Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

असे करा रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन

खरीप हंगामात पाऊस चांगला झाल्याने निश्चितच रब्बीच्या पिकास फायदा होईल. पण वातावरणातील व निसर्गाचा लहरीपणा यांचा सामना करण्यासाठी योग्य कालावधीत पिकांच्या संवेदनशील अवस्था ओळखून व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. रब्बी पिकांना त्यांच्या वाढीच्या विविध नाजूक अवस्थांमध्ये पाणी देणं गरजेचं असतं. तसेच पाण्याची बचत व पाण्याचा कार्यक्षम वापर करून उत्पादनात भरीव वाढ मिळविता येते व जमिनीची अतिरिक्त हानीसुद्धा टाळता येऊ शकते. चला तर मग आपण रब्बी हंगामातील पाणी व्यवस्थापन या अत्यंत महत्त्वाच्या विषयाची माहिती घेऊयात.

***

पीक उत्पादनाच्या दृष्टीने रब्बी पिकांत पाणी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं असतं. कारण, जमिनीची सुपीकता मुख्यतः जमिनीत उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांवर अवलंबून असते. अन्नद्रव्याची उपलब्धता ही जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मावर अवलंबून असते. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये मुख्यत्वेकरून मुळांद्वारे पाण्याबरोबर शोषून घेतले जातात. या क्रियेस मास फ्लोअसे म्हणतात.

जमिनीत कोणत्याही स्वरूपात निविष्ठा वापरल्या तरी त्यातील अन्नद्रव्ये विशिष्ट स्वरूपातच रूपांतरित होऊन त्यांचंच शोषण मुळांद्वारे पिकांना होत असतं.

पिकांच्या वाढीच्या विविध अवस्था असतात. त्यांची माहिती करून घेऊयात

पहिली रोप अवस्था . या अवस्थेत निश्चित पाण्याची गरज असते. कारण, पिकांच्या वाढीमधील ही प्रथमावस्था असून, रोप अवस्था ही नाजूक व संवेदनशील असते. या अवस्थेत मुळांची वाढ होणं आवश्यक असतं. नत्र, स्फुरद आणि पालाश योग्य प्रमाणात देणं गरजेचं असतं. रब्बी पिकात स्फुरद व गंधक हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यात मुळांची सुदृढ वाढ ही स्फुरदमुळे तर उत्पादनाची प्रत ही गंधकयुक्त खतांवर अवलंबून असते. त्यामुळे नत्राचा अर्धा व स्फुरदचा पूर्ण डोस रोप अवस्थेत फायदेशीर ठरत असतो व मुळे बळकट होऊन झपाट्याने वाढीस लागतात.

फुटव्यांची अवस्था

या अवस्थेत खोड व फुटवे यांची वाढ होत असते. जमिनीत योग्य प्रमाणात ओलावा असल्यास मुळांद्वारे योग्य प्रमाणात मूलद्रव्ये पिकांना मिळण्यास मदत होते. ज्यामुळे निरोगी व उत्तम प्रकारे पिकांची वाढ होते.

फूल व फळधारणा

रब्बी पिकात ही महत्त्वाची अवस्था असून, विविध पिकांत विविध कालावधीत येते. या अवस्थेत उपलब्ध पाण्याचा योग्य वापर पीक उत्पादनास फायदेशीर ठरते. कारण, या कालावधीत प्रामुख्याने परागीकरण होऊन फळधारणा होत असते. या कालावधीत पाण्याचा ताण पडल्यास मोठ्या प्रमाणावर पीक उतार कमी होतो व उत्पादनाची प्रत खालावते.

फळधारणा व पक्वता

ही शेवटची अवस्था असून, रब्बी पिकांच्या उत्पन्नाशी निगडित असते. त्यामुळे जमिनीत ओलावा असणे गरजेचे असते. कधीकधी अधिक थंडीमुळे जमिनीस भेगा पडतात. जमिनीतील बाष्पाचा मोठ्या प्रमाणावर र्‍हास होतो. अशा परिस्थितीत पाणी कमी असल्यास स्प्रिंकलर किंवा ठिबक पद्धतीचा वापर करून उत्पादनात वाढ करता येते. या परिस्थितीत दुर्लक्ष झाल्यास उत्पन्नावर विपरित परिणाम दिसून येतो.

