Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

बदलत्या वातावरणात पिकांसाठी वापरा जिवंत आच्छादन

सध्याचे बदलते हवामान, पाणीटंचाई लक्षात घेऊन गाव-शिवारातील पिके वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. यासाठी आच्छादन (मल्चिंग) सारख्या तंत्राचा अवलंब केला जात आहे. आच्छादन म्हणजे काय, त्याचे प्रकार, आच्छादन पिके आदींबाबतची माहिती या लेखात घेऊया…

मृद्बाष्प संवर्धन किंवा जमिनीची सुपीकता वाढविणे किंवा तणनियंत्रण अथवा जमिनीचे तापमान समायोजन करणे यापैकी कुठल्याही एका कारणासाठी किंवा एकत्रित सर्व घटकांसाठी कोणत्याही पदार्थाचा किंवा घटकांचा जमीन झाकण्यासाठी केलेला वापर म्हणजेच आच्छादन होय.

आच्छादन कशासाठी वापरावे?
* जमिनीचे दिवस-रात्र यातील तापमानाची तफावत कमी करणे.
* बाष्पीभवनाचा वेग कमी करणे.
* सक्रिय मुळांच्या कार्यक्षेत्रातील तापमान समायोजन करणे.
* तणांची वाढ कमी करणे.
* सेंद्रिय पदार्थांचे जमिनीतील प्रमाण वाढविणे.
* गोठण बिंदूखाली भूपृष्ठाचे तापमान जाऊ न देणे. यामुळे थंडीमुळे फेसांचे पुंजके (फ्रॉस्ट) याची निर्मिती होत नाही, तसेच गोठण अवस्थेत पाण्याचे थेंब भूपृष्ठालगत खोडास, कोवळ्या पानांस किंवा कोंबास थंडीच्या कडाक्यातही इजा होत नाही.
* थंडीच्या किंवा उष्णतेच्या लाटेपासून झाडाचे (अर्थात पानांचे म्हणजे पेशींचे) तापमान समायोजन करणे.
* काही प्रमाणात मजुरीच्या खर्चात बचत होते.
* अन्नद्रव्यांचे झिरपून (लिचिंग) होणारे नुकसान कमी होते.
वरील कारणांसाठी आच्छादन वापरणे उपयुक्त ठरते.

सेंद्रिय आच्छादन वापरल्यास त्याचे कुजण्याचे काम चालू राहते. हे कुजणे चालू असताना त्यातून उष्णता बाहेर पडते. या उष्णतेमुळे सक्रिय मुळांच्या भागातील तापमान हिवाळ्यात वाढते. उन्हाळ्यात कुजण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे त्याचा थंडावा मुळांच्या भागास मिळतो आणि जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. यामुळे कार्यक्षम मुळांच्या क्षेत्रात उन्हाळ्यात कमी, तर हिवाळ्यात जास्त तापमान राहते. हवेतील अथवा वातावरणातील तापमानात आणि मुळांच्या कार्यक्षेत्रातील तफावत फार मोठी राहत नाही. उपलब्ध पाण्याचे प्रमाण वाढते. या सर्व घटकांमुळे मुळांची संख्या, वाढ आणि विकास चांगला होतो. मुळांच्या वृद्धीमुळे जमिनीतील अन्नद्रव्य, पाणी यांचे वहन उर्ध्वगामी दिशेने योग्यरीतीने होते. यामुळे झाडाच्या वाढीवरही सकारात्मक परिणाम होतो. पर्यायाने पीक उत्पादनावर चांगला परिणाम दिसतो.

आच्छादन निवडीचे निकष
* पिकासाठी वापरावयाचे आच्छादन हे कमी खर्चाचे असावे.
* शक्यतो स्थानिक ठिकाणी आणि नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणारे असावे.
* पिकाचे आच्छादन म्हणून वापरताना ते त्याच पिकाचे नसावे. उदा. कापसाला आच्छादन करावयाचे असल्यास कापसाच्या पर्‍हाट्याचा शक्यतो वापर करू नये. यामुळे कीड व रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता वाढते.
* उन्हाळ्यात पारदर्शक किंवा करड्या रंगाचे आच्छादन वापरावे.
* हिवाळ्यात काळ्या रंगाचे आच्छादन वापरावे.

