Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भुईमूग लागवडीसाठी पॉलिथीन आच्छादनाचा वापर

भुईमुगाची उत्पादकता वाढविण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. बदलत्या वातावरणाचा विचार करता, पाण्याचा व अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर करून उत्पादन वाढविण्यासाठी भुईमूग लागवडीमध्ये पॉलिथीन आच्छादनाचा (मल्चिंग) वापर करणे अधिक फायदेशीर आहे.

पॉलिथीन आच्छादन वापराचा प्रचार, प्रसार पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे या तंत्रज्ञानाची बर्‍याच शेतकर्‍यांना पुरेशी माहिती नाही.

पॉलिथीन आच्छादन म्हणजे काय?
पेरणीआधी वाफ्यांवर पॉलिथीन मल्चिंग फिल्म अंथरून त्यावर पेरणी करणे म्हणजे पॉलिथीन आच्छादन होय.
या पद्धतीचा वापर सर्वप्रथम जपान या देशात करण्यात आला. त्यानंतर चीनने भुईमूग लागवडीसाठी पॉलिथीन आच्छादनाचा वापर करून नेत्रदीपक प्रगती केली. अलिकडच्या काळात भारतातसुद्धा भुईमूग लागवडीसाठी पॉलिथीन मल्चिंगचा वापर करून प्रचलित पद्धतीपेक्षा २-३ पट उत्पादन घेण्यात येत आहे. पॉलिथीन आच्छादनावर भुईमुगाची लागवड करावयाची असल्यास पेरणी पद्धतीत थोडेफार बदल करावे लागतात. या पद्धतीमध्ये पूर्वमशागतीला फार महत्त्व आहे.

पूर्वमशागत
भुईमुगाला मऊ व भुसभुशीत जमिनीची आवश्यकता असते. त्यामुळे शेताची नांगरणी करून पिकाला सेंद्रिय खताचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने १५-२० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकून कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटरच्या सहाय्याने जमिनीत मिसळून देऊन जमीन मऊ व भुसभुशीत करावी.

वाफे तयार करणे
रिजर किंवा नांगर किंवा डवर्‍याला दोरी गुंडाळून ९० सें. मी. रुंदीचे सरी वरंबे तयार करावे.

खत व्यवस्थापन
या पद्धतीमध्ये पिकाला पेरणीनंतर खते देता येत नाहीत, म्हणून वरंबे तयार झाल्यानंतर माती परीक्षणानुसार एकरी १० किलो नत्र, २० किलो स्फूरद व १० किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये मातीत मिसळून द्यावे. स्प्रिंकलर किंवा ठिबकच्या मदतीने हलके पाणी देऊन वरंबे भिजवून घ्यावे. त्यानंतर पेरणीपूर्व तणनाशक पेन्डामिथीलीन ४०० ग्रॅम क्रियाशील घटक २०० लिटर पाण्यात घेऊन प्रतिएकर फवारणी करावी.

पॉलिथीन फिल्म अंथरणे व पेरणी
९० सें. मी. रुंदीच्या वरंब्यावर ७ मायक्रॉन जाडीची पॉलिथीन मल्चिंग फिल्म पसरून देऊन वरंब्याच्या दोन्ही बाजू मातीने व्यवस्थित झाकून द्याव्यात. छिद्रे नसल्यास ३० बाय १० सें. मी. किंवा २० बाय २० सें. मी. अंतरावर ४ सें. मी. व्यासाचे छिद्र लोखंडी पाईपने पाडून घ्यावे. छिद्रे असलेल्या फिल्म बाजारात उपलब्ध आहेत. त्यानंतर प्रत्येक छिद्रात दोन दाणे याप्रमाणे टोकणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम व स्फूरद विरघळणारे जिवाणू, पी. एस. बी. यांची बीजप्रक्रिया २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे व ५ ग्रॅम ट्र्ायकोडर्मा प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. पेरणीसाठी उपट्या वाणाची जसे टी. ए. जी. २४ व टी. जी. २६ या वाणांचे एकरी ४० किलो बियाणे वापरावे. पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत करावी. प्रतिएकर २० ते २५ किलो पॉलिथीन
कागद लागतो. ७ मायक्रॉन जाडीचा कागद हा ९० सें. मी. रुंदी व ४०० मीटर
लांबीच्या रोलमध्ये उपलब्ध आहे. यासाठी प्रति एकर ३००० ते ४००० रुपयांपर्यंत खर्च येतो.

पाणी व्यवस्थापन
या पद्धतीमध्ये पाण्याचा कार्यक्षमपणे वापर केला जात असल्यामुळे ठिबक किंवा स्प्रिंकलर पद्धतीने पाणी द्यावे. प्रचलित पद्धतीत एकूण १७ ते १८ पाण्याच्या पाळ्यांची आवश्यकता असते, तर या पद्धतीमध्ये १० ते ११ पाण्याच्या पाळ्यांमध्ये पीक परिपक्व होते.

पॉलिथीन आच्छादनाचे फायदे
*प्रचलित पद्धतीपेक्षा उत्पादनात २ पट वाढ होते.
*पाण्याची बचत होते.
*कमी तापमानामध्येसुद्धा एकसमान, एकसारखी व लवकर उगवण होते.
*तणांचा प्रादूर्भाव होत नाही.
*पीक काढणीसाठी १० ते १५ दिवस लवकर तयार होते.
*किडींचे व रोगांचे प्रमाण कमी असते.
*अपरिपक्व व पोचट शेंगांचे प्रमाण कमी असते.
*दाण्यांमध्ये तेलाच्या व प्रोटीनच्या प्रमाणात वाढ होते.
*शेंगा जमिनीमध्ये खुडत नाहीत.
*जमिनीच्या जैविक गुणधर्मात वाढ होते.

भुईमुगाच्या उत्पादन वाढीसाठी पॉलिथीन मल्चिंगचा वापर आवश्य करावा. या पद्धतीमध्ये महाराष्ट्रातील काही शेतकर्‍यांनी एकरी ७० क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले आहे.

– प्रा. संजय उमाळे
कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद,
जि. बुलडाणा

Exit mobile version