Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

वासरांचे संगोपन असे करा

हरित क्रांती बरोबरच धवल क्रांतीदेखील तितकीच आवश्यक आहे. आपल्या देशात पशुधनाची संख्या भरपूर आहे, तरीपण दुघ्धोत्पादन म्हणावे तसे भेटत नाही. आपण वासराचे संगोपन लहानपणापासूनच व्यवस्थित केल्यास याच कालवडी उद्याच्या गाई होऊन दुधाचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत करतील.

 वासराचा जन्म झाल्यानंतरचे व्यवस्थापन :

वासरू जन्मल्यानंतर लगेचच त्याच्या नाकातोंडामधील चिकट पदार्थ काढून टाकावा. चारी खुरे साफ करून घ्यावीत. लगेच वासरास गाईच्या समोर ठेवावे. गाय आपल्या वासराला चाटून साफ करते, त्यामुळे वासराची कातडी कोरडी आणि साफ होते. तसेच त्याचा श्‍वासोच्छ्वास सुधारतो आणि पूर्ण शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित सुरू होते. हवा थंड असताना किंवा गाईने वासराला न चाटल्यास कोरड्या कापडाने वासराचे अंग पुसावे. त्याच्या शरीरापासून साधारण २ ते ५ सें.मी. अंतरावर नाळ बांधा आणि लिगेचरच्या खाली १ सेंमीवर तोडावे. तेथे टिंक्चर आयोडिन हे औषध जे सहज उपलब्ध होते ते लावावे. गोठा अतिशय स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. जेणेकरून नवीन वासरास कुठलाही त्रास होणार नाही. वासराचे वजन घेऊन नोंद ठेवावी.
व्यालेल्या गाईस थोडेसे गरम केलेल्या कोमट पाण्याने धुऊन साफ करावे. गाईला येणारे पहिले (चिकाचे) दूध म्हणजेच (कोलोस्ट्रम) वासराला एक ते तीन तासांच्या आत पाजावे. जन्माला आल्यानंतर एका तासात वासरू स्वतःच्या पायांवर उठून दुध पिते, जर वासरू उठत नसल्यास आपण आधार देऊन उठवावे.
वासराचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे अन्न म्हणजे चिकाचे दूध. जन्मानंतरचे पहिले ३ ते ७ दिवस त्यास आईकडून हे पोषणयुक्त चिकाचे दूध द्यावे. वासराचे वजनाच्या १०% या प्रमाणात द्यावे चिक द्यावा. त्यामध्ये आजाराशी सामना करणारी रोगप्रतिकारक द्रव्ये (अँटिबॉडीज) तसेच पोषण कमी पडल्यास ते भरून काढणारे पदार्थदेखील असतात. या दूधाशिवाय पहिले ३ ते ४ आठवडे वासरास गाईचे दूधदेखील पुरेशा प्रमाणात मिळाले पाहिजे.
वासरांना खाद्य देण्यासाठी भांडी वापरली असल्यास ती स्वच्छ करावीत. सर्व साहित्य कोरड्या व स्वच्छ ठिकाणी ठेवावे.

