Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सुपीकता वाढीसाठी कडधान्य पिके फायद्याची

कडधान्य पिकांच्या मुळावर सूक्ष्म जिवाणूच्या गाठीमुळे हवेतील नत्र शोषून जमिनीत स्थिर केले जातो व जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढते. या पिकांची मुळे खोलवर पसरून खालच्या थरातील अन्नद्रव्य शोषून ते वरच्या थरात उपलब्ध स्थितीत आणून सोडतात. ही पिके जमिनीवर पसरलेल्या स्थितीत वाढून जमीन जास्तीत जास्त झाकतात. त्यामुळे जमिनीची धूप होण्यापासून संरक्षण होते. या सर्व घटकांव्यतिरिक्त कडधान्य पिकांचे उत्पादनही मिळते आणि जमिनीची सुपीकता व उत्पादकतादेखील वाढते. मानव, पशुधन व जमिनीच्या आरोग्यासाठी कडधान्य पिकांच्या लागवडीला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी पिकांच्या फेरपालटीमध्ये कडधान्य किंवा दाळवर्गीय पिकास महत्त्वाचे स्थान आहे. म्हणूनच निरनिराळ्या भागांत पिकांच्या फेरपालटीमध्ये वेगवेगळी कडधान्य पिके घेतली जातात. पिकांच्या फेरपालटीमध्ये एखाददुसरे कडधान्य पीक घेणे आवश्यक आहे. कडधान्य पीक घेतल्यास इतरही काही फायदे होतात. कडधान्य पिके जमिनीतील कमी ओलाव्यावरसुद्धा चांगल्या प्रकारे येऊ शकतात, म्हणून दुष्काळी किंवा कमी पावसाच्या भागातील शेतकरी दरवर्षी एखादे कडधान्य पीक घेतातच. जमीन रिकामी ठेवण्यापेक्षा कडधान्य पीक त्या जमिनीवर घेतल्यामुळे जमिनीचा मगदूर, सुपीकता व उत्पादकता वाढते आणि ही पिके जमिनीतील सूक्ष्म जिवाणूस वाढवून जमिनीची पोषकता वाढवितात. कडधान्य पिके हिरवळीचे खत देणारी पिके म्हणूनही घेतली जातात. या पिकांच्या मुळावर सूक्ष्म जिवाणूंच्या गाठी असतात व हे जिवाणू हवेतील नत्र शोषण करून जमिनीत स्थिर करतात. त्यामुळे कडधान्य पिके आपली नत्राची गरज तर भागवतातच; पण त्याबरोबर घेतले गेलेले आंतरपीक किंवा पुढे घेतल्या जाणार्‍या दुसर्‍या पिकाससुद्धा नत्राचा पुरवठा करतात.

हरभरा, तूर, उडीद, मूग, मसूर, कुलथी, वाटाणा, चवळी, सोयाबीन इत्यादीही पिके जमिनीत वाढवली तर जमिनीची उत्पादकता व सुपीकता वाढते. दाळवर्गीय पिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. आज भारतात जवळपास ६०-६५ टक्के लोक शाकाहारी आहेत. त्यांच्यासाठी प्रथिनाचा पुरवठा मुख्यत्वे दाळवर्गीय पिकातूनच होतो व या पिकापासून मिळालेला भुसा जनावरांना चांगल्या प्रकारे प्रथिने पुरविणारे खाद्य आहे. तसेच जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी जमिनीचे पोषणदेखील होते.

कडधान्य पिकांचा जमिनीच्या उत्पादकतेवर होणारा परिणाम
वर्षानुवर्षे आपण जमिनीवर पिके घेत असतो. ही पिके दरवर्षी बर्‍याच प्रमाणात जमिनीतून अन्नपदार्थ शोषून घेतात व त्या प्रमाणात आपण जमिनीस अन्नपदार्थ पुरवत नाहीत. त्यामुळेच जमिनीची सुपीकता व उत्पादकता वरच्या वर कमी होत जाते. या दृष्टिकोनातून दाळवर्गीय पिकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या परिस्थितीत एकाच जमिनीत वर्षातून दोन किंवा तीन पिके घेतली जातात. त्यामुळे चांगली उत्पादन देणारी जमीनसुद्धा कमी उत्पादन देणार्‍या जमिनीत रूपांतरित होत आहे. याच दृष्टीने कडधान्य पिके जमिनीची अन्नद्रव्य धारण क्षमता व हवामान यावर अवलंबून असते. मूग या दाळवर्गीय पिकानंतर गहू घेतला तर जमिनीची उत्पादकता कमी न होता ती वाढलेली आढळते. तूर हे पीक जमिनीत खोलवर मुळ्या पसरल्यामुळे जमीन सच्छिद्र करते. त्यामुळे पीक कापणीनंतर जमिनीत सेंद्रिय पदार्थ मुळाच्या रूपात बर्‍याच प्रमाणात साठविले जातात. तुरीचा पालापाचोळा जमिनीवर पडून त्यातून भरपूर सेंद्रिय पदार्थ मिसळले जातात. हे सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जवळपास सहा टन कम्पोस्ट (शेणखत) मिसळण्याइतके असते. भारतात तृणधान्य हे नेहमी दाळवर्गीय पिकांमध्ये मिसळून किंवा आंतरपीक म्हणून पेरतात. कारण दाळवर्गीय पिके त्यांच्या मुळामध्ये तयार झालेले नत्र त्यांच्या भागात पसरलेल्या तृणधान्याच्या मुळास पुरवितात व त्यांच्याबरोबर आंतरपीक म्हणून घेतलेल्या पिकांची नत्राची गरज भागवतात, म्हणून नत्राचा जास्तीचा हप्ता तृण पिकास देण्याची गरज भासत नाही. हा एक दाळवर्गीय पिकांचा महत्त्वाचा फायदा आहे.

