Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

आता ऊसाची लागवड फक्त रोपांनीच..!

ऊस शेतीमध्ये आता आधुनिक तंत्र येत आहे. या तंत्राचा चांगला फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. आता पुढचे पाऊल म्हणजे ऊस कांड्यांची नव्हे, तर थेट ऊसाच्या रोपांचीच लागवड करायची आहे. हि लागवड अनेक अर्थी व कित्येक पटींनी शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे.

दरवर्षी ४० हजार कोटींची उलाढाल होणारा, राज्यातील १ कोटी लोकसंख्या अवलंबून असलेला साखर उद्योग महाराष्ट्राची शान मानला जातो. आज राज्यात थोड्या थोडक्या नव्हे तर १०.२२ लाख हेक्टर क्षेत्रात ऊसाची लागवड प्रतिवर्षी होते. ऊसाचे पीक आडसाली म्हणजे तब्बल दीड वर्षे शेतात राहते. थोडक्यात दरवर्षीनुसार लागवडीचे व गाळपास असे मिळून २० लाख हेक्टरहून अधिक ऊसाचे क्षेत्र आहे.

लाखो कुटुंबांच्या घरात समृद्धी आणणाऱ्या या पिकास दुर्दैवाने आळशाचे पीक असे म्हटले जाते. त्याला कारण म्हणजे शेतकऱ्यांना कमी कष्टात त्याचे उत्पादन मिळते असे म्हटले जाते. अर्थात हि परिस्थिती काही वर्षापर्यंत होती. कारण ऊसाची सरासरी उत्पादकता एकरी ४० टनांपर्यंत किमान असायला हवी, तरच परवडते, असा युक्तिवाद त्यावेळी केला जात होता. मात्र, एकरी ४० टन ऊसाचे उत्पादन घेऊनही ऊसाची शेती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, असे लक्षात आल्यांनतर शेतकऱ्यांची या पिकाबाबतही व्यावसायिकदृष्टी अधिक सखोल होत गेली. साहजिकच ऊसाची शेती व्यावसायिक दृष्टीने केली तरच एकरी १०० टन ऊस उत्पादन घेता येईल आणि तरच शेती नाफेशीर होऊ शकेल, असा प्रवाद आता शेतकऱ्यांमध्ये आहे. नवनवे प्रयोग आता शेतकरी करू लागले आहेत. त्यातून उसाचे पीक ठिबक सिंचनाखाली आणण्याचाही प्रयोग यशस्वी झाला. पुढे त्यात ऑटोमायझेशनही आले आहे. त्यापाठोपाठ एरवी ऊसाचे पीक तुटून गेल्यानंतर त्याचे पाचट पेटायचे थांबले. साहजिकच त्याद्वारे जमिनीतील सेंद्रिय कर्ब अबाधित राहण्यास मोठी मदत झाली. त्यानंतर उसाच्या पिकातील यांत्रिकीकरण वाढले. त्यामुळे मजुरी व मजुरांच्या खर्चात बचत झाली. हळूहळू एक – एक पायरी पुढे निघालेल्या ऊसाची शेती आता आधुनिक पावलांनी पुढे जावी, अशी अपेक्षा आहे.

ऊसाच्या रोपांचीच लागवड का?

आतापर्यंत व सध्याही प्रचलित असलेली लागवड हि ऊसाची टिपरी, एक डोळा व दोन डोळे, तीन डोळे अशा स्वरुपात होती. या पद्धतीची लागवड करताना शेतकरी एका एकरातून अधिकाधिक ऊस मिळावा म्हणून दोन टिपऱ्यांत एक फुट अंतराची शिफारस असताना प्रत्यक्षात समोरासमोर म्हणजे टक्कर पद्धतीचे, सवाई पद्धतीचे लागवड करत असे. त्यातून टिपरी म्हणजे बियाणे अधिक लागते. त्यातून खर्चही वाढतो. आताच्या ऊसाला प्रचलित मिळणारा भाव पाहता, लागवडीसाठी प्रति एकरी तीन ते चार टन बियाणे वापरणे हि परवडणारी बाब नाही. त्याचप्रमाणे लागवड करणाऱ्याचाही खर्च विनाकारण वाढणारा आहे. निर्सार्गाच्या लहरीपणावर मात करून ऊसाचे उच्चांकी उत्पादन काढण्यासाठी ठिबक सिंचनावर रोपांद्वारे लागवड करून १०० टक्के रोपांची लागवड खूप फायदेशीर ठरणार आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे टिपरीद्वारे केलेली लागवड हि अनेकदा लागवडीनंतर उगवण न झाल्याने पुन्हा सांधावी लागते. त्यातून खर्च वाढत जातो. शिवाय सांधलेल्या ऊसाची मुळ ऊसाशी बरोबरी करण्यात खूप वेळ लागतो. त्याउलट रोपे आयती असल्याने त्यांची उगवणक्षमता चांगली असल्याने व लागवडीनंतर उगवून रोपे मोठी होण्याचा वेळ वाचण्यासाठी रोपांची लागवड खूपच फायदेशीर ठरते. शिवाय लागवड करताना अलीकडे मजुरांचा वाढलेला खर्च लक्षात घेता, निरोगी व उत्तम प्रतीची रोपे शेतकऱ्याचे एक कुटुंब घरच्या घरी लागवड करू शकते. निरोगी व उत्तम प्रतीची रोपे शेतकऱ्यांनाही तयार करता येऊ शकतात.

