शेतातील मातीत पुरेसा सेंद्रिय कर्ब असेल तर ती चांगले उत्पादन देईल व पिकांसाठी अनावश्यक खर्च कमी केला की, मूळ नफ्यात वाढ होईल, हा शाश्वत शेतीचा मूलमंत्र आहे. जमिनीच्या पोताचा विचार न करता बर्याच वेळा फसव्या जाहिरातीकडे आकर्षित होऊन चुकीच्या महागड्या बियाण्यांची लागवड करण्यात येते. कम्पोस्ट, शेणखत इत्यादींचा वापर न करताच रासायनिक खतांच्या आणि रासायनिक कीडनाशकांच्या वापरामुळे जमिनीत काम करणारे जिवाणू कमी झाले आहेत. म्हणून जमीन सजीव करण्याकरिता जिवाणू खते, कम्पोस्ट, गांडूळ खते, गांडूळे, नॅडेप पिकांचा फेरपालट आणि मिश्रपीक पद्धतीचा अवलंब करता येईल.
सेंद्रिय खते तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या याप्रमाणे :
गांडूळ खत
शेतातील काडीकचरा, गोठ्यातील शेण-मलमूत्र यांचा वापर गांडूळासाठी खाद्य म्हणून करून यासाठी शक्यतो गोठ्याजवळ पाणी सहज मिळू शकेल अशी जागा निवडावी. धुम्मस करून किंवा आवश्यकतेप्रमाणे सिमेंट, रेतीचे प्लॅस्टर करून टणक करावी, जेणेकरून गाडूळे जमिनीत जाणार नाहीत. तसेच या जागेभोवती विटांची एक फूट उंचीची एका विटेची भिंत बांधून, बांबू पर्हाट्या, तुर्हाट्यांचा उपयोग करून सावली तयार करावी. या जागी शेणकाडी, कचर्याचे मिश्रण करून चार फूट रुंद व दीड फूट उंचीचे व आवश्यकतेनुसार लांबीचे बेड तयार करावेत. बेडवर ‘आसेनिया फिटीडा’ जातीचे गांडूळ सोडून जुने पोते किंवा कंता वरून झाकावे. दररोज बेडवर हलकेसे पाणी शिंपडून ओलसर ठेवावा. गांडूळांच्या संख्येनुसार सेंद्रिय पदार्थांचे रूपांतर साधारण ४५ दिवसांत चहापत्तीसारख्या रवेदार गांडूळ खतात होते. यानंतर बेडवर पाणी देणे बंद करून, गांडूळ तळाशी रास करून ते जमा करावे. त्यामुळे गांडूळे तळाशी जमा होतील. वर असलेले गांडूळ हलक्या हाताने जमा करून शेतीसाठी वापरावे. तळाशी राहिलेल्या गांडूळांचा नवीन बेडसाठी उपयोग करावा. गांडूळ खत वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो. त्याचबरोबर पिकांना व जमिनीतील जिवाणूंना संतुलित प्रमाणात सर्व अन्नद्रव्ये व एन्झाईमस उपलब्ध होऊन पिकाच्या उत्पादनात व गुणवत्तेमध्ये वाढ होते. पक्षी, साप, उंदीर, बेडूक, मुंग्या, कोंबड्या इत्यादी शत्रूंपासून गांडूळांचे संरक्षण करावे.
नॅडेप खत
सेंद्रिय खत तयार करण्याची विकसित पद्धत आहे. साधारणतः १०० किलो शेणासोबत शेतातील काडी, कचरा, पालापाचोळा, तण व माती इत्यादींचा वापर करून साधारणतः चार महिन्यांत ३ टन सेंद्रिय खत तयार होते. जमिनीवर विटा-सिमेंटचे टाके बांधून खत तयार करता येते.
कम्पोस्ट खत
नेहमीच्या पद्धतीत जमिनीवर ढिग करून ठेवलेले शेण व काडीकचरा सतत ऊन-पावसात राहत असल्यामुळे त्यातील आवश्यक अन्नघटक मोठ्या प्रमाणात हवेत व पाण्यासोबत निघून जातात. त्याऐवजी हाच शेण-काडीकचरा खड्डा करून त्या खड्ड्यात टाकल्यास जास्तीत जास्त एक मीटरपर्यंत खोलीच्या दर्जाचे सेंद्रिय खत तयार होते. या पद्धतीत नेहमीच्या शेणखतासोबत येणार्या तणांचाही बंदोबस्त होतो.
पर्हाट्यापासून कम्पोस्ट बनविण्याची पद्धत
नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने ही नवीन पद्धत विकसित केली आहे. यामध्ये १० मीटर लांब, २ मीटर रुंद, १ मीटर खोल खड्डा करून त्यात दोन हेक्टर क्षेत्रातील पर्हाट्यावर ज्वारीची फणवटे व सोयाबीनचे काड इतर मऊ सेंद्रिय पदार्थ पर्हाट्यातील रिकामी जागा भरण्यासाठी टाकावे. खड्डा चार थरावर हे द्रावण शिंपडावे व खड्डा मातीने झाकून घ्यावा. तयार झालेले खत गांडूळ खताप्रमाणे वापरता येते.
इफको, फास्फो, सल्फो, नायट्रो (पीएसएन) कम्पोस्ट आवश्यक सामग्री
* ताजा शेण २५० किलो
* काडीकचरा २५० किलो
* माती १५ किलो, युरिया ५.५ किलो
* राक फॉस्फेट किंवा डीएपी १४३ किलो किंवा २५ किलो, जिप्सम १०० किलो
* पीएसबी कल्चर २१ किलो
* जिथे ऊन पडते अशा ठिकाणी ३ मीटर लांब १.५ मीटर रुंद व १ मीटर खोल असा खड्डा बनवावा.
* पहिला थर ः १५ किलो काडीकचरा आणि १५ किलो शेण एकसारखे काडीकचर्यावर पसरावा.
* दुसरा थर ः ३३० ग्रॅम युरिया, १ लिटर पाणी व शेणात मिसळून पातळ करून शिंपडावा.
* तिसरा थर ः ८.६ किलो रॉक फॉस्फेट किंवा २ किलो डीएपी शेणासोबत मिसळून पातळ करून शिंपडावा.
* चौथा थर ः ६.२५ किलो जिप्सम, शेण व पाण्यासोबत मिसळून शिंपडावा.
* पाचवा थर ः १.५ किलो बारीक खत माती टाकावी. वरीलप्रमाणे असे १६ थर बनवावेत.
* शेवटी माती आणि शेणाच्या मिश्रणाचा लेप लावावा व यावर प्लॅस्टिक सीटने झाकावे.
* प्रत्येक ३-४ आठवड्यांची एक पलटणी द्यावी.
* खड्ड्यामध्ये ५०-६० टक्के आर्द्रता ठेवावी. यासाठी बांबूंनी पाच ठिकाणी छिद्रे करावीत. यामधून प्रत्येक दोन आठवड्यांनी पाणी घालावे.
* ११० दिवसांत उत्तम प्रतीचे ५५० किलो कम्पोस्ट तयार होते. खत थंड झाल्यावर यामध्ये पीएसबी कल्चर मिसळावे. अशा प्रकारे तयार झालेले कम्पोस्ट १ टन प्रति एकर याप्रमाणे वापरावे.
* पीएसएन कम्पोस्टमध्ये १.९० ते २.५० नत्र, ३.०५ ते ४.५ टक्के स्फूरदच्या व्यतिरिक्त सल्फर कॅल्शियम व अन्य सूक्ष्म पोषक तत्त्व असतात.
– प्रशांत वायझडे
मो. नं. ९०११५१५६२८