पेरणीचा हंगाम सुरु झाला की शेतकऱ्यांची चांगल्या वाणाचे शुद्ध बियाणे मिळवण्यासाठी धावपळसुरु होते. शुद्ध बियाणे मिळवताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. एवढे करून ही शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे, हव्या त्या वाणाचे शुद्ध, चांगले, दर्जेदार बियाणे मिळेलच याची खात्री नसते. कधीकधी हव्या त्या वाणाचे बियाणे न मिळाल्याने पर्यायी उपलब्ध बियाणे घ्यावे लागते. सुधारित आणि संकरीत वाणांची मागणी शेतकऱ्यांच्या वाढत्या जागरूकतेमुळे आणि प्रसारमाध्यमांमुळे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या मागणीप्रमाणे सुधारित आणि संकरीत बियाणांचा पुरवठा करणे बिजोत्पादन कंपन्यांना जिकीरीचे होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बिजोत्पादनाबद्दल आवश्यक माहिती घेऊन किमान स्वतः पुरते बिजोत्पादन करणे गरजेचे झाले आहे.
बिजोत्पादन करताना खालील मुलभूत बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
१. बीज क्षेत्र नोंदणी: बियाणे कायद्यातील कलम ९ नुसार कोणत्याही शेतकऱ्याला बिजोत्पादन क्षेत्रांची नोंदणी करता येते. बिजोत्पादन क्षेत्रांची नोंदणी पेरणीनंतर १५ दिवसांत बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे करणे आवश्यक असते. यासाठी जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकार्यांकडे नोंदणी शुल्कासह विहित नमुन्यात भरलेला अर्ज सादर करावा लागतो.
२. बियाण्यांचा स्त्रोत: बिजोत्पादन कार्यक्रमासाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्याची स्त्रोत पडताळणी जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी करतात. पायाभूत बिजोत्पादन कार्यक्रमासाठी मुलभूत बियाणे तर प्रमाणीत बिजोत्पादनासाठी पायाभूत बियाणे स्त्रोत म्हणून वापरले जाते.
३. जमीन: बिजोत्पादनासाठी जमीन शक्यतो मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी निवडावी. तसेच ज्या पिकाचे बिजोत्पादन घ्यावयचे आहे, त्या पिकाच्या त्याच अथवा दुसऱ्या जातीचे पिक आधीच्या हंगामात त्या जमिनीमध्ये घेतलेले नसावे. तसेच जमीन तण विरहित असावी.
४. विलगीकरण: बिजोत्पादनाचे क्षेत्र शक्यतो त्या पिकाच्या इतर जातीपासून प्रमाणीकरण यंत्रणेच्या नियमाप्रमाणे अंतर राखून असावे. प्रत्येक पिकासाठी विलगीकरण अंतर वेगवेगळे असते आणि पिकाच्या परागीभावानाच्या पद्धतीप्रमाणे कमी जास्त होते.
५. मशागत: जमीन पेरणीपूर्वी खोल नांगरून घ्यावी. तसेच २-३ कुळवाच्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करून पेरणीसाठी तयार करावी.
६. पेरणी: बिजोत्पादन करण्यासाठी वापरण्यात येणारे बियाणे हे अधिकृत यंत्रणेने प्रमाणीत केलेले असावे, संकरीत बिजोत्पादन घेताना नर आणि मादी वाणांच्या ओळी ठराविक प्रमाणातच पेराव्या लागतात. उदा. संकरीत ज्वारी बिजोत्पादन घेताना २:४ या प्रमाणात नर आणि मादी ओळी पेराव्यात. नर आणि मादी वाणाचे बी भेसळ होऊ नये यासाठी नर वाणाच्या ओळीच्या टोकाला ताग पेरावे अथवा खुंटी रोवावी. संकरीत पिकाच्या मादी व नर वाणाच्या फुलोर्यात येण्याचा कालावधी वेगळा असल्यास. नर व मादी वाणाचा फुलोरा एकाच वेळी येण्यासाठी, नर व मादी वाण वेगवेगळ्या वेळी पेरावे लागतात.