विविध रब्बी पिकांची पाण्याची गरज

गहू

गहू हे पीक साधारणतः मध्यम ते भारी जमिनीस उपयुक्त असून, ते रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक मानले जाते. या पिकासाठी भिजवणीचे पाणी सोडून 4 ते 5 पाण्याच्या पाळ्या पिकांच्या नाजूक परिस्थितीत देणे आवश्यक असते. एकूण 40 सें. मी. पर्यंत पाण्याची गरज असते. प्रत्येक पाण्याच्या पाळीत 8 सें. मी. पर्यंत जमीन भिजेल, अशी गरज असते. गहू पिकासाठी काळी, खोल, चांगला निचरा असणारी जमीन अधिक उत्पादन देते. कमी खोलीची किंवा मध्यम खोलीची जमीन असेल, तर पाण्याची दर 15 दिवसांच्या अंतराने पाळी उपयुक्त ठरते. उथळ जमीन किंवा कमी खोलीच्या जमिनीत गव्हाचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही म्हणून शक्यतो गहू घेऊ नये.

रब्बी ज्वारी

रब्बी ज्वारीची पेरणी पाण्याच्या 3 ते 4 पाळ्या देण्याइतकी परिस्थिती असलेल्या मध्यम खोली ते भारी खोल जमिनीत करावी. उथळ किंवा हलक्या जमिनीत हे पीक घेतल्यास जास्त पाणी द्यावे लागते. गहू पिकाप्रमाणेच या पिकास एकूण तीन पाण्याच्या पाळ्यांमध्ये 40 सें. मी. पर्यंत पाणी दिल्यास अपेक्षित उत्पादन येते. जिरायती भागात रब्बी ज्वारीची पेरणी बहुधा सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसाच्या पाण्यावर केली जाते; परंतु अशा पेरणीत पीक फुलोर्‍यात आल्यावर पाण्याचा ताण पडू शकतो म्हणून संरक्षक पाणी उपलब्ध करावे अन्यथा पीक उत्पादनात घट येऊ शकते.

हरभरा

रब्बी हंगामातील हरभरा हे पीक गहू व ज्वारीपेक्षा कमी पाण्यावर येत असल्याने शेतकर्‍यांची या पिकाला पसंती असते. मध्यम ते खोल जमिनीत पाण्याचा चांगला निचरा असणारी जमीन हरभरा पिकास उपयुक्त ठरते. कारण, या पिकास जास्त पाणी मानवत नाही. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांना पाण्याच्या दोन पाळ्या देणे शक्य आहे, अशा शेतकर्‍यांनी हरभरा हे पीक रब्बी हंगामात घेणे फायद्याचे ठरते. हरभरा पिकासाठी एकूण दोन पाण्याच्या पाळ्यांत 25 ते 30 सें. मी. पाण्याची आवश्यकता असते. जमिनीतील निचरा व्यवस्थित नसल्यास बियांची उगवण शक्ती कमी होते. परिणामी हरभरा पिकाचा उतारा कमी होतो.

करडई

करडई हे पीक मध्यम खोलीच्या तसेच खोल काळ्या किंवा बागायती अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीत घेता येते. या पिकास कमीत कमी पाण्याच्या दोन पाळ्या लागतात, तर एकूण 20 ते 25 सें. मी. पाण्याची गरज असते. जिरायत करडईचे पीक जमिनीत साठविलेल्या ओलाव्यावरही घेता येते. करडई पिकास पहिली पाण्याची पाळी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी म्हणजेच पिकाची लुसलुशीत वाढीची अवस्था असताना, तर दुसरी पाण्याची पाळी ही पेरणीनंतर 55 ते 60 दिवसांनी देणे गरजेचे असते. म्हणजेच करडई पीक फुलोर्‍यावर असताना पाणी देणे फायदेशीर ठरते. ज्या शेतकर्‍यांना पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध नसेल, अशा शेतकर्‍यांनी रब्बीत करडई पिकाची हमखास निवड करावी.

सूर्यफूल

सूर्यफूल हे पीक दुबार पेरणीस संकट तारक असून, रब्बीमध्ये या पिकास एकूण चार पाण्याच्या पाळ्यांची आवश्यकता असते. या पिकास एकूण 40 ते 45 सें. मी. पर्यंत पाण्याची गरज असते. हे पीक मध्यम ते खोल जमिनीत घेतल्यास अपेक्षित उत्पादन मिळते. सूर्यफूल हे पीक इतर पिकांपेक्षा कमी पाण्यात जास्त काळ तग धरत असल्याने मध्यम, खोल जमिनीची निवड करावी. या पिकास ठिबकची सुविधा केल्यास 50 टक्के पाण्याची बचत होऊन 20 टक्के उत्पादन वाढ मिळू शकते.

डॉ. एस. बी. पवार

(लेखक औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात कार्यरत आहेत.)

Exit mobile version