जमिनीची धूप थांबवण्यासाठी कडधान्य पिकांचा उपयोग
कडधान्य पिके जमिनीवर पसरलेल्या स्थितीत वाढतात व जास्तीत जास्त जमिनीचा भाग झाकून टाकतात. त्यामुळे पडणार्‍या पावसाच्या थेंबाची तीव्रता कमी होऊन मातीचे कण पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाण्याची शक्यता कमी होते म्हणूनच कडधान्य पिकांना ‘धूप थांबवणारी पिके’ असे संबोधले जाते. कडधान्य पिके जमीन चांगल्या प्रकारे झाकून जमिनीची पावसाच्या थेंबापासून होणारी धूप थांबवतात. कडधान्य पिके शक्यता खोलवर मुळे पसरणारीच असून, ते मातीचे चांगले कण तयार करून जमिनीतील हवा व इतर बाबींचे प्रमाण योग्य राखतात. तसेच जमिनीत बर्‍याच मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ मिसळतात व सेंद्रिय चक्र नियमित केले जाते.

हिरवळीचे खत म्हणून कडधान्य पिकांचे महत्त्व
कडधान्य पिकामध्ये नत्राचे प्रमाण साधारणपणे ०.३४ ते १.१० टक्के असते. त्यामुळे कडधान्य पिके ही चांगल्या प्रकारची हिरवळीची पिके म्हणून घेतली जाऊ शकतात. कमी काळात तयार होणारे मुगाचे पीक जर शेंगा तोडल्यानंतर जमिनीत गाडले तर ते हिरवळीच्या खताचे पीक म्हणून घेतले जाऊ शकते. अशा जमिनीवर घेतलेले गहू किंवा ज्वारीचे पीक रिकामी ठेवलेल्या जमिनीपेक्षा १० ते १५ टक्के जास्त उत्पन्न देते. कडधान्य पिकात जरी कुजलेले सेंद्रिय पदार्थ व हिरवळीचे पीक म्हणून घेतल्या जाणार्‍या धैंचा किंवा बोरूपेक्षा नत्राचे प्रमाण कमी असले तरी त्यांचे महत्त्व हिरवळीच्या पिकापेक्षा जास्त आहे. कारण, एक तर ही पिके दाळीचे उत्पादन देऊन हिरवळीच्या खताची पिके म्हणून घेतली जातात. म्हणजेच त्याच्यापासून जे कडधान्य मिळालेले आहे ते जास्तीचा फायदा आहे व ही पिके जमिनीत गाडल्यानंतर लवकर कुजतात व पुढील पीक घेण्यासाठी जमिनीची मशागत करण्यासाठी बराच वेळ मिळतो. जर आपण हिरवळीचे पीक म्हणून घेतलेला धैंचा किंवा बोरू जमिनीत गाडला तर त्याला कुजण्यासाठी जास्त वेळ लागतो व जमीन पुढील पीक घेण्यासाठी तयार करण्याला, मशागतीला कमी वेळ मिळतो व त्यापासून आपणास उत्पादनाचा जास्तीचा फायदा मिळत नाही.

जमीन रिकामी ठेवण्यापेक्षा दाळवर्गीय पिके घेणे फायदेशीर
महाराष्ट्रात कोरडवाहू क्षेत्रात खरीप ज्वारी घेतल्यानंतर जमीन पडिक ठेवली जाते; पण ही जमीन पडिक ठेवल्यापेक्षा जर त्या जमिनीवर दाळवर्गीय पीक घेतले तर त्याची वाढ चांगल्या रितीने होते. ही पिके कमी ओलाव्यातही चांगली वाढतात. कारण त्यांची मुळे जमिनीत खोलवर पसरतात. एक तर या पिकापासून कडधान्य मिळते व या पिकांची पाने व मुळे चांगल्या प्रकारे सेंद्रिय पदार्थ जमिनीत सोडतात. या पिकांच्या मुळाची खोलवर वाढ होत असल्यामुळे नैसर्गिकरीत्या नांगरल्याप्रमाणे होते. तसेच जमिनीत सूक्ष्म जिवाणूच्या वाढीसाठी फलदायक असून, त्यामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढण्यास मदत होते.

कडधान्य पिकांचे जमिनीच्या आरोग्यावर होणारे परिणाम
वरील परिणामाव्यतिरिक्त कडधान्य पिके जमिनीचे भौतिक गुणधर्म व जैविक गुणधर्मातही चांगला बदल घडवतात. पिकांची कापणी झाल्यानंतर जमिनीत जो पालापाचोळा पडलेला असतो, त्यावर जमिनीतील सूक्ष्म जिवाणू कुजण्याची क्रिया करून जमिनीतून पिकांना गरज भासेल अशा प्रकारे सर्वच अन्नद्रव्यांचा एकत्रित पुरवठा करतात. यात प्रामुख्याने सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फूरद, गंधक व इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश होतो. कडधान्य पिकापासून जमिनीत मिसळणार्‍या सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीच्या जडणघडणीमध्ये चांगल्या प्रकारे बदल घडून निचरा, हवा-पाणी यांचे प्रमाण, जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता यांमुळे जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक योग्य ठेवण्यास मदत होते. यामुळे पिकांची योग्य वाढ होऊन जमिनीत पिकांची मुळे खोलवर वाढण्यास व जमिनीतील वायूचे व पाण्याचे योग्य प्रमाण योग्य राहण्यास मदत होते. कडधान्ये किंवा दाळवर्गीय पिके जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढवण्यास मदत करतात.

– डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. सुरेश वाईकर

Exit mobile version