आच्छादन कसे वापरावे?
पूर्वमशागत झालेल्या, तणविरहीत असलेल्या आणि पीक पेरणी झालेल्या किंवा भाजीपाला व फळलागवड करण्यासाठी पुरेशी जागा सोडून इतर जमिनीवर आच्छादन करावे. सेंद्रिय आच्छादन असेल तर तीन इंच व इतर पदार्थांचे असेल तर सहा इंच जाडीचे आच्छादन करावे. (आकृती क्र.१) तसेच वर्तमानपत्राचे आच्छादन वापरायचे असल्यास एकावर एक असे तीन थर द्यावेत.

आच्छादनाचे प्रकार
आच्छादनाचे विविध प्रकार पडतात. यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय आच्छादन (ऑरगॅनिक मल्च), जैविक आच्छादन (लिव्हिंग मल्च), असेंद्रिय आच्छादन (इनऑरगॅनिक मल्च), प्लॅस्टिक आच्छादन (प्लॅस्टिक मल्च) आणि कापड उद्योगातील कचरा (जिओटेक्स्टाईल्स मल्च) इत्यादी प्रकार आहेत.

पिकांचा प्रकार, हवामान, हंगाम, भौगोलिक स्थान व वातावरण याचा विचार करून जैविक, सेंद्रिय, असेंद्रिय, प्लॅस्टिक आणि कापड उद्योगातील कचरा इ. प्रकारच्या आच्छादनाचा वापर करणे योग्य असते.

जैविक आच्छादन (लिव्हिंग मल्च)
यामध्ये जमिनीला झाकून ठेवण्यासाठी एक प्रकारची चादर किंवा पिकांचा अथवा सजीव वनस्पतींचा थर केलेला असतो. बहुतांश वेळा यास ‘कव्हर क्रॉप’ असेही संबोधतात. जमीन झाकण्यासाठी अगदी खुरट्या प्रकारात येणारे कुठलेही पीक लावले जाते.  यामुळे जमिनीची धूप कमी होते, नत्राची मात्रा बचत होते, तण आणि कीड व रोगप्रतिबंध निर्माण होतो आणि जमिनीतील कार्बनयुक्त पदार्थांत वाढ होते.

हिवाळ्यात आच्छादन पीक म्हणून खरिपातील पीक काढणीच्या आधी (परिपक्व अवस्थेत) पेरतात किंवा लावतात तर रब्बीतील पीक उगवून आल्यानंतर लगेच काढतात व त्यास तेथेच आच्छादन म्हणून कधी-कधी तसेच राहू देतात. यासाठी ओट, बार्ली, मोहरी अशा पिकांचा वापर करतात. थंडीच्या दिवसांत ही पिके लवकर वाढणारी असावीत. धुके किंवा फेसांची पुजंके (फ्रॉस्ट) सहन करणारी असावीत. कधी-कधी मुख्य पिकाबरोबरच आच्छादन पिकांची लागवड करतात.  सद्य:स्थितीत फळबागेत अथवा द्राक्षबागेत आच्छादन पिकांची लागवड उपयुक्त ठरते. यासाठी मोहरी, मुळा, पालक, मेथी किंवा हिवाळ्यात घेतली जाणारी इतर भाजीपाला पिके आच्छादन पीक म्हणून घेता येतात. कोरडवाहू फळबागेसाठी खुरटी गवत, पवना गवत, गोकर्ण गवत किंवा इतर रानटी गवतांचा वापर आच्छादन पीक म्हणून करता येतो. अशावेळी आच्छादन पीक हे कायमस्वरूपी असते, तर मुख्य पीक बदलले जाते.

आंबा, पेरू, चिकू, नारळ, मोसंबी, संत्रा इत्यादी बागेत पाण्याची उपलब्धता, लागवडीची पद्धत, जमिनीचा प्रकार यानुसार विविध प्रकारचे आच्छादन पीक घेता येते. याचा बर्‍याच प्रमाणावर फायदा होतो.

आच्छादन पिकांचे अनेक फायदे आहेत. प्रामुख्याने जमिनीचे आणि पाण्याचे प्रदूषण होत नाही; कारण अन्नद्रव्य, रासायनिक घटक, किटक व कीडनाशके यांचे झिरपणे कमी होते. जमिनीची धूप कमी होते. जमिनीतील पाण्याचे पुनर्भरण होते. जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची प्रत सुधारते; परंतु अति हिवाळ्यात (थंडीच्या लाटेत) आच्छादन पीक पिकांचे संरक्षण करण्यात कमी पडते. या वर्षाचा विचार करता अशा स्वरूपाची उपाययोजना करणे उपयुक्त ठरेल. आच्छादनाचा जास्त फायदा मिळविण्यासाठी जैविक, अजैविक किंवा सेंद्रिय आणि इतर आच्छादनांचा वापर करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

Exit mobile version