लाल कोळी व सनबर्नपासून वाचवा द्राक्षबाग

लाल कोळी (रेड माईटस्)
द्राक्ष घडाच्या पुढे काडीचा शेंडा घडापासून दहाव्या पानावर मारल्यानंतर द्राक्षवेलींची पाने जून होऊ लागतात. या स्थितीत त्या पानामध्ये ‘इथिलीन’ या द्रव्याची निर्मिती होऊ लागते. हे ‘इथिलीन’ लाल कोळी किंवा रेड माईटसना खूपच आवडते, म्हणून द्राक्षवेलीच्या पानांवर लाल कोळीचा मोठा प्रादूर्भाव दिसून येतो. लाल कोळी द्राक्षवेलींच्या पानातील रस आपल्या सूक्ष्म सोंडेने शोषून घेत असतो. त्यामुळे पानातील पेशी मरतात व पान लवकर वाळून वेलीवरून पडते. लाल कोळीच्या बंदोबस्तासाठी सकाळी २०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम सल्फेक्स घेऊन द्राक्षबागेची पाने व घड यावर स्प्रे मारावा. या स्प्रेचे पाणी एकरी ७०० लिटर फवारावे. सायंकाळी २०० लिटर पाणी अधिक ३०० मि. लि. ओमाईट घेऊन असा दुसरा स्प्रे घ्यावा.

सनबर्न (सौरजल)
थंडीमुळे द्राक्षवेलींच्या पानावर, घडावर, पानांच्या देठावर, घडाच्या मण्यावर, मण्यांच्या देठावर भुरीचा प्रादूर्भाव होत असतो. भुरीचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून द्राक्ष बागायतदार गंधकयुक्त औषधे फवारतात. घडातील मण्यांवर गंधकाचा स्प्रे दिल्यामुळे असे मणी उन्हात आल्यास उन्हामुळे तेथील गंधक ज्वालाग्रही बनतो व त्या ठिकाणच्या मण्यातील पेशी मरून जातात. त्यामुळे तेथे तांबूस खड्डा पडतो. यासाठी पाने उन्हात व घड सावलीत अशी पाने व घड यांची बांधणी करून घ्यावी. ‘सनबर्न’ होऊ नये म्हणून ३०० लिटर पाणी अधिक ४०० मि. लि. नारळातील पाणी अधिक २०० मि. लि. ताबा अधिक ५०० मि. लि. अगत्य ऍग्रो टॉनिक असे ७ दिवसांच्या अंतराने २ स्प्रे पानांवर व घडावर घ्यावेत.

हिरवे मणी तडकणे
द्राक्षवेलीवरील घडातील हिरवे मणी तडकून फुटतात. त्याचे कारण म्हणजे द्राक्षवेलीत बोरॉनची कमतरता असते. दिवसा उष्णता व रात्रीची खूप थंडी अशा तापमानामुळे घडातील हिरवे मणी तडकतात म्हणून द्राक्ष पानावर व घडावर खालील स्प्रे घ्यावा.
२०० लिटर पाणी अधिक १०० ग्रॅम बोरिक ऍसिड अधिक ५०० मि. लि. अगत्य ऍग्रो टॉनिक

द्राक्ष वेलीवरील पाने पिवळी पडणे
* द्राक्षघडांचे मणी ज्वारीच्या आकारात असताना वेलीला पालाश (पोटॅश) मिळाले किंवा योग्य प्रमाणात उपलब्ध न झाल्यास द्राक्षाचा वेल, वेलीवरील काही पाने मारून त्यातील पोटॅश पळविण्याचा प्रयत्न करीत असताना त्यावेळी पाने पिवळी पडून गळतात. अशा वेळी एकरी ५० किलो एस. ओ. पी. (सल्फेट ऑफ पोटॅश) हा डोस ड्रीपखाली टाकावा.
* गर्डलिंगची जखम खोल झाल्यास खोडातील जलवाहिन्या तुटल्यामुळे गर्डलिंगची जखम २१ दिवसांत सापडत नाही म्हणून द्राक्षवेलीवरील पाने पिवळी पडतात व मुळ्या उपाशी राहतात. यावर उपाय म्हणजे गर्डलिंग फार रुंद व खोल करू नये. गर्डलिंग हे झाडाचे ऑपरेशन आहे. त्यामुळे गर्डलिंगच्या ठिकाणी १ लीटर पाणी अधिक २५ ग्रॅम कोसाईड अधिक २५ मि. लि. नुवान अधिक २५ मि. लि. बायोझाईम अशी पेस्ट लावावी.
* वेलीवरील काही पाने सावलीत राहिली तर त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही म्हणून पाने उन्हात राहतील, अशी मांडणी करावी म्हणजे पाने पिवळी पडून गळणार नाहीत.
* द्राक्षबागेला पाण्याचा ताण बसला तरी पाने पिवळी पडतात व गळून जातात म्हणून द्राक्षबागेला पाण्याचे योग्य रीतीने व्यवस्थापन करावे.
* काळ्या, खोल जमिनीत पाण्याचा निचरा अत्यंत कमी असतो. अशा वेळी द्राक्षवेलीला खूप पाणी दिल्यास पांढर्‍या मुळीच्या ठिकाणचा वाफसा नाहीसा होतो. त्यामुळे पाने पिवळी पडतात म्हणून अशा जमिनीतील पाणी नियोजन महत्त्वाचे आहे.

मम्मीफिकेशन
द्राक्षमण्यात पाणी उतरल्यानंतर घडाच्या तळातील शेवटचे मणी स्पर्धेत साखर खेचू शकत नाहीत. यालाच ‘मम्मीफिकेशन’ असे म्हणतात. यावर उपाय म्हणून पानांवर व घडावर ५ दिवसांच्या अंतराने खालीलप्रमाणे दोन स्प्रे द्यावेत :
२०० लिटर पाणी अधिक २०० ग्रॅम बोरॉन अधिक ५०० मि. लि. अगत्य ऍग्रो टॉनिक
द्राक्षघडातील मण्यांच्या फुगवणीसाठी ५ दिवसांच्या अंतराने खालीलप्रमाणे दोन स्प्रे द्यावेत :
२०० लिटर पाणी अधिक १ लिटर विनीन अधिक ४ ग्रॅम जी. ए. (विरघळून घ्यावा.) अधिक ५०० मि. लि. अगत्य ऍग्रो टॉनिक
द्राक्ष मण्यात साखर भरून घडांना वजन मिळण्यासाठी २०० लिटर पाणी अधिक ५०० ग्रॅम पी. डी. एच. अधिक ५०० मि. लि. अगत्य ऍग्रो टॉनिक असा स्प्रे द्यावा.

– प्रा. वसंतराव माळी