 वासरांचे पशुखाद्य – काफ स्टार्टर:
चांगली वाढ आणि अधिक प्रतिकारकशक्ती येण्यासाठी दूध आणि खुराक यांचा आहारात समावेश असणे अत्यंत गरजेचे असते. वयाच्या ४५ दिवसांपर्यंत वासरांचे पोट हे रवंथ न करणाऱ्या प्राण्यांप्रमाणे असते. तद्‌नंतर त्यामध्ये हळूहळू बदल घडू लागतो आणि सहा महिन्यांपर्यंत ते रवंथ करणाऱ्या प्राण्याचे पोट तयार होते. हा बदल जाणीवपूर्वक लक्षात घेऊन वासराचा आहार ठरविला पाहिजे. ज्यामध्ये काफ स्टार्टरचा वापर करणे महत्त्वाचे आहे. काफ स्टार्टर हे वासरांचा बालआहार असून दूध किंवा इतर पातळ पदार्थांवर वाढणाऱ्या वासरासाठी पूरक पोषकद्रव्ये यांचे मिश्रण आहे. यात मुख्यतः मका किंवा ओट्ससारखी धान्ये, तेलबिया आणि इतर धान्यापासून बनवलेले तसेच जीवनसत्वे, खनिजे, प्रतिजैविके यांचा मिश्रण केलेले असते.
उसाची मळी म्हणजेच मोलासेसचे प्रमाण यात १० % पर्यंत ठेवतात. ज्यामुळे या खाद्यास रुचकर चव येते आणि वासरे हे खाद्य आवडीने खातात.
दर्जेदार मिश्रखाद्यात ७५ ते ८० % टीडीएन, ७५ % पचनीय घटक आणि २२ ते २५ % प्रथिने असतात. लहान वासरांसाठी लवकर वाढीस खूपच उपयुक्त.
प्रतिजैविकांचा उपयोग वासरातील पांढरी हगवण रोखण्यास होतो.
उदा. बारामती अॅग्रोचे काल्फ स्टार्टर १५०- २०० ग्रॅम दररोज वयाच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यापासून देण्यास सुरवात करावी.

• मिल्क रिप्लेसर:
दुधाचा व्यवसाय करणाऱ्यांनी वासरासाठी मिल्क रिप्लेसर वापरल्याने वासरांना दिल्या जाणाऱ्या दुग्ध आहारातून समतोल राखता येतो व त्याचबरोबर वासराची परिपूर्ण वाढ लवकर होऊन ती लवकर वयात येण्यास मदत होते. त्यामुळे,
 वासरांची योग्य वाढ व विकास होतो.
 दुधावरील होणारा खर्च कमी होतो.
 वासरांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
 मरतुकीचे प्रमाण कमी होते.
मिल्क रिप्लेसर वापरल्यामुळे वासरांना वेगळी औषधे किंवा खनिजे देण्याची गरज नसते.
उदा. बारामती अॅग्रोचे काल्फ मिल्क रिप्लेसर
साधारणपणे एक किलो ग्रॅम रिप्लेसर प्रति नऊ लिटर पाण्यामध्ये मिसळून ते वासराच्या शरीराच्या तापमानाएवढे गरम करून वासरास त्यांच्या वेळेप्रमाणे पाजावे.

• दुसऱ्या गाईच्या दुधावर वाढवणे :
वासराला काही कारणाने त्याच्या आईचे दूध मिळू शकत नसल्यास कमी फॅटचे पण भरपूर दूध देणाऱ्या गाईचे दूध अशा २ ते ४ वासरांना, अगदी पहिल्या आठवड्यापासूनच देता येते.
कोरड्या चाऱ्यासारखे इतरही कोरडे अन्न देता येते. अशी वासरे दुसऱ्या ते तिसऱ्या महिन्यापासून बाहेरच्या दुधावर वाढवता येतात.

• दुध सोडवणे:
या पद्धतीत वासरांना प्रथम पूर्ण दुधावर वाढवतात. नंतर त्यांना कोरडे अन्नपदार्थ व चारा खाण्यास शिकवले जाते. ती ७ ते १० आठवड्यांची झाल्यावर त्यांना दुधापासून पूर्णपणे दूर ठेवले जाते.
मोठ्या कळपामध्ये वासराची सोडवणूक जन्मानंतर लगेचच करणे चांगले आहे.
जन्मानंतर लगेचच ७ व्या दिसापासून दुध कमी कमी करत काल्फ मिल्क रिप्लेसर सुरू करता येते. ज्यामुळे गाईचे दूध आपण पिण्यासाठी किंवा दुध डेअरीमध्ये देणे शक्य होते.

• पाण्याचे महत्व :
वासराला नेहमी ताजे व स्वच्छ पाणी मिळेल अशी व्यवस्था करावी. वासराने एका वेळी जास्त पाणी पिऊ नये, यासाठी पाण्याचे भांडे वेगळे तसेच दुधाच्या भांड्यापासून लांबवर ठेवावे.

