अलीकडे बाजारपेठेतील वाढती मागणी आणि मिळणारा भाव लक्षात घेऊन कलिंगडाचे मुख्य पीक म्हणून शेतकरी उत्पादन घेऊ लागले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कलिंगडाचे उत्पादन कसे घ्यावे, याबाबतची माहिती आपण घेऊयात.
उष्ण व कोरडे हवामान, भरपूर सूर्यप्रकाश या पिकास मानवते. कडक उन्हाळयाचा व भर पावसाळ्याचा काळ सोडला, तर कलिंगडाची लागवड वर्षभर कधीही करता येते. वेलीच्या चांगल्या वाढीसाठी २४ ते २७ अंश सेल्सियस तापमान उपयुक्त ठरते. या पिकाला मध्यम काळी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थ भरपूर असणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा.
सुधारित जाती – शुगर बेबी, अर्का माणिक, अर्का ज्योती व असाही यमाटो या जातींचा वापर लागवडीसाठी केला जातो. तसेच खाजगी कंपनीच्या शुगर क्वीन, मॅक्स, शुगर किंग, किरण १, किरण २, ऑगस्टा या जातींची लागवड बऱ्याच प्रमाणात केली जाते. एकरी ३५० ते ४०० ग्रॅम बियाणे लागते.
• रोपवाटिका व्यवस्थापन
पूर्वी कलिंगडाची लागवड थेट बी टोकून केली जात होती. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्लास्टिक ट्रेमध्ये रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड केली जाते. त्यामुळे वेलीचे योग्य पोषण, मजूर, पाणी व इतर निविष्ठांवर होणारा खर्च आणि वेळ वाचण्यास मदत होते.
अशी तयार करावीत रोपे :
– रोपे तयार करताना ९८ कप्पे असलेला प्रो ट्रे वापरतात. यामध्ये कोकोपिट वापरले जाते.
– एकरी ३५० ते ४०० ग्रॅम बियाणे लागते.
– लागवडीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा कार्बेंडाझीम २.५ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात चोळावे.
– कोकोपिट ट्रेमध्ये भरल्यावर बोटांच्या सहाय्याने एक छोटा खड्डा घेऊन प्रत्येक कप्प्यात एक बी पेरून कोकोपिटने झाकून घ्यावे व पाणी द्यावे.
– सुमारे ८ – १० ट्रे एकावर एक ठेऊन काळ्या पॉलीथीन पेपरने झाकून घ्यावेत. झाकल्यामुळे ओलावा निघून जात नाही. पाणी कमी लागते. उबदारपणा टिकून राहिल्यामुळे बी लवकर उगवून येते.
– रोपे उगवून आल्यानंतर ३ -४ दिवसांत पेपर काढावा व ट्रे खाली उतरून ठेवावेत.
– रोपमर होऊ नये म्हणून पेरणीनंतर दहाव्या दिवशी कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साइड दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.
– नागअळी व रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ट्रायाझोफॉस १ मिली व इमिडाक्लोप्रीड ०.५ मिली एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
– सुमारे १६ ते २४ दिवसांत रोपांची पुनर्लागवड करावी.
• लागवडीचे तंत्र :
लागवडीसाठी ६० से.मी. रुंद व १५ से.मी. उंच गादीवाफे तयार करावेत. जानेवारी ते मार्च महिन्यात कलिंगडाची लागवड २ x ०.५ मीटर अंतरावर करावी. लागवडीपूर्वी ५ टन चांगले कुजलेले शेणखत व २०:२०:२० किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रति एकरी व लागवडीनंतर २० किलो नत्र ३०, ४५ व ६० दिवसांनी विभागून द्यावे.