रोपांची लागवड खर्चिक नाही

टिपरीद्वारे लागवड करण्यासाठी सध्या शेतकरी प्रतिएकरासाठी दीड गुंठ उसाचे बेणे खरेदी करतात. सध्या प्रति गुंठ चार ते पाच क्वचित सहा हजार रुपये दर बियाणे असलेले शेतकरी आकारत आहेत. तत्याचा विचार करता जवळपास एकरी साडेसात हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. शिवाय बियाणे तोडणी, वाहतूक, लागवड यांसाठी पुन्हा एकरी चार हजार रुपयांहून अधिक खर्च येतो. त्यातही लागवड झाल्यास शंभर टक्के उगवण क्षमतेची खात्री नाही. साहजिकच त्यापुढील पिढीचे म्हणजे खोडव्याचे उत्पादनही कमी येते. त्याचा विचार करता रोपांच्या पद्धतीने लागवडीचा पर्याय अधिकच फायदेशीर आहे.

रोप लागवडीचे आर्थिक गणित

पर्याय १: एक एकर क्षेत्रात रोपांची जर पाच बाय दोन फुट अंतरावर लागवड केली तर ४३५६ रोपे एका एकर क्षेत्रात लागतात. दोन रुपयांना प्रति रोप खर्च धरल्यास ८ हजार ७१२ रुपये एका एकरासाठी खर्च येतो. त्याद्वारे एका एकर क्षेत्रात तुटून जाणारा ऊस ४५ हजार संख्येपर्यंत मिळतो.
पर्याय २: पाच बाय अडीच फुट अंतरावर जर लागवड केली तर ३४८४ रोपे लागतात. त्यासाठी ६ हजार ९६९ रुपये खर्च येतो. त्याद्वारे एक एकर क्षेत्रात तुटून जाणारा ऊस ४५ हजार संख्येपर्यंत मिळतो.
पर्याय ३: पाच बाय तीन फुट अंतरावर लागवड केली तर २९०० रोपे लागतात. त्यासाठी ५ हजार ८०० रुपये खर्च येतो. त्याद्वारे एका एकर क्षेत्रात तुटून जाणार ऊस ४५ हजार संख्येपर्यंत मिळतो.
अर्थात लागवडीतले अंतर जेवढे वाढेल, तेवढे ऊसाचे वजन वाढत जाते. कारण ऊसाच्या बांधणीपर्यंत फुटव्यांची संख्या मर्यादित राहून सूर्यप्रकाश, मोकळी जागा अधिक मिळते. फुटव्याचे ऊसात रुपांतर झाल्याने दिली गेलेली अन्नद्रव्ये मोजक्याच ऊसाला मिळाल्याने त्याचे वजन वाढून तो सुदृढ बनतो. कारखान्यास तुटला जाणारा ऊस अधिक वजनदार बनतो. त्यामुळे जरी लागवडीची रोपे कमी झाली, तरी पर्यायाने अंतर व खेळती हवा अधिक मिळून त्याचा उत्पादनासाठी फायदाच होतो.

प्रचलित पद्धतीचे तोटे

प्रचलित पद्धतीने ऊसाची लागवड केल्यानंतर सुरुवातीस ऊसाच्या पिकात खूप गर्दी दिसते. तब्बल अडीच ते तीन लाख फुटवे होतात. मात्र प्रत्यक्षात कारखाण्यात तुटून जाणारा ऊस तुलनेने खूपच कमी होतो. कारण फुटवे वाढले, तरी एकमेकांना मारून टाकणारे फुटवे अधिक होतात. दिलेली अन्नद्रव्ये विभागून जाऊन प्रत्येक फुटव्यास त्या तुलनेत अन्न मिळत नाही. फुटव्यांची संख्या वाढून तुटेपर्यंत त्यातील अनेक मरून जातात व वजन कमी झालेला ऊस मिळतो.