७. भेसळ काढणे: बिजोत्पादन करण्याचे मुख्य उद्दिष्ट उच्च प्रतीचे बियाणे तयार करणे हे आहे. यासाठी बिजोत्पादन घेतलेल्या क्षेत्रात आढळून येणारी भेसळ रोपे वेळच्या वेळी काढणे गरजेचे आहे. बिजोत्पादन घेतलेल्या जातीच्या गुणधर्माव्यातिरिक्त वेगळ्या जातीची, त्याच जातीची परंतु रोगट पूर्णपणे न वाढलेली, जास्त उंच किंवा बुटकी झाडे यापासून भेसळ होते. म्हणून अशी झाडे फुलोऱ्यात येण्यापूर्वी त्वरीत पुर्णपणे उपटून काढून टाकावीत. स्वपरागीभावन असणाऱ्या पिकात भेसळ रोपे पीक काढण्यापूर्वी काढता येतात तर परपरागीभवन असणाऱ्या पिकातील भेसळीची रोपे हि फुलोऱ्यात येण्यापुर्वीच काढावीत. संकरीत बिजोत्पादनात नर वाणाची झाडे मादी वाणांच्या ओळीत आढळल्यास ती सुद्धा काढून टाकावीत. भेसळी व्यतिरिक्त बियाणेमार्फत होणारे रोग व तणाचा प्रसार टाळण्यासाठी काही आक्षेपार्ह रोग व तणाची झाडे वेळच्या वेळी काढून टाकावीत. (उदा. ज्वारीमधील काणी, बाजरीवरील गोसावी इ.)
८. बिजोत्पादन क्षेत्र तपासणी: बिजोत्पादन क्षेत्राची प्रमाणीकरण यंत्रणेकडे नोंदणी झाल्यानंतर बीज प्रमाणीकरण अधिकारी बिजोत्पादन क्षेत्राची तपासणी करण्यासाठी येतात. पिकांच्या परागीभवनाच्या प्रकारानुसार २ ते ४ तपासण्या केल्या जातात. या तपासणीमध्ये प्रमाणीकरण यंत्रणेने ठरवून दिलेल्या प्रमाणकाप्रमाणे बिजोत्पादन आहे किंवा नाही हे तपासले जाते. तसेच बिजोत्पादनाबाबत मार्गदर्शन केले जाते.
९. काढणी व मळणी: काढणी व मळणी बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच करावी. साधारणतः १२-१५ % बियाण्यांत ओलावा असताना काढणी केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. संकरीत बिजोत्पादनात नर कणसाची/वाणाच्या झाडांची काढणी अगोदर करून मळणीसाठी वापरावे. त्यामुळे भेसळ होण्याची शक्यता टाळता येईल. बियाण्यांची मळणी व वाळवण केल्यानंतर बियाणे स्वच्छ करण्यासाठी तसेच त्याची योग्य प्रतवारी करण्यासाठी मोहरबंद पोत्यात भरून बीज प्रक्रिया केंद्रावर जमा करावे.
१०. बीज प्रक्रिया: बीज प्रक्रिया केंद्रांमध्ये बियाणे वाळविणे, स्वच्छ करणे, प्रतवारी करणे, औषधे लावणे व परीक्षण करून पिशव्या भरून मोहरबंद करणे इ. गोष्टींचा समावेश असतो. बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाण्यांची गुणवत्ता वाढते. जमिनीतून व बियाण्यांपासून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. बीज प्रक्रिया केंद्रांमध्ये एकाच वेळी विविध पिकांच्या बियाण्यावर प्रक्रिया केली जात असल्यामुळे भेसळ होऊ नये याकरिता काळजी घ्यावी लागते.
११. साठवण: बियाण्यांची साठवण करण्यापूर्वी बियाण्यांतील ओलाव्याचे प्रमाण ८ ते १०% पर्यंत असणे गरजेचे आहे. याकरिता बियाणे २-३ वेळा उन्हात वळविणे आवश्यक असते. साठवणुकीत बियाण्याचा जोम व उगवणक्षमता टिकून राहण्यासाठी ओलावारोधक बॅगमध्ये किंवा पोत्यामध्ये प्लास्टिक बॅग टाकून त्यामध्ये बियाणे भरून ठेवावे. बियाणे भरलेल्या पोत्यावर संपूर्ण माहिती लिहिलेली असावी. पोती जमिनीपासून थोड्या उंचीवर ठेवावीत जेणेकरून बियाणे जमिनीतून आर्द्रता शोषून घेणार नाहीत. बियाणे बीज परीक्षणात पास झाल्यावर बीज प्रक्रिया करून ते योग्य पिशव्यात भरण्यात येते. या पिशव्यांना प्रमाणीकरण यंत्रणेचे प्रमाणपत्र व मोहोर लावण्यात येते.
अशा प्रकारचे उच्च प्रतीचे बियाणे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वापरले तर उत्पादनात निश्चितच वाढ होईल.
- प्रा. पूनम घार्गे, प्रा. प्रणवसिंह पाटील, प्रा. अश्विनी करपे, कृषी महाविद्यालय, बारामती