब्लू. १४१५ (नेत्रावती)—–६०-६५———————११०-१२०——————–१८-२०
बन्सीवाण
एम.ए.सी.एस. १९६७(ब)———५५-६०———-१०५-११०————–१०-१२
एकेडीडब्लू२९९७-१६(शरद) (ब)———-५०-६०——————–११०-११५—————१२-१५
एन.आय.डी.डब्लू. १५ (पंचवटी) (ब)—–५५-६०—————११५-१२०———–१२-१५

आंतरमशागत
पेरणीपासून ३० ते ४० दिवसाचे आत तणाचे प्रमाण लक्षात घेवून एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी. जरुरी प्रमाणे १-२ कोळपणी करून जमीन मोकळी करावी त्यामुळे तणांचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. जिरायती गव्हामध्ये जमिनीवर आच्छादनाचा वापर केल्यास बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा जास्त टिकून राहतो.

पाणी व्यवस्थापन
जिरायत गहू हा पावसावर आणि कमी पाणी असणाऱ्या भागामध्ये घेतला जातो. त्यामुळे पाण्याचे नियोजन नसल्यामुळे पिकासाठी पाणी देणे शक्य होत नाही. तरीही १ किंवा २ पाणी उपलब्ध झाले तर जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याच्या पाळ्या कमी-जास्त कराव्यात. पाण्याचा साठा एकच पाणी देण्याइतका उपलब्ध असेल, तर पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी पाणी द्यावे. पाण्याचा साठा दोन पाणी देण्याइतका उपलब्ध असेल, तर पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ४० ते ४२ दिवसांनी द्यावे. गहू पिकाच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत, त्या वेळी पिकास पाणी देणे फायद्याचे आहे.

गव्हावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन
जिरायत गहू पिकावर अनेक किडींची नोंद करण्यात आली असली तरी आपल्या जिरायत विभागात या पिकावर मुख्यतः खोड किडा, तुडतुडे, मावा, वाळवी इत्यादी व प्राण्यामध्ये उंदराचा प्रादुर्भाव होतो. त्याची व्यवस्थापनाबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.

खोडकिडाः
या किडीचे नियंत्रणासाठी उभ्या पिकातील किडग्रस्त झाडे आठवड्याचे अंतराने २-३ वेळा मुळासकट उपटून नाश करावीत, उभ्या पिकतात पिक पोटरीवर येण्याचे सुमारास हेक्टरी २ किलो कार्बारील ५० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी ५०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

मावा व तुडतुडे:
या किडीचे नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसुन आल्यावर ५% निंबोळी अर्क २०० मि. ली. १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, प्रादुर्भाव जास्त असल्यास थायामिथोक्‍झाम (२५ डब्ल्यू.जी.) ५० ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड २५० ग्रॅम/ हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी/धुरळणी १५ दिवसानी वरीलप्रमाणे करावी. जैविक उपायांमध्ये व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझियम ॲनिसोप्ली २५० ग्रॅम /हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळुन १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.

वाळवी किंवा उधई :
वाळवीचा बंदोबस्त करण्यासाठी बांधावर असलेली वारूळे खणुन काढावित व त्यातील राणीचा नाश करावा. वारुळ नष्ट केल्या नंतर जमीन सपाट करावी व मध्यभागी सुमारे ३० से.मि. खोलवर एक छिद्र करावे आणि त्यात क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही हे किटकनाशक १५ मि.लि. १० लिटर पाण्यात मिसळुन हे औषधाचे मिश्रण ५० लिटर एका वारुळासाठी या प्रमाणात वारुळात टाकावे.

उंदीर:
उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी विषयुक्त आमिषांचा वापर करावा. हे आमिष तयार करण्यासाठी वीघटक सौम्य विष तसेच झिंक फॉसस्फाईड वापरावे. प्रथम १०० ग्रॅम पिठामध्ये ५ ग्रॅम तेल व ५ ग्रॅम गुळ मिसळून त्याच्या गोळ्या २-३ दिवस उंदरांच्या येण्याजाण्याचा मार्गावर ठेवावे, त्यामुळे उंदरांना चटक लागेल. त्यानंतर वरीलप्रमाणे गोळ्या कराव्यात त्यात ३ ग्रॅम झिंक फोस्फाईड टाकून, हातमोजे घालून किंवा काठीने मिश्रण करावे. पीठाच्या गोळ्या करून उंदरांच्या येण्याजाण्याचा मार्गावर ठेवाव्या जेणेकरून ते खाऊन उंदीर मरतील. मेलेले उंदीर पुरून टाकावेत.