रोपांद्वारे लागवड कशी करावी

शेताची चांगल्या प्रकारे मशागत झाल्यानंतर साध्या पद्धतीने पाच फुट बाय पाच फुट अंतरावर मध्यम खोलीची सरी काढून घ्यावी. या सरीमध्ये उपलब्ध असलेले कुजलेले शेणखत, मळी, कारखान्याची राख, कंपोस्ट खते टाकावी. एकरी प्रत्येकी तीन किलो अझॅटोबॅक्टर , स्फुरद विरघळविणारे जीवाणू व पालाश उपलब्ध करणारे जीवाणू मिसळून घ्यावेत. तर ठिबक सिंचन पद्धतीने केल्या जाणाऱ्या लागवडीसाठी पाच फुट अंतरावर सोळा ते अठरा एम.एम. जाडीची उपनळी टाकावी. हलक्या ते मध्यम जमीनीत चाळीस सेंटीमीटर अंतरावर ताशी ४ लिटर पाणी टाकणारा इनलाईन ड्रीपर असावा. तर भारी जमीनीत पन्नास सेंटीमीटर अंतरावर ताशी ४ लिटर पाणी टाकणारा इनलाईन ड्रीपर असावा. रोपांची लागवड करण्यापूर्वी ठिबक सिंचन चालवावे, म्हणजे मध्यम ते हलक्या जमीनीत एकरी ५० हजार लिटर पाणी तर भारी जमीनीत ४४ हजार लिटर पाणी द्यावे. वाफसा आल्यानंतर कुदळीने दोन फुट अथवा अडीच फुट अथवा तीन फुट अंतरावर गल घेऊन रोपांची लागवड करावी. यानंतर दिवसातून एक वेळ दोन तास ठिबक सिंचन प्रणाली चालू ठेवावी. चौथ्या दिवसापासून आठ किलो युरिया, अर्धा किलो फॉस्फेरिक अॅसीड, चार किलो पोटॅश ठिबक सिंचनातून आठवड्यातून एकदा सोडावे.

ट्रेमधील रोपांचा वापर :
• खोडवा पिकातील नांग्या भरण्यासाठी
• कमी कालावधीत ऊसाचे पीक घेण्यासाठी
• बियाणे निर्मितीसाठी, बियाणे प्लॉट तयार करण्यासाठी

ऊस रोपे तयार करताना काय काळजी घ्यावी ?

• जमिनीची योग्य प्रकारे मशागत करावी. दोन नांगरटी, एक कुळवणी, डिस्क हॅरो (तव्याचा कुळव) कुळवणी, सबसॉईलरने नांगरट करावी.
• पाच फुट अंतरावर मध्यम खोल सरी काढावी.
• ठिबक सिंचनाची उपनळी प्रत्येक सरीमध्ये टाकून जमीन ओली करावी.
• वाफसा आल्यावर कुदळ, काठीच्या सहाय्याने दहा से.मी. खोली एवढा खड्डा/ गल घ्यावी.
• ट्रेमधील रोपांना हलक्या पाण्याची फवारणी करून, प्रत्येक रोप अलगद उचलून खड्ड्यामध्ये लावावे, चोहोबाजूने माती दाबावी.
• सर्व रोपे लागवड केल्यानंतर ठिबक सिंचन एक ते दीड तास चालवावे.
• ऊसाच्या रोपांचा ट्रे राखून ठेवावा, जेणेकरून १ ते २ % होणाऱ्या रोपांची मर सांधता येईल.
• चौथ्या दिवसापासून फर्टीगेशन चालू करावे.
• लागवडीपासून २१ दिवसाच्या आत १) ह्युमिक अॅसिड २) जीवाणू खते- अझॅटोबॅक्टर, स्फुरद विरघळविणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू प्रत्येकी एक लिटर तसेच कार्बेंडाझीम २०० ग्रॅम १०० लिटर पाणी यांची आळवणी करावी किंवा ठिबक सिंचनाद्वारे द्यावे.

रोप लागवडीचे फायदे:

• रोपांद्वारे लागवड केल्यामुळे ९८ ते १०० % उगवण क्षमता पर्यायाने शेतात तुट राहत नाही.
• एक ते दीड महिना ऊसाचे शेत मशागतीसाठी किंवा कमी कालावाधीच्या पिकासाठी वापरता येते.
• आडसाली अगर पूर्व हंगामी ऊसाची लागवड करताना जास्त पाऊस असल्यास जमीन वाफश्यावर नसल्यास दीड महिन्यापर्यंत रोपांद्वारे लागवड करता येईल.
• लागवडीच्या ऊसामध्ये तुट नसल्यामुळे खोडवा पिकामध्ये तुट संधावी लागत नाही, ज्यामुळे खोडव्याचे उत्पादन वाढीसाठी मदत होते.
• गाळप योग्य ऊसाची संख्या जास्त मिळते.
• प्रत्येक ऊसाचे वजन व प्रतवारी वाढते.
• लागवडीवेळी दोन ओळींतील व रोपांतील अंतर योग्य राखल्यामुळे प्रत्येक ऊसाला, बेटाला सर्व बाजूंनी सूर्यप्रकाश, मोकळी हवा, अन्नद्रव्यांची उपलब्धता सारख्या प्रमाणात मिळते.
• निरोगी रोपांमुळे किडग्रस्त व रोगग्रस्त ऊस, ऊसाची बेटे तयार होत नाहीत.
• दोन रोपांतील अंतर जास्त असल्यामुळे व रोप लागण करताना पाने कापल्यामुळे (जेठा कोंब) फुटवे जास्त व एकाच वेळी येतात.
• फुटवे एकसारखे, जोमदार येतात. त्यांची वाढही एकसारखी होते. उत्पादन खर्चात बचत होते.

– श्री. विवेक भोईटे, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
Exit mobile version