सिंचनापूर्वी करा पाणी परीक्षण

खडकाचा प्रकार, निचऱ्याचा अभाव, पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग, रासायनिक खते व कीडनाशके यांचा वाढता वापर आदी कारणांमुळे पाणी क्षारयुक्त होते. त्यामुळे जमिनीतील पाणी सिंचनासाठी वापरताना पाणी परीक्षण करून घेणे आवश्यक आहे.
पाणीतपासणीसाठी पाण्याचा नमुना घेताना तो योग्य पद्धतीने घेणे हेही महत्त्वाचे आहे. अन्यथा निरीक्षणे चुकून त्याप्रमाणे उपाययोजनाही चुकण्याची शक्यता असते. त्यासाठी पाण्याचा नमुना घेण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा.

पाण्याचा नमुना गोळा करण्याची पद्धत :

– पाण्याचा नमुना हा प्रतिनिधिक स्वरुपाचा असावा. सर्वसाधारणपणे सूर्योदयाच्या सुमारास पाण्याचा नमुना घ्यावा. त्यानंतर २४ तासांच्या आत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा. अनुमान जास्त अचूक येण्यासाठी त्याची मदत होते.
– पाण्याचा नमुना घेण्यापूर्वी आदल्या दिवशी विहिरीच्या पाण्याचा उपसा होणे आवश्यक आहे. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी बादलीने विहिरीतील पाणी ढवळावे व नंतर बादली साधारणपणे शक्यतो विहिरीच्या मध्यभागी व पाण्याच्या उंचीच्या निम्म्या खोलीपर्यंत सोडून वर काढून घ्यावी.

– एक लिटर पाणी साठवणूक क्षमता असलेल्या दोन स्वच्छ धुतलेल्या प्लॅस्टिक बाटल्या घ्याव्यात. ज्या पाण्याचा नमुना घ्यावयाचा आहे, त्याच पाण्याने बाटल्या दोन तीन वेळा विसळून घ्याव्यात. नंतर त्या बाटल्यांमध्ये पाणी भरावे. बाटल्या टोपण लावून बंद कराव्यात.
– प्रत्येक बाटलीवर एक छोटेसे लेबल लावावे व त्या लेबलवर शेतीचा सर्वे नंबर, विहिरीचे नाव, विहिरीतील पाण्याची पातळी आणि नमुना घेतल्याची तारीख नमूद करणे आवश्यक आहे.

पाणीपरीक्षण अहवालावरुन पाणी व्यवस्थापन :
– पाणीपरीक्षण केल्यानंतर पाण्यातील अपायकारक घटकांवर उपाययोजना करता येतात.
– पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमी असून काही प्रमाणात फक्त कार्बोनेट्स असतील तर विहिरीमध्ये वेळोवेळी १५०- २०० ग्रॅम फेरस अमोनियम सल्फेट टाकावे. पाणी जर सातत्याने विनाउपसा असेल तर ४५ दिवसांच्या अंतराने विहिरीत फेरस अमोनियम सल्फेट टाकावे. तसेच नियमित पाणी उपसा होत असेल तर विहिरीत आठवड्यातून दोनवेळा फेरस अमोनियम सल्फेट टाकावे. कार्बोनेटसारख्या अपायकारक क्षाराचे दुष्परिणाम त्यामुळे कमी करता येतात.
– पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण मध्यम असेल तर पाणी जिप्समच्या पिशव्यातून प्रवाहीत करून वापरावे. सल्फेट या घटकाचे दुष्परिणाम त्यामुळे कमी करता येतात.
– क्षारयुक्त पाण्याला सहनशील पीक जातींची निवड करावी. पिकांची योग्य फेरपालट करावी.
– जमिनीत सेंद्रिय खताची मात्रा भरपूर प्रमाणात द्यावी.
– जमिनीत ठराविक अंतरावर चर खणून तिची पाण्याचा निचरा करण्याची क्षमता वाढवावी.
– पिकांना एकाच वेळी भरपूर पाणी देऊ नये. वाढीच्या मुख्य अवस्थांमध्ये थोडे थोडे पाणी द्यावे.

पाण्याची प्रतवारी व वर्गीकरण :
पाण्यातील घटक ——————– उत्तम प्रतीचे ————मध्यम प्रतीचे ———-कनिष्ठ प्रतीचे
*सामू (पीएच) ————————-६.५ ते ७.५ —————७.५ ते ८.५ –———— ८.५ पेक्षा जास्त
*विद्युत वाहकता (डे.सा./ मी.) —– ०.२५ पेक्षा कमी ——–०.२५ ते २.२५ ———–२.२५ पेक्षा जास्त
*कार्बोनेट्स (मि.इ./ली.) ————-१.५ पेक्षा कमी ———–१.५ ———————-१.५ पेक्षा जास्त
*बायोकार्बोनेट्स (मि.इ./ली.) ——- १.५ पेक्षा कमी———- १.५ ते ८ ——————८ पेक्षा जास्त
*क्लोराईड (मि.इ./ली.) —————४ पेक्षा कमी ————-४ ते १०——————१० पेक्श जास्त
*सल्फेट्स (मि.इ./ली.) ————– २ पेक्षा कमी ————-२ ते १२——————-१२ पेक्षा जास्त
*सोडियम शोषांक गुणांक ————१० पेक्षा कमी ———–१० ते २६—————–२६ पेक्षा जास्त
*कॅल्शियम मॅग्नेशियम गुणांक —–१.२५ पेक्षा कमी ———१.५ ते ३ —————–३ पेक्षा जास्त
*विद्राव्य सोडियम ——————–५० पेक्षा कमी————५० ते ९२ —————-९२ पेक्षा जास्त

 

-प्रा. सचिन तेलंगे पाटील, प्रा. पी. पी. सरवळे, कृषी महाविद्यालय, बारामती