रोग व त्यांचे व्यवस्थापन

१. तांबेरा व पानावरील करपा
तांबेरा व करपा रोगापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक जातींचा वापर करावा. तांबेरा व करपा रोगाची लागण दिसताच मॅन्कोझेब (डायथेन एम ४५) हे बुरशीनाशक २५ ग्रॅम, १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. रोगाची तीव्रता लक्षात घेउन १० ते १५ दिवसांचे अंतराने फवारण्या कराव्यात.
२. काजळी किंवा काणी
या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास व्हिटॅव्हॅक्स किंवा कार्बे न्डाझिम या बुरशीनाशकाची २.५ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बिज प्रक्रिया करावी, तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत.

जिरायत गव्हाची लागवड करताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
१) गव्हाच्या कल्याण सोना, सोनालीका आणि लोकवन या जाती तांबेरा रोगास बळी पडत असल्यामुळे त्याची लागवड करु नये.
२) जमिनीची मशागत करताना खरीप पिक जर सोयाबीन किंवा गळीत धान्य असेल तर एकच कुळवणी करावी. ३) रासायनिक खतांचा डोस शिफारसीप्रमाणे द्यावा.
४) बियाणे निवड करताना जिरायत लागवडीसाठी योग्य व सुधारित वाणाची निवड करावी.
५) बियाणे कीड व रोग मुक्त असावे.
जिरायत गहू पिकात पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याचे तंत्रज्ञान