• सिल्वर मल्चिंग पेपरचा वापर :
गादीवाफ्यावर ठिबक अंथरल्यावर कलिंगड लागवडीपूर्वी १.२५ मीटर रुंद आणि ४०० मीटर लांब प्रति रोल मल्चिंग पेपर (३० मायक्रॉन जाडीचा) अंथरावा. यामुळे जमिनीचे तापमान, आर्द्रता, अनुकूल राहून पांढऱ्या मुळ्यांची वाढ उत्तम होते. पाण्याची बचत, तणनियंत्रण, खताची बचत तसेच काहीशा प्रमाणात रसशोषक किडींचे नियंत्रणही होते. एकरी पेपरचे ४- ५ रोल लागतात. रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन लॅटरल आणि मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर कलिंगड लागवडीसाठी वाफ्याच्या मध्यभागी ६० सें.मी. अंतरावर १० सें.मी. व्यासाची छिद्रे तयार करावीत. दोन्ही बाजूने लागवड पद्धतीमध्ये मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर २ इंची पाईपच्या तुकड्याच्या सहाय्याने ड्रीपरच्या दोन्ही बाजूला १० सें.मी. अंतरावर छिद्रे पाडावीत. एकाच बाजूच्या दोन छिद्रामधील अंतर २ फुट ठेवावे. पुनर्लागवड केलेली रोपे प्लास्टिक पेपरला चिकटणार नाहीत याची काळजी घ्यावी.
• छाटणी (प्रुनिंग) :
वेलीची वाढ एकसारखी होण्यासाठी, पानाचा आकार मोठा, कीड व रोगांप्रती वेलीची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी नको असलेला वेलीचा भाग म्हणजेच मध्यभागचा शेंडा व अनावश्यक बगलफुटी छाटून टाकाव्यात. छाटणी केल्यामुळे फळांचा आकार, रंग, चव, आकर्षकपणा व वजन यामध्ये वाढ होते.
• ठिबक सिंचन :
ठिबक सिंचनासाठी ३० से.मी. अंतरावर इमीटर असेल्या इनलाईन लॅटरल (२ लिटर/ तास क्षमतेच्या) गादीवाफ्यावर मधोमध टाकाव्यात. दोन लॅटरलमधील अंतर ७ फुट ठेवावे. फळधारणा व फळवाढीच्या अवस्थेत एकसारख्या प्रमाणात पाणी द्यावे. फळे पक्वतेवेळी पाण्याचे प्रमाण कमी करावे, जेणेकरून फळामधील शर्करा व गराचे प्रमाण उत्तम राहील.
फळांची काढणी व उत्पादन – फळांचा बाह्यरंग बदलल्यानंतर पुनर्लागवडीनंतर ७० ते ७५ दिवसांनी काढणी चालू होते. फळाजवळची बाळी सुकल्यानंतर फळांची काढणी करावी. मल्चिंग, ठिबक सिंचन, गादीवाफा, पद्धत वापरून सुधारित पद्धतीने या पिकाचे नियोजन केल्यास एकरी १५- २० टन उत्पादन घेणे सहज शक्य आहे.
• पीक संरक्षण –
रोग :
केवडा – रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. प्रतिबंधक उपाय म्हणून बियाण्यांची उगवण झाल्यापासून २० दिवसांपासून दर ८ ते १० दिवसांच्या अंतराने क्लोरोथॅलोनील किंवा मँकोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. रोगाचा प्रदुभाव दिसताच मेटालॅक्झील एम.झेड. ७२ हे बुरशीनाशक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात दर १० दिवसांच्या अंतराने फवारावे.
भुरी – भुरी रोगाची लक्षणे दिसताच डिनोकॅप किंवा डायफेनकोनॅझोल किंवा हेक्झाकोनॅझोल १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आलटून- पालटून आवश्यकतेनुसार फवारण्या कराव्यात.
कीड :
फळमाशी – कीड लागलेली व खाली पडलेली फळे नष्ट करावीत. क्यू ल्युरचे एकरी ५ सापळे लावावेत. पिकावर व जमिनीवर मॅलॅथीऑनची ०.१ % फवारणी करावी.
रस शोषणाऱ्या किडी – इमिडाक्लोप्रिड (१८.५ एस.एल.) ५ मिलि. किंवा फिप्रोनील (५ एस.सी.) १५ मिलि प्रति १० लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
यशवंत जगदाळे, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषी विज्ञान केंद्र, बारामती