• वासराची वाढ :
 जन्माच्या वेळी वासराचे वजन साधारणपणे २०- २५ किलोग्रॅम असते. वासराची वाढ आपणांस हव्या त्या वेगाने होत आहे ना हे पाहण्यासाठी त्याचे वाढते वजन तपासणे खूप महत्वाचे आहे.
 वासरांना पहिल्या तीन महिन्यांमध्ये दिले जाणारे अन्न फार महत्त्वाचे असते.
 या दिवसांत चुकीचे अन्नपाणी मिळाल्यास २५ ते ३०% मरतुकीचे प्रमाण वाढते.
गाभण गाईस, विण्याआधीच्या २-३ महिन्यांत दर्जेदार चारा व पोषकद्रव्ये पुरवठा करावा. वासराला चांगले खाद्य द्यावे, त्यास जंत होत नाहीत हे पहावे व वजन दरमहा १० ते १५ किलोग्रॅम वाढेल याची खात्री करावी.

• वासरांचा निवारा :
दुध सोडण्याचा दिवस येईपर्यंत प्रत्येक वासरू स्वतंत्र जागेत ठेवा. म्हणजे दूध पिताना ती एकमेकांना त्रास देणार नाहीत. तसेच सांसर्गिक रोग पसरणार नाहीत. प्रत्येक जागा स्वच्छ व कोरडी ठेवावी. त्यामध्ये खेळती हवा असावी. वासरांना झोपण्यासाठी गवताची किंवा भुश्याची गादी पुरवावी. गोठा बाहेर मोकळ्यावर असल्यास त्यावर छप्पर करावे. तसेच कडक उन्हामुळे आतील हवा तापणार नाही हे पहावे. पाऊस आणि गार वारा अडवण्याची व्यवस्था करावी. गोठ्याची पूर्वेकडची बाजू मोकळी असल्यास सकाळचे ऊन आत येते शिवाय नंतरच्या कडक उन्हापासून संरक्षण मिळते.

• वासरे निरोगी ठेवा :सुरूवातीपासूनच वसरांची तब्येत चांगली असणे आवश्यक आहे. म्हणजे नंतर मरतुक, आजारपण, रोगराईचा फैलाव अश्या समस्या उदभवत नाहीत. वासरांवर नियमित देखरेख करावी. त्यांना योग्य रीतीने योग्य तेच खायला द्या आणि मुख्य म्हणजे स्वच्छता राखा.
हीच वासरे उद्या मोठी होऊन आपले आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत करतील. नर वासरे असतील तर शेती कामात मदत करतील आणि बाजारात विकल्यानंतर शेतकऱ्यांना नफा मिळेल. मादी वासरे मोठी होऊन जास्त दुध देतील आणि शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावेल.

• संसर्गजन्य रोग प्रतिबंधक लसीकरण –
संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास वेळीच योग्य उपचार न झाल्यास मोठ्या प्रमाणात मरतूक होते. त्यासाठी संसर्गजन्य रोगप्रतिबंधक लसीकरण करणे महत्त्वाचे आहे.
१) लाळ्या खुरकूत : पहिली मात्रा – वासरू दीड महिन्याचे असताना.
२) लाळ्या खुरकूत : दुसरी मात्रा – वासराचे वय चार महिने असताना.
३) यानंतर दर सहा महिन्यांनी लाळ्या खुरकूत तज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यावी. (मार्च व सप्टेंबर महिन्यांत).
४) फऱ्याचे नियंत्रण : वासराचे वय सहा महिने झाले असताना पावसाळ्यापूर्वी.
५) घटसर्प : वासराचे वय सहा महिने झाले असताना पावसाळ्यापूर्वी फऱ्या रोगाची, घटसर्प रोगाची लस वर्षातून एकदा टोचावी.
६) बुळकांडी प्रतिबंधक लस: वासराचे वय सहा महिने झाल्यावर बुळकांडी रोगप्रतिबंधक लस वर्षातून एकदा टोचावी.

-डॉ. मनोज वट्टमवार, पशुसंवर्धन विस्तार अधिकारी, बारामती अॅग्रो लि.

Exit mobile version