रब्बी हंगामात पावसाचे पाणी गहू पिकाच्या जमिनीत कसे मुरवता येईल यासाठी खालील तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.
१. बांध बंदिस्ती करणे
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पावसाची तीव्रता जास्त असल्यास व जमिन उताराची असल्यास, पावसाचे पाणी जास्त वेगाने वाहून जाते. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी असते. त्यासाठी उथळ व मध्यम खोल जमिनीत समपातळीतील बांध व खोल जमिनीत ढाळेचे बांध टाकावेत. त्यामुळे जमिनीवरून वाहून जाणारे पावसाचे पाणी ठिकठिकाणी थोपविले जाईल व जमिनीत पाणी मुरवण्याची क्रिया दीर्घकाळ होवून, जमिनीत ओलावा अधिक साठविण्यास मदत होते. तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून विहिरीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.
२. आंतरबांध व्यवस्थापन
पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळा सुरु होताच जिरायत गहू पिकाखालील विशेषतः खोल जमिनीत लहान सरी वरंबे पाडून किंवा लहान सारे पडावेत व जमिनीत बांधणी करावी. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीवरून वाहून जाण्याचे प्रमाण कमी होवून ते जास्त प्रमाणात जमिनीत मुरते व जमिनीत ओलाव्याची अधिक साठवण होते.
३. उतारास आडवी मशागत करावी
बांध बंधिस्ती केलेल्या जिरायत गहू क्षेत्रात नांगरणी, कुळवणी, पेरणी व कोळपणी यासारखी शेती मशागतीची कामे जमिनीच्या उतारास आडवी करावीत. नांगरणीमुळे जमिन भुसभुशीत होवून तीत जास्त ओलावा साठवण्यास मदत होते. कुळवणी केल्यामुळे तणांचा नाश होतो. तणे पिकांपेक्षा दुपटीने अधिक ओलावा शोषून घेतात. त्यामुळे तणांचा बंदोबस्त केल्यास पिकास अधिक ओलावा मिळतो. तसेच जिरायत गव्हात आंतरमशागत केल्याने जमिनीच्या पृष्ठभागावर भुसभुशीत मातीचा थर तयार होतो व त्याचा आच्छादनासारखा काही प्रमाणात उपयोग होतो, त्यामुळे जमिनीस भेगा पडण्याचे प्रमाण कमी होते, तसेच जमिनीच्या भेगावाटे उडून जाणाऱ्या ओलाव्याची हानी कमी होते.
४. कोळपणी करणे अतिशय महत्वाचे आहे
रब्बी हंगामात जिरायत गहू पिक वाढत असतांना त्याबरोबर तण देखील वाढत असते. हे तण पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश याबाबतीत पिकांशी स्पर्धा करते. पिक उगवून आल्यानंतर त्यात ठराविक दिवसात कोळपणी करणे अतिशय महत्वाचे असते. त्याचा मुख्य उद्देश म्हणजे तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थोपविणे. एक कोळपणी आणि अर्धे पाणी अशी म्हण आहे. याचा अवलंब करून जिरायत रब्बी गव्हाकरिता दोन वेळेस कोळपणी करण्याची शिफारस केली आहे. पहिली कोळपणी पिक तीन आठवड्यांचे झाल्यावर करावी. दुसरी कोळपणी पिक ५ आठवड्यांचे झाल्यावर करावी. त्यावेळेस जमिनीत ओल कमी झाल्याने जमिनीला सूक्ष्म भेगा पडू लागतात. त्या कोळपणी केल्याने बुजल्या जातात. त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंद होते व जमिनीत ओलावा साठवून राहण्यास मदत होते. कोळपे चालविल्याने खोलवर मशागत करता येते आणि जमीन भुसभुशीत होवून मातीचा थर चांगला बसू शकतो आणि जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो.
५. आच्छादनाचा वापर
रब्बी हंगामामध्ये जिरायत गव्हात आच्छादनाचा वापर हा बाष्पीभवन थांबविणे आणि तणांचा बंदोबस्त करणे असा दुहेरी उपयुक्त आहे. आच्छादन साधारणपणे तूरकाठ्याचा भुसा, सोयाबीन भुसा, धसकटे, वाळलेले गवत, भाताचे काड किंवा भुसा इ. प्रकाराने करता येते. दर हेक्टरी ५ ते १० टन आच्छादनाचा वापर करावा. त्यामुळे पिकाचे ४० ते ५० टक्के उत्पादन वाढते असे सिध्द झाले आहे. आच्छादन जेव्हढे लवकर टाकता येईल तेवढे उपयुक्त ठरते. कोणत्याही परिस्थितीत पिक ६ आठवड्यांचे होण्याच्या आत आच्छादनाचा वापर करावा.त्यामुळे बाष्पीभवनावाटे होणाऱ्या ओलाव्याची हानी कमी होऊन पिकास महत्वाच्या पाणी देण्याच्या अवस्थेत ३५ ते ५० मी.मी. ओलावा अधिक मिळतो. तसेच जमिन भेगाळण्याची तीव्रता कमी होते म्हणूनच रब्बी जिरायत गव्हास आच्छादनाचा वापर करणे म्हणजे एक संरक्षक पाणी दिल्यासारखे आहे.
६. शेततळी
साधारणतः एकूण पावसाच्या पाण्यापैकी १५ ते २० टक्के पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाते. पाणलोट क्षेत्रात शेततळी खोदून असे वाहून जाणारे पाणी त्यात साठविता येते. शेततळी पाणलोट क्षेत्राच्या खोलगट भागात खोदावेत. उंचवट्याच्या जमिनीवरून वाहून जाणारे पाणी तळ्याकडे वळवण्यासाठी योग्य ठिकाणी गवताचे रस्ते तयार करावेत. अशाप्रकारे तळ्यात साठविलेले पाणी पिकास पाणी देण्याच्या अवस्थेत संरक्षक पाणी म्हणून वापरता येते. रब्बी जिरायत गव्हास एक संरक्षक पाणी दिल्यास उत्पादनात ५० ते ६० टक्के वाढ होते.
अशा पद्धतीने वरील सर्व बाबींचा आपण एकात्मिक अवलंब केल्यास पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवून रब्बी हंगामातील जिरायत व मर्यादित पाणी गव्हास वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी फायदेशीर होईल.

Exit mobile version