सोयाबीन पिकावरील खोडमाशी व चक्रीभुंगा किडींचे करा वेळीच व्यवस्थापन

ज्या शेतक-यांनी सोयाबीन पिकाची पेरणी जुन महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात केली त्यांचे पीक २५ ते ३० दिवसांचे आहे, या पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. तर ज्या शेतक-यांनी जुलै महिन्याच्या दुस-या आठवडयात पाउस झाल्यानंतर पेरणी केली आहे अशा पिकावरसुद्धा पुढील काही दिवसात खोडमाशी व चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बंधुनी जागरूक राहून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्‍त्र विभागाने केले आहे.

खोडमाशी प्रादुर्भाव :

खोडमाशी लहान काळया रंगाची असुन पानांवर व देठावर अंडी देते. अंडयातुन निघालेली फिकट पिवळया रंगाची प्रथम पानाच्या शिरेला छिद्र करते नंतर पानाच्या देठातून फांदीत किंवा झाडाच्या मुख्य खोडात प्रवेश करुन आतील भाग पोखरुन खाते. अळी खोडमाशीचा प्रादुर्भाव पिक लहान असतानाच सहजपणे ओळखु येतो. जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळला तर त्या झाडावर खोडमांशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता असते. असा शेंडा मधोमध कापल्यास आत मध्ये लहान पिवळी अळी जमिनीच्या बाजूने डोके असलेली म्हणजेच खालच्या दिशेने खोड पोखरत जात असलेली दिसते. रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मात्र तो लक्षात येत नाही. अळी व कोष अवस्था फांदयात व मुख्य खोडात असते. शेवटी फक्त प्रौढ माशी निघून छिद्र फांदीच्या खोडाजवळील बाजूस दिसते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत झाल्यास झाड वाळते, अशा कीडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याचे वजन कमी होउन १५ ते ३० टक्क्या पर्यंत उत्पादनात घट येते.

चक्रीभुंगा प्रादुर्भाव : 

चक्रीभुंग्याची मादी पानाच्या देठावर, फांदीवर व मुख्य खोडावर एकमेकास समांतर दोन (चक्र) काप तयार करुन त्यामधे अंडी टाकते. पान फक्त सुकलेले असेल तर चक्रीभुंग्याने नुकतेच अंडे दिलेले असते. पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी अंडे दिलेले असण्याची तसेच त्यातून लवकरच अळी निघून ती नुकसान सुरु करण्याची शक्यता असते. चक्रीभुंग्याने केलेल्या खापेमुळे वरच्या खापेच्या वरील भाग वाळून जातो. अंडयातून निघालेली अळी पानाचे देठ, फांदी व खोड आतून पोखरत जमिनीच्या दिशेने जाते. साधारणता पीक दिड महिन्याचे झाल्यानंतर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव झाल्यास झाड न वळ ता कमी शेंगा लागतात त्यामुले उत्पादनात घट येते.

खोडमाशी व चक्रीभुंगा किडींच्‍या व्यवस्थापन करिता पुढील उपाय योजना कराव्‍यात

ज्या भागामध्ये चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव नेहमीच मोठ्या प्रमाणात दिसून येतो,  त्या ठिकाणी  पिकाची पेरणी जून अखेर पर्यंत करायला पाहिजे. सरी वरंबा पद्धतीने लागवड केल्यास कीटकनाशकाची फवारणी करणे सोयीस्कर होते. एकात्मिक किड व्यवस्थापन करताना शेतात सुरवातीपासून खोडमाशी व चक्री भुंगा प्रादुर्भावग्रस्त वाळलेल्या फांद्या व झाडे या आतील किडीसह नष्ट कराव्यात. पिकाच्या सुरुवातीपासुन 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

खोडमाशीमुळे 10 ते 15 टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे व चक्रीभुंगा 3 ते 5 टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे ही आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच लेबलक्लेम नुसार थायमिथोक्झाम 12.6 अधिक लॅमडासाहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 2.5 मिली किंवा ईथीऑन 50 ईसी 30 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 एससी 3 मिली या कीटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. स‍दरिल किटकनाशकाची मात्रा साध्‍या पंपाकरिता असुन पॉवर स्‍प्रे करिता किटकनाशकाची मात्रा तीन पट करावे. दोन किटकनाशकाचे मिश्रण न करता केवळ एकच किटकनाशकाची संरक्षक कपडे घालून सकाळी किंवा सांयकाळच्या वेळेस फवारणी करावी.

शेतकरी बांधवानी सुरुवातीपासुन सोयाबीन पिकावरील खोडकिडींचे बारकाईने निरीक्षण करावे जेणे करुन उत्पादनात घट येणार नाही. पिकाच्या सुरुवातीपासुन एकात्मिक किड व्यवस्थापनाचा अवलंब करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्‍